सरकार फक्त संस्कृती म्हणून तमाशाला मिरवते पण कोरोनामध्ये एकही मंत्री विचारायला आला नाही

बापजाद्यांनी दिलेली ढोलकी जन्मभर पुरेल अशी दौलत होती. ढोलकी वाजवायला शिक जिंदगीत कधी उपाशी मरणार नाही असा मंत्र त्यांनी दिलेला. कैक तमाशे या ढोलकीवर गाजवले. वाजवायचा नाद होता त्यामुळे दुसरं कामही शिकलो नाही. ढोलकीच्या आणि तमाशाच्या जीवावर उदरनिर्वाह चालायचा.

पण या महामारीने सगळा लॉकडाउन मी घरात बसून काढला, आज तमाशा चालू होईल, उद्या चालू होईल या आशेवर थांबून होतो पण आता पुढचं सगळं धूसर दिसतंय. खायचं काय हा प्रश्न मोठा आहे.

हे उद्गार आहेत कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळातील शैलेश भांडारे या ढोलकी वादकाचे.

ज्या महाराष्ट्रात ही लोककला इतक्या वर्षांपासून नांदत होती ती आज देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर उभ्या महाराष्ट्राला ताल धरायला लावणाऱ्या या लोककलावंतांसमोर सध्या जगायचे प्रश्न तयार झाले आहेत. तमाशाची विरत चाललेली कनात, गर्दी ना करण्याच्या नियमामुळे प्रेक्षकांचा कमी होत चाललेला ओढा, सावकारांची वाढत चाललेली कर्जे या कात्रीत सध्या तमाशा सापडला आहे.

महाराष्ट्र प्रत्येक तमाशा फडाची जवळपास हीच परिस्थिती आहे. कोरोनामुळे गावोगावी फिरून गावच्या सुपाऱ्या घेणे, गावखेड्याच्या लोकांशी संपर्क साधने, गाड्यांची कामे ,इतर बारीकसारीक कामे करणे या सगळ्याच गोष्टी आता थांबल्या आहेत. गावच्या जत्रा यात्रा बंद झाल्या तेव्हापासून या कलावंतांवर अक्षरशः घरी बसण्याची वेळ आली आहे.

रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर शफी शेख सांगतात की,

इतक्या दिवसांपासून तमाशाचं व्यवस्थापन बघतो पण कधी इतकी बिकट वेळ आमच्यावर आली नव्हती. तमाशा सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये लागतात. रोजचा खर्च साठ हजार रुपये असतो. तमाशात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला वेळच्या वेळी पैसे देण्यासाठी तेवढा गल्ला जमला नाही तर कर्ज काढून पैसे वाटावे लागायचे पण, आता आम्हालाच आमचा उदरनिर्वाह कर्ज काढून करावा लागत आहे.

महाराष्ट्रभरात एकूण 22 फड होते त्यापैकी तमाशा मालक गेल्यामुळे, कर्ज झाल्यामुळे बुडाले, आता सध्या नामांकित फक्त 11 फड महाराष्ट्रात आहेत. 125 छोटे तमाशे आहेत, 20 छोटे विना तंबूचे तमाशे उरले आहेत, तेही पुढे किती टिकतील याची शक्यता नाही.

आधीच मोबाईल मुळे हल्लीची पिढी तमाशा विसरून गेली आहे. त्यात या संकटांनं आम्ही नामशेष होण्याच्या मार्गावर आलो आहे.

रेणुका थोरात या मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळात लावणी कलावंत म्हणून काम करतात. पण त्या सध्या घरकाम करून जितके पैसे मिळतील त्यावर गुजराण करत आहेत. त्या म्हणतात,

तमाशे बंद झाल्यामुळे ज्या कलेच्या जीवावर पोट भरायचं तीच हातातून गेली तर पुढे जगायचं कस याची भीती वाटत आहे. आता घरकाम करून आजूबाजूच्या लोकांकडून उधार पैसे आणून दिवस ढकलत आहे. तमाशा फड मालक थोडीफार मदत करत आहे. पण ते लोकही कर्जात बुडाले आहेत त्यामुळे सगळीकडुन कोंडी झाली आहे.

कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या फडातील कलावंत मुथा शेट सांगतात की,

आजवर शासनाने अजूनही मदत जाहीर केलेली नाही. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आमची परवड लक्षात घेऊन तमाशा परिषदेला पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. आम्ही समाजमाध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. कुणी शंभर, दोनशे पाचशे अशी मदत करत आहे.

बाकी एकही मंत्री अजूनही आम्हाला विचारायला आलेला नाही. सरकार फक्त आमची संस्कृती म्हणून तमाशाला मिरवते पण वास्तवात तस काहीही नाहीए.

महाराष्ट्र आणि लोककला हे आपण जितकं अभिमानाने मिरवतो म्हणजे फक्त मिरवतोच, बाकी सद्यस्थिती बघता या तमाशा कलावंतांची आणि लोककलाकरांची परिस्थिती काय आहे याची साधी चौकशी सुद्धा आपण करत नाही. या लोककला आता काय स्थितीत आहे, एकेकाळी रंगमंच गाजवणारे हे दिग्गज लोकं अचानकपणे कुठे गायब झालीत, कुठूनतरी समाजमाध्यमांवर ती दिसली, त्यांचे दीनवाणे चेहरे आणि उपासमारीने होणारी त्यांची हाल हे न पाहवणार आहे.

कोरोना महामारीने सगळ्यांचंच कंबरडं मोडलं. लहान मोठे व्यवसाय डबघाईला आले, काहींचे कामं बुडाले त्यामुळे त्यांना दुसरा व्यवसाय शोधावा लागला पण तमाशा कलावंत आणि इतर लोककलाकार यांचं काय असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

जेव्हा विलासराव देशमुख आणि आर आर पाटील या दोघांनी खऱ्या अर्थानं लोककला जपली होती असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी तमाशा कलावंतांना 6 लाख रुपये अनुदान आणि 2 लाख रुपये भाग भांडवल अशी योजना तयार केली होती. पण जसा काळ आणि सरकार बदलत गेले तशी ती योजनाही मागे पडली. या कलावंतांना या योजनेचा शेवटचा लाभ 2017 साली मिळाला होता.

आताच्या सरकारनं अनुदान, भाग-भांडवल राहील पण कमीत कमी जगण्यासाठी मदत म्हणून थोडीशी रक्कम द्यावी एवढीच या कलाकार मंडळींची माफक अपेक्षा आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.