वाईट हे आहे की भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असताना ते गेले…

बहुजनांत रूढ असलेलं भारूड सातासमुद्रापार पोहचवणारे भारुडरत्न, भारुडसम्राट निरंजन भाकरे काल आपल्यातून गेले. लोककलेचा वारसा कसा वाढवायचा आणि जोपासायचा याचं पुरेपूर भान आणि जाण असलेला एक खंदा शिलेदार महाराष्ट्र्ने गमावलाय. मातीशी प्रामाणिक राहून अत्यंत हलाखीच्या परिस्थितून दिवस काढलेल्या निरंजन भाकरे यांचा जीवनप्रवास अक्षरशः भारावून टाकणारा आहे.

माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यातील प्रोडक्शन म्हणजे भारूड आणि ती भारुडरूपी लस सर्वाना टोचणारे आणि जनमानसात प्रचंड लोकप्रिय असलेले लोककलावंत म्हणजे निरंजन भाकरे.

१० जून १९६५ साली निरंजन भाकरे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद नावाच्या छोट्याश्या खेड्यात झाला. वडिलांचा शिंपी कामाचा व्यवसाय होता. त्यांच्या आईवडिलांची सात अपत्य जन्मताच देवाघरी गेलेली . एक भाऊ आणि एक बहीण अशी भावंडे निरंजन भाकरेंना होती.

निरंजन भाकरेंच्या जन्माच्या वेळी एकतर बाळ जगेल किंवा आई जगेल इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली. त्यावेळी त्यांच्या धार्मिक वडिलांनी निपट निरंजन नावाच्या महाराजांना नवस केला. बाळ आणि आई दोन्ही सुदैवाने वाचले. त्यांच्या नावावरुन बाळाचं निरंजन नाव ठेवण्यात आलं.

वयाच्या सातव्या वर्षी निरंजन भाकरेंचे वडील गेले. घरी गरिबी पाचवीला पुजलेली. अन्नान दशा झालेली. त्यावेळी दुष्काळ पडलेला आणि दुष्काळी कामाच्या ठिकाणी मजुरांच्या तांड्यावर निरंजन भाकरे आणि त्यांची बहीण गाणी गायचे आणि भाकरी मिळवायचे.

त्यावेळी त्या गावात सुगडीची गाडी यायची. हि सुगडी मजुरांच्या पोटापाण्यासाठी होती.  गाडी आल्यावर ती सुगडी मिवण्यासाठी झुंबड उडायची. तेव्हा हि लहान भावंडे वाटी घेऊन त्या वाटीच्या ठेक्यावर गाणी वाजवून म्हणायची.आईने लिहिलेल्या गाण्यात निरंजन भाकरेंनी लहानपणी काही शब्द टाकले आणि ते गाणं ते म्हणत असत त्या गाण्यामध्ये मजुरांच्या जीवनाचं दर्शन त्यांनी घडवलं,

छुम छुम ठुमकत चाले , चाले बैलाची जोडी आली,  सुगडीची गाडी….

बारा वाजेच्या टायमाला पांड्या सुगडीची गाडी आली

सुगडी घेण्यासाठी धोंड्या गाडीवर धाव घाली ,

गर्दी पाहता सायबानी थोबाडीत हाणली,  आली सुगडीची गाडी ……

इतक्या लहान वयात त्यांनी लिहिलं इथूनच त्यांचा खरा लोककलेकडे प्रवास सुरु झाला.

सातवीनंतर दुसऱ्या गावच्या शाळेत ते जाऊ लागले. शाळा सातला असायची पण निरंजन भाकरे हे पहाटे चारला जाऊन तिथल्या शिक्षकांच्या घरी पाणी भरायचे, दुकानाच्या पाट्यांवर नाव टाकायचे त्यातून जे काही मिळेल त्यावर गुजराण करायचे. दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

बऱ्याच छोट्यामोठ्या कंपनींमध्ये त्यांनी कामे केली. त्याच सुमारास त्यांचं लग्नही झालं. त्यांच्या पत्नीने गल्लीतले मुलं गोळा करून अंगणवाडी उभारली, त्यावेळी त्यांना ५० रुपये पगार महिन्याला होता.

एका रद्दीत पडलेल्या पेपरमध्ये त्यांनी अशोक परांजपे यांच्याबद्दल ऐकलं आणि लोककलेच्या ध्यासाने त्यांनी परांजपेंना गाठलं. अशोक परांजपे यांनी योग्य मार्गदर्शन करून निरंजन भाकरेंच्या सोंगी भारुडाचं चित्रीकरण केलं. इथून त्यांच्या लोककलेच्या प्रवासाला सुरवात झाली.

पुढे त्यांनी पिंगळा, वासुदेव अशा अनेक लोककला प्रकारातून समाजप्रबोधन केलं. या भारुडातून त्यांनी ९ या अंकाची नव्याने ओळख करून दिली ती अशी,

रामाचा जन्म ज्या तिथीला झाला त्या तिथीनेसुद्धा आपली मर्यादा सोडली नाही.नवमीला रामाचा जन्म झाला म्हणून उजळणीतील ९ च्या पाढ्यातील कुठल्याही अंकाची बेरीज हि नऊच येते, आईच्या उदरात आपण नऊ महिने नऊ दिवस राहतो म्हणून रामजन्म आणि मानवी जन्म यांची हि अशी भक्कम गाठ आहे. ज्या गोष्टीत राम आहे ती गोष्ट निरंतर आहे असा संदेश त्यांनी दिला.

सुया घे, पोत घे, फणी घे माय, घे गजग घे, कारगुज मणी घे, फणी घे माय

हि केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे

ये गं सुबा बिबा घे तुझ्या लाडक्या छबीला झुबा घे

बिबा माहितीय ना जी ,

लहान लेकराला खोकला लागला तर बिब्याचं तेल आणि आईच चमचाभर दूध घे ते लेकराला दिलं तर लेकरांचा खोकला जातो ,

जसं लेकरांचा खोकला जाण्यासाठी आईच दूध आणि बिब्याचं तेल गरजेचं आहे अगदी त्याचप्रकारे समाजाचा खोकला जाण्यासाठी हा बिब्बा माझ्या प्रबोधनाचा घे तुझ्या गावच्या एकात्मतेला पाज त्यातून ग्रामविकासाचं तेल काढ , समाजप्रबोधनाचा चमचा घे आणि त्या लेकराला देऊन टाक.

इतक्या सोप्या भाषेत त्यांनी लोकांना समजावून सांगितलं आणि गावोगावी प्रबोधन केलं. बये तुला बुरगुंडा होईल गं या गाण्याचे जनक म्हणजे निरंजन भाकरे. बुरगुंडा हा प्रकार समाजप्रबोधनाच्या कामात किती महत्वाचा आहे हे हि त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं,

बुरगुंडा हि वैदूप्रधान समाजातली एक स्त्री आहे. हातात एका काठीवर ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या किरकोळ असणाऱ्या गोष्टी सुया, फणी, बिबे, पोथी, पिना ती विकते. चतकोर भाकरी आणि पळीभर कालवणासाठी पाठीला लेकरू बांधून ती गाणी गात गात आपला माल विकत ती गावाला उदाहरणार्थ जागवण्याच काम करते.  केवळ पैशाचा व्यवहार न करता अन्न आणि वस्तूची देवाणघेवाण कशी असावी याची रीत ती तिच्या पुढच्या पिढीला म्हणजे पाठीवरच्या लेकराला एक प्रकारे समजावून सांगत असते.

जगण्याचं मॅनेजमेंट कसं असतं ह्याच विद्यापीठ म्हणजे बुरगुंडावाली बाई…

अशा अनेक प्रकारे त्यांनी स्त्री पात्रांचं दर्शन जगाला घडवलं आणी पुढे अमेरिकेच्या शिकागोमध्ये बुरगुंडा हा लोककला प्रकार त्यांनी सादर केला. महाराष्ट्राची लोकधारा, मराठी बाणा अशा अनेक कार्यक्रमात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

ज्या गावात कार्यक्रम करत असत तिथे जन्मणाऱ्या मुलीला ते स्वखर्चातून पाच हजार रुपये तिच्या कुटुंबाला देत असत पुढील शिक्षणासाठी. अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली.

१४ फेब्रुवारी २०१५ साली मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर त्यांनी भारुडाकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ३२ किलो वजनी अंगरखा परिधान करून तब्बल ३ तास त्यांनी भारूड सादर करून त्यातून आठ पात्रे साकारली. हा एक विश्वविक्रम होता.

कलावंत जगावा यासाठीसुद्धा ते आघाडीवर होते. मुंबई लोककला अकादमी विभागात ते भारूड शिकवायचे. अनेक लोककलावंतांची त्यांनी आर्थिक अडचण मिटवली. कलाकारांच्या बाबतीत त्यांचं वाक्य खरंच मोलाचं आहे,

तरुणपणात कलावंत घराबाहेर जातो

म्हातारपणात कलावंत घरात येतो….

सपत्नीक अवयवदान करण्याचा त्यांचा निर्धार होता. आज हा तारा महाराष्ट्राच्या लोककलेतून निखळला आहे आणि महाराष्ट्राचं न भरून येणार नुकसान झालं आहे.

  • दुर्गेश काळे

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.