हिटलरला मूर्ख बनवणारा भारतीय गुप्तहेर, ज्याने दुसऱ्या महायुद्धात ५ देशांसाठी हेरगिरी केली !

भगत राम तलवार

भारतीय गुप्तचरांच्या इतिहासातील अतिशय महत्वपूर्ण नाव. एक असा माणूस ज्याने केवळ हिटलरला आणि त्याच्या नाझी पक्षालाच मूर्ख बनवलं नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या ५ वेगवेगळ्या देशांसाठी हेरगिरी केली. विशेष म्हणजे क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रचंड निष्ठा असणाऱ्या या माणसावर त्यांनाच धोका देण्याचा आरोप देखील झाला.

silver

नेमका कोण होता हा माणूस आणि त्याने कशाप्रकारे सुभाषबाबूंना मदत केल्यानंतर देखील त्याच्यावर सुभाषबाबूंचा विश्वासघात केल्याचा आरोप का झाला याचा उलगडा पत्रकार आणि लेखक मिहीर बोस यांच्या ‘सिल्व्हर- द स्पाय हू फुलड द नाझीज’ या पुस्तकातून होतो.

कोण होते भगत राम तलवार…?

भगतराम तलवार यांचा जन्म १९०८ साली वायव्य सरहद प्रांतातील एका आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा कुटुंबात झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांचे, गुरुमलदास यांचे इंग्रजांशी अतिशय चांगले  संबंध होते. पण जालियानवाला बाग येथील अमानुष हत्याकांडानंतर मात्र त्यांचे विचार बदलले आणि ते इंग्रजांचे विरोधक झाले.

भगत राम यांचे मोठे बंधू देखील क्रांतिकारक होते. ब्रिटीश सरकारने पंजाबच्या गव्हर्नरच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून १९३१ साली त्यांना फाशी दिली होती. साहजिकच भगत राम यांच्या मनात ब्रिटीश सत्तेविरोधात प्रचंड रोष  होता. शिवाय आजूबाजूला क्रांतिकारकांच्या चळवळी सुरु होत्या.

देशभक्तीने भारलेल्या भगत राम यांनी काँग्रेसबरोबर काम करायला सुरुवात केली आणि स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वाहून घेण्याचा निर्णय घेतला. गांधीजींच्या असहकार आंदोलनात ते तुरुंगवास देखील भोगून आले. मात्र त्यांच्यावर भगतसिंग यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला आणि भगतराम यांनी त्यांनी कम्युनिस्टांच्या ‘कीर्ती किसान पार्टी’ या संघटनेत काम करायला सुरुवात केली.

भगत राम बनले ‘रहमत खान’ !

१९४१ साली त्यांच्यावर एक अतिशय महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारी होती सुभाषचंद्र बोस यांना सुरक्षितपणे सोव्हियत रशियात घेऊन जाण्याची. याच जबाबदारीमुळे तलवार यांचा हेरगिरीच्या विश्वात प्रवेश झाला आणि हेरगिरीसाठी भगतराम हे ‘रहमत खान’ बनले !

भारतातून रशियाकडे जाणाऱ्या प्रवासात सुभाषबाबूंना घेऊन भगतराम काबुलला पोहोचले पण पुढे रशियात जाण्यासाठी ना त्यांच्याकडे व्हिसा होता ना पासपोर्ट. आता या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी भगतराम यांनी आपल्या आधीच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने प्रयत्न सुरु केले. पण ना काबुलमधील रशियन दूतावासाकडून मदत मिळत नव्हती ना जर्मन सहाय्य करायला तयार होते.

इटलीची मदत आणि हेरगिरीस सुरुवात

या परिस्थितीत भगत राम यांनी जे केलं ते करायला सिंहाचंच काळीज हवं. भगत राम यांनी काबुलमधील इटलीच्या दुतावासात अक्षरशः खुसखोरी केली. ही घुसखोरी त्यांच्या जीवावर देखील बेतू शकली असती. दुतावासात घुसून त्यांनी इटालियन राजदूत पिएत्रो क्वारोनी यांची भेट घेतली. त्यांना आपली ओळख रहमत खान अशीच करून दिली.

रहमत यांनी क्वारोनी यांना भेटून सुभाषबाबूंविषयी सांगितलं. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि या युद्धात इटलीसाठी ब्रिटन हे शत्रू राष्ट्र होतं. त्यामुळे जवळपास ३ आठवड्यांच्या भेटीगाठीनंतर क्वारोनी यांनी भगत राम यांना मदत करण्याची तयारी तर दाखवली पण त्याबदल्यात इटलीसाठी ब्रिटीशांची हेरगिरी करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. रहमत यांनी हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि ते इटलीचे हेर म्हणून काम करू लागले.

क्वारोनी यांनी पासपोर्ट मिळवून देण्यात केलेल्या मदतीमुळे सुभाषबाबू रशियात पोहोचले परंतु रशियाने मदतीस नकार दिल्याने ते पुढे जर्मनीत गेले. जर्मनीत सुभाषबाबूंनी हिटलरची भेट घेतली त्यावेळी सुभाषबाबूंनी भगत राम यांची ओळख आपले इंडियन एजंट म्हणून करून दिली होती.

जर्मनीच्या नाकाला चुना

दरम्यानच्या काळात क्वारोनी यांच्या इटलीसाठी हेरगिरी करत असतनाच भगतराम यांनी जर्मनीसाठीही हेरगिरी करायला सुरु केली होती. क्वारोनी यांनीच त्यांची भेट जर्मन अधिकाऱ्याशी घालून दिली होती, कारण महायुद्धात इटली आणि जर्मनी दोस्त राष्ट्रांच्या विरोधात होते. जर्मन अधिकारी रहेमत यांच्या कामगिरीने अतिशय प्रभावित झाले होते.

भगत राम यांच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या जर्मनांनी त्यांना ‘आयरन क्रॉस’ या तत्कालीन जर्मनीतील सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवलं होतं. शिवाय त्यांना एक ट्रान्समीटर देण्यात आला होता ज्याआधारे ते हिटलरच्या ‘अब्वेहर’ या बर्लिनस्थित गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयाशी थेट संबंध साधू शकत होते.

महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनी आणि रशिया यांच्यात सख्य होतं पण जेव्हा हिटलरने रशियावर आक्रमण केलं त्यावेळी कम्युनिस्ट विचारसरणीच्या भगत राम यांना हा धक्काच होता. त्यामुळे त्यांनी रशियासाठी जर्मनीची हेरगिरी करण्याचा निर्णय घेतला आणि जर्मनीमधील गुप्त गोष्टींची माहिती ते रशियाला पुरवू लागले. सोबतच ते जपानसाठीही हेरगिरी करतच होते.

दुसऱ्या महायुद्धात रशिया दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरल्यानंतर ब्रिटनने देखील रहेमत खान यांच्याकडून हेर म्हणून काम करून घ्यायला सुरुवात केली. रशिया आणि ब्रिटन या दोहोंसाठी देखील रेहमत काम करायला लागले.

सिल्व्हर हे नाव कुणी दिलं..?

silver2
कॅप्टन पीटर फ्लेमिंग

ब्रिटीशांचे गुप्तहेर म्हणून काम करताना त्यांचा संबंध कॅप्टन पीटर फ्लेमिंग यांच्याशी आला. पीटर फ्लेमिंग म्हणजे जेम्स बाँडला जन्मास घालणाऱ्या इयान फ्लेमिंग यांचे बंधू. फ्लेमिंग यांनीच भगत राम यांना ‘सिल्व्हर’ हे नाव दिलं होतं. फ्लेमिंग यांनी सिल्व्हर हे नाव अशासाठी दिलं होतं कारण या नावाचा एक अधिकारी लंडनमध्ये भूमिगत म्हणून काम करत होता.

ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत असतानाच ते जर्मनीचे एजंट म्हणून देखील काम करत होते पण ते जर्मनांना खोटी माहिती पुरवत आणि त्यांचं लक्ष भरकटेल याची काळजी घेत होते. जर्मनांचं लक्ष भरकटवण्यासाठी त्यांनी ‘अखिल भारतीय क्रांतिकारी समिती’ नावाच्या संघटनेमार्फत भारतात अनेक कारवाया घडवल्या जात असल्याच्या खोट्याच बातम्या देखील त्यांना पाठवल्या होत्या. विशेष म्हणजे अशी कुठली संघटनाच अस्तित्वात नव्हती. ती फक्त भगतराम यांच्या डोक्यातून आलेली एक कल्पना होती.

भगत राम यांनी सुभाषबाबूंचा विश्वासघात केला का..?

एकीकडे सुभाषबाबू भारतीय स्वातंत्र्यासाठी जर्मनी आणि जपानची मदत मिळविण्याचा प्रयत्न करत असताना भगतराम हे जर्मनीविरोधात ब्रिटिशांना आणि रशियाला मदत करत होते. त्यामुळे भगतराम यांनी सुभाषबाबूंना धोका दिला असा आरोप होतो पण या गुप्तहेरांच्या विश्वातील माहीर माणसाच्या भूमिकेविषयी काहीही खात्रीलायक वक्तव्य करता येत नाही. शिवाय ज्या ब्रिटिशांनी भगतराम यांच्या भावाला फाशीची शिक्षा दिली होती त्या ब्रिटीशांशी तरी ते एकनिष्ठ राहिले असतील असं कसं मानता येईल..?

मिहीर बोस यांच्यानुसार महायुद्धाच्या काळातील हेरगिरीच्या कामासाठी जर्मनी आणि इटली या दोन्ही देशांकडून भगतराम यांना आजच्या काळातील हिशेबानुसार सांगायचं झालं तर जवळपास १८ कोटी रुपये इतकी भरमसाठ रक्कम मिळाली होती. यातली बहुतेक रक्कम त्यांनी कम्युनिस्ट साथीदारांना शस्त्रास्त्र खरेदीसाठी आणि आदिवासी समूहांना ब्रिटिशांविरोधात संघटन उभारण्यासाठी मदत म्हणून दिली होती.

दुसरं महायुद्ध संपलं. त्यानंतर १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतरच्या काळात भगतराम गायबच झाले. अनेकांना वाटलं की ते मारले गेले असावेत. पण अचानक १९७३ साली ते कोलकात्यात अवतरले. निमित्त होतं ‘पहिला आंतरराष्ट्रीय नेताजी सेमिनार’ या सेमिनारमध्ये भगतराम अवतरले आणि त्यांनी आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये ‘माय फिफ्टी फाईव्ह डेज विथ नेताजी’ नावाचा पेपर सबमिट केला. याचवेळी त्यांनी आपण शेवटपर्यंत नेताजींशी एकनिष्ठ राहिल्याचं देखील ठासून सांगितलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.