भोजपुरी गाण्यांना पॉपचा तडका मिळाला आणि वासेपूरचा २७ गाण्यांचा अल्बम हिट झाला.

गँग्स ऑफ वासेपूर हा ज्यावेळी रिलीज झाला तेव्हा बेक्कार पडला होता, पण पहिला पार्ट पडला कमी होता कि काय थोड्याच दिवसांनी दुसरा पार्ट आला गँग्स ऑफ वासेपूर २ म्हणून तोही पहिल्यासारखाच बॉक्स ऑफिसवर पडला. पण नंतर काय जादू झाली असावी काय माहिती हळूहळू हे दोन्ही सिनेमे लोकांच्या आवडत्या पिच्चरच्या यादीत जाऊन बसले.

इतकंच नाही तर यातले पात्र त्यांचे स्वभाव लोकं स्वतःशी जुळवून बघू लागले. वासेपूरच्या पात्रांशी स्वतःला रिलेट करू लागले. आता जितकं कौतुक वासेपूरच्या दोन्ही भागांचं झालं तितकं तेव्हा झालं नव्हतं. पण एकेकाळी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेले हे दोन्ही सिनेमे अनुराग कश्यपच्या करिअरला चार चांद लावून गेले. कल्ट क्लासिक सिनेमे म्हणून वासेपूरकडे बघितलं जाऊ लागलं. 

सिनेमा जितका अंडररेटेड होता तितकीच यातली गाणीही अंडररेटेड होती. खऱ्या अर्थाने लोकसंगीत काय असतं, ग्रामीण भागातल्या गायकांची आवाजाची शैली काय असते, पॉप संगीत आणि लोकसंगीत यांचं मिश्रण म्हणजे वासेपूरची गाणी आहेत.

वासेपूर बघताना यातील गाणी काहींना आवडली नाही तर काहींना यातील गाणी इतकी आवडली कि संपूर्ण अल्बम त्यांचा पाठ असतो. भोजपुरी, बिहारी गाण्यांना पॉपचा तडका देऊन स्नेहा खानवलकरने अस्सल म्युझिक शौकिनांना एक प्रकारची संगीत मेजवानी बहाल केली.

गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमाची संगीतकार होती स्नेहा खानवलकर.

ए आर रेहमाननंतर उत्तम म्युझिकल एक्स्पेरिमेंट स्नेहा खानवलकरने वासेपूरमध्ये केला. या दोन्ही सिनेमाची गाणी एका वर्षात स्नेहाने पूर्ण केली होती.

यासाठी तिने कॅरेबियन आणि इतर अनेक देशांच्या लोकसंगीताचा आणि पॉप कल्चरचा अभ्यास केला होता पण अंमलात आणला तो पूर्णतः देशी पद्धतीने.

वासेपूरमधील कुठलही गाणं घ्या ते संपूर्णपणे वेगळ्या धाटणीचं आहे. लोकसंगीतात असणारी विविधता या सिनेमातल्या गाण्यात दिसून येते. दोन्ही पार्टमधे मिळून एकूण २७ गाणी होती. पहिल्या पार्टमधे जिया तू बिहार के लाला, एक बगल में चांद होगा एक बगल में रोटीया, ओह वुमनिया, ‘तेरी केह के लुंगा हि गाणी प्रचंड हिट झाली होती. या सिनेमासाठी वरुण ग्रोव्हर आणि पियुष मिश्रा या दोघांनी गीतलेखन केलं होतं. 

काही गाणी हि बिहारच्या पारंपरिक गाण्यांमधूनच बनवली गेली होती आणि बिहारच्या लोकल गायकांना यात गाण्याची संधी देण्यात आली होती. पियुष मिश्रा, अमित त्रिवेदी, स्नेहा खानवलकर, खुशबू राज अशा अनेक गायकांनी या सिनेमासाठी गाणी गायली होती. हा आजवरचा बॉलिवूडमधील सगळ्यात वेगळा म्युझिक अल्बम होता.

या सिनेमातली गाणी लोकांच्या वेगवेगळ्या मूडनुसार आणि आवडीनुसार होती त्यामुळे हा म्युझिक अल्बम चांगलाच हिट झाला होता. दुसऱ्या भागात छिच्छा लेदर, काला रे, मुरा, तार बिजली के हि गाणी भयंकर गाजली होती. पण यातलं एक पात्र आणि त्याची गाण्याची स्टाईल हे सिनेमामध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं होतं. 

यशपाल शर्माने साकारलेला बेंजो पार्टीवाला म्हणा किंवा ऑर्केस्ट्रावाला. या पात्राचा आणि त्याच्या गाण्याचा एक वेगळा फॅनबेस आहे. वाढदिवस, लग्न, मिरवणूक आणि अंत्यविधी अशा सगळ्या ठिकाणी त्याची गाणी वाजत असतात. वासेपूर सिनेमा जितका राडे, खून, गोळीबार अशा प्रकरणाने भरला असला तरी हे ऑर्केस्ट्रावाला सगळीकडे हजर असतो त्याला वासेपूरच्या राजकारणाचा फरक पडत नसतो.

यशपाल शर्माचं हे पात्र एका विशिष्ट आणि वेगळ्या स्टाईलने गाणं गाताना दिसतं.

र ऐवजी ड किंवा स ऐवजी श शब्द गाणं हे इतकं खतरनाक पद्धतीने त्या पात्राने गायलं आहे कि काही काळाने आपल्याला त्याने गायलेलं गाणंच ओरिजनल आहे असं वाटू लागतं.

याद तेडी आयेगी मुझको बडा शतायेगी, तेडी मेहेरबानिया, सलामे इष्क हि गाणी त्या त्या सीनला एकदम परफेक्ट बसली आहेत.

बॉलिवूडमध्ये हा एक वेगळा प्रयोग नंतर नंतर यशस्वी ठरला. त्या त्या भागातील ग्रामीण लोकसंगीत आणि त्याच मातीतले शब्द त्याला पॉपचा तडका देऊन हा सिनेमा आणि गाणी दोन्ही उत्तम हिट झाली. कल्ट क्लासिक अल्बम म्हणून जरी वासेपूरची गाणी असली तरी ती आजही लोकं त्याच आवडीने ऐकतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.