ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा फड आत्ता तरुण पोरं गाजवायला लागल्यात भिडू…!

राजकारण गावातलं असो कि, राज्याचं, नाही तर मग देशाचं असो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात आपल्याला सगळ्यात जास्त कोण दिसत असायचं तर ते अनुभवी आणि जेष्ठ नेतृत्व करणारे नेते.

पक्ष कोणताही असला तर ग्रामपंचायत सदस्यापासून सगळीकडे जेष्ठ मंडळींच वर्चस्व असतं.

त्यामुळे राजकारणाला नाव देखील ठेवली जायची. सोबतच मध्यंतरीच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरुणांमध्ये राजकारणाविषयी एक नकारात्मकता असल्याचं पाहायला मिळालं होत. अगदी मतदानाकडे देखील तरुणाई कानाडोळा करत होती.

मात्र तरुणांनी राजकारणात आलं पाहीजे हे फक्त भाषणात टाळ्या मिळवण्यासाठीचं वाक्य नाही तर ते प्रॅक्टिकलमध्ये सिद्ध होवू लागलं. त्याला कारण आहे सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका..

यंदाच्या निवडणूकांमध्ये उच्चशिक्षित तरुण, घराणेशाहीचा पाया नसणारे तरुण राजकारणात येत असल्याचं चित्र आहे. 

गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील आता तरुण सक्रिय सहभाग घ्यायला लागले आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवण्यासाठी २१ वर्षांची अट असल्यामुळे अगदीच तरुण असलेली मुलं देखील सध्याच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उतरली आहेत.

आदर्श गाव मानलं गेलेल्या राळेगणसिद्धीमध्ये काही तरुण उमेदवारांमुळेच वर्षानुवर्षे बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. तर काही ठिकाणी याच तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभ्या राहिल्येल्या अशाच काही तरुण उमेद्वारांना या एकूण निवडणूक, राजकारण आणि लोकशाही या प्रक्रियेबद्दल काय वाटत ते ‘बोल-भिडू’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  •  यासाठी आम्ही राळेगणसिद्धीच्याच डॉ. धनंजय पोटे यांच्याशी संपर्क केला. ते एमबीबीएस, एमडी झालेले आहेत. 

राजकारणामध्ये चांगले आणि उच्चशिक्षित तरुण यायला पाहिजेत हे आमच्या अण्णा हजारेंनीच सांगितलं आहे. याआधी कोणी चौथी पास, सातवी पास असे येत होते. ज्यांना गावच्या विकासाविषयी व्हिजन नसते. त्यामुळेच उच्च शिक्षित म्हणून मी व्हिजनरी काम करू शकतोय.

ग्रामपंचायतमध्ये निवडून येणं हे काय पैसे कमावणे म्हणून नाही, कारण माझा चांगला दवाखाना आहे, तिथं माझं चांगलं चालू आहे.

लोकशाही हे देशाला मिळालेलं वरदान आहे आणि ग्रामपंचायत हा त्याचा पाया आहे. प्रत्येक तरुणाने एक व्हिजन घेऊन यात उतरलं पाहिजे. बंगलोरमध्ये आयटी इंजिनिअर आमदार, खासदार आहेत. तर मुंबईमध्ये देखील शिकलेले राजकारणात आहेत. तशीच सुरुवात गावातून पण व्हायला पाहिजे.

राजकारणाकडे जर चिखल म्हणून तरुण पिढी बघत असेल तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या त्या चिखलात उतरून तो साफ करण्यासाठीची चांगली संधी आहे. आणि तुम्हाला जोपर्यंत तुमचं गाव, गावातील समस्या नीट समजत नाहीत तो पर्यँत तालुका, जिल्हा, राज्य आणि देशातील समस्या समजणार नाहीत.

  •  २८ वर्षीय संगमनेर तालुक्यातील मनोली गावच्या ग्रामपंचायतीचे उमेदवार अभिजित बेंद्रें ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

मी याआधी राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या महसूलमंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहायक होतो. त्यामुळे राजकीय जागरूकता तर आधीपासूनच आहे. पण हे काम करत असताना मी इतर गावांची काम करायचो. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे मला पहिल्यांदाच माझ्या गावचं काम करायला मिळणार आहे.

लोकशाहीच्या या सगळ्यात शेवटच्या पातळीपासून सुरवात करण्याची गरज म्हणजे ग्रामपंचायत मधून गावगाडयाच्या कामाविषयी सगळी माहिती करून घेणं महत्वाच आहे, तोच तर खरा राजकीय शिक्षणाचा पाया आहे. आणि या गावगाडयांची नीट माहिती असेल तरच त्यानंतरच्या पातळीवर तो यशस्वी होतो. राजकारणच खरं बाळकडू इथंच तर मिळत.

  •  २५ वर्षीय निलेश शेंडगे हे तासगाव तालुक्यातील पेड ग्रामपंचायतीसाठी उभे आहेत. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,  

सामान्यत: राजकारणात युवकांना मोठ्या स्तरावर लवकर संधी मिळत नाही असं म्हणतात. पण अलीकडच्या काळात तरुणांनी ही परिस्थिती बदलवली आहे. अनेक तरुण राजकारणात आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकीच मी एक. राजकीय शिक्षणाच्या सुरुवातीसाठी ग्रामपंचायत सारखं दुसरे माध्यम नाही.

याच ग्रामपंचायत किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्हा तरुणांना निवडणुकीविषयी आत्मविश्वास येतो. जिंकलो तर काही तरी करून दाखवू शकतो. जर हरलो तर अजून सुधारणा गरजेच्या आहेत म्हणून प्रयत्न करू शकतो. हे निवडणुकांचं तंत्र इथंच समजून येत.

देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत युवकांचे प्रमाण वाढवायचं असेल त्याची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेतून व्हायला हवी म्हणून मी ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहे.

  •  २७ वर्षीय स्वाती गराडे या पैजारवाडी ग्रामपंचायतीसाठी उभ्या आहेत. त्या ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाल्या,   

आपल्या गावात जर सुधारणा करायच्या असतील तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतो. हा करेल – तो करेल असं म्हणत बसण्यापेक्षा स्वतः करायला उतरायचं हेच ठेवून मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली आहे. तरुण पिढी पूर्वी राजकारण भ्रष्ट आहे असं म्हणत राजकारणाकडं वळत नव्हती पण ते भ्रष्ट आहे म्हणून त्यापासून लांब राहण्यापेक्षा छोट्या छोट्या संधी मधून आपणच ते बदलायला सुरुवात करावी.

तरुण पिढी नोकरी, बिझनेस या करिअरच्या गोष्टींचा विचार करणारी आता राजकारणाकडेही करिअर म्हणून पाहत आहे. आपल्या नॉलेजचा गावासाठी पण काहीतरी उपयोग करायचा आहे.

  •  २७ वर्षीय सुशांत माळी हे तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीसाठी उभे आहेत. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,  

वयोवृद्ध लोकांचं कसं असत कि एकदम स्लो काम. सगळं आरामात. ४ दिवस काय आणि ५ दिवस काय. पण तरुणांचं तसं नसत. सळसळत रक्त असल्यामुळे १० ते १५ मिनिटात करून देणार. तिथं कोणताही माणूस जोडून ते काम होऊन जात. पटकन निर्णय झटकन काम. म्हणून मी तर म्हणतो जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतुन राजकारणाची तोंड ओळख तर होतीच पण लोकशाहीच्या या शेवटच्या स्तराचा महत्व असं कि,  आपल्याला गावात दादा, युवा नेते अशा हाका मारणारे भरपूर दिसतील. पण ग्रामपंचायतीची निवडणूक आपल्याच गावातील किती लोक आपल्या पाठीशी उभे आहेत किंवा गावातील किती लोकांना असं वाटत कि हे पोरगं खरचं काही तरी करू शकत हे समजत.

Leave A Reply

Your email address will not be published.