आचरेकर सरांच्या तालमीत सचिन, कांबळीपेक्षाही एक जबरदस्त बॅट्समन होता…

रमाकांत आचरेकर. भारतीय क्रिकेट इतिहासातील महान कोच. कारण त्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर पोहचवणाऱ्या क्रिकेटरला म्हणजे सचिन तेंडुलकरला घडवलं. क्रिकेटमध्ये संधीच सोनं करता आलं पाहिजे तर तुमचं अस्तित्व टिकून राहतं. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी बरोबरच एक अजून खेळाडू होता त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

प्रवीण आम्रे हे नाव आपण खेळताना भलेही ऐकलं नसेल पण वृत्तपत्रांमध्ये कायम कोच म्हणून त्यांचं नाव डोळ्यासमोर येत असतं. नवी पिढी क्रिकेटमध्ये घडवण्याचं श्रेय जितकं राहुल द्रविडला दिलं जातं तितकंच ते प्रवीण आम्रे यांनासुद्धा दिलं जातं. क्रिकेट करिअरमध्ये सुरवातीच्या काळात जबरदस्त कामगिरी करणारे प्रवीण आम्रे पुढे मात्र विशेष काही चमक दाखवू शकले नाही.

प्रवीण आमरेंनी आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावलं तेही विदेशी जमिनीवर हा एक मोठा विक्रम नोंदवला गेला होता. पहिल्याच मॅचला आपल्या नावाची हवा करणारे आम्रे दीर्घकाळ टेस्ट क्रिकेटमध्ये स्थिरावू शकले नाही. वनडेमध्येसुद्धा चांगली बॅटिंग करूनही जास्त संधी आमरेंना मिळाली नाही.

रमाकांत आचरेकर यांनी प्रवीण आमरेंचा सुरवातीचा खेळ बघून सांगितलं होतं कि तो सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा खेळाडू आहे आणि तो दीर्घकाळ भारताकडून खेळेल. मुंबईतून बाहेर पडलेल्या प्रवीण आमरेंची गणना हि कुशल आणि जबाबदार फलंदाजांमध्ये होत असे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासोबत प्रवीण आमरे बराच काळ क्रिकेट खेळत होते.

१४ ऑगस्ट १९६८ रोजी प्रवीण आमरेंचा जन्म झाला. रमाकांत आचरेकरांच्या तालमीत क्रिकेटचं शिक्षण घेतलेल्या आमरेना पहिली संधी मिळाली ती १९९२-९३ च्या आफ्रिका दौऱ्यावर. आफ्रिकेतल्या डरबन सारख्या मैदानावर वेगवान गोलंदाजांची चलती असायची त्या मैदानावर प्रवीण आमरेंनी पहिल्याच मॅचमध्ये शतक झळकावून आपली क्षमता दाखवून दिली. हा एक मोठा विक्रम होता.

त्यावेळी पदार्पणातच टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत प्रवीण आम्रे हे ९ व्या क्रमांकावर होते. मिडल ऑर्डरमध्ये ६ व्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन आमरेंनी १०३ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. ऍलन डोनाल्ड, ब्रायन मॅकमिलन आणि मेरिक प्रिन्गल अशा सगळ्या आफ्रिकन गोलंदाजांचा चौफेर समाचार आम्रे यांनी घेतला होता. 

प्रवीण आमरे यांनी त्यांच्या करिअरमध्ये  ११ टेस्ट सामन्यांमध्ये ४२५ धावा केल्या. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. १९९२ मध्ये टेस्ट डेब्यू केलेल्या आमरेंच टेस्ट करियर १९९३ लाच संपलं. वनडेमध्ये आम्रे विशेष चमक दाखवू शकले नाही. ३७ वनडे सामन्यांमध्ये ५१३ धावा त्यांनी जमवल्या.

ज्यावेळी आम्रे यांना संघातून वगळण्यात आलं तेव्हा लोकं त्यांना याबद्दल बोलायचे त्यावेळी आम्रे उत्तर म्हणून सांगायचे कि मी माझ्याकडून १०० % प्रयत्न केले आता बाकीचे निर्णय माझ्या हातात नाही. संधी न मिळाल्याने पुढे प्रवीण आम्रे कोच झाले. २०१२ साली ज्यावेळी उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर १९ चा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी कोचपदी प्रवीण आम्रे होते. पुढे आयपीएलमध्ये ते पुणे वॉरियर्स इंडियाचे कोच बनले. 

प्रवीण आम्रे यांना अनेक खेळाडूंच्या बॅटिंग सुधारण्यात मोठा वाटा मानला जातो. यात अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांची नावे सामील आहेत. एकेकाळी सचिनपेक्षाही जबरदस्त खेळाडू असणाऱ्या आमरेंना पुरेशा संधी न मिळाल्याने त्यांना कोचपदावरच समाधान मानावं लागलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.