राजे आत्राम चुकले आणि युवक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला

भारत एक सार्वभौम देश म्हणून आकाराला येण्यापूर्वी अनेक छोटी छोटी राज्य, संस्थान यांच्यामध्ये ओळखला जात होता. इथं जनतेचे प्रतिनिधी, राजे यांच्यामार्फत काम चालत असे. या राजा – महाराजांचा जनतेवर प्रचंड प्रभाव होता. पण पुढे देशातील संस्थाने खालसा झाल्यानंतर व राजेपद अधिकृतपणे गेल्यावर तिथल्या राजांचा जनतेवरचा प्रभाव झपाट्याने ओसरला.

मात्र याला अपवाद ठरले होते ते अहेरीचे आत्राम राजघराणे.

कारण आत्राम घराण्याने पुढे राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे आपल्या प्रभावाचा फायदा त्यांना राजकारणात देखील झाला. स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत या भागाने आत्राम घराण्याला साथ दिली. विशेष म्हणजे हे घराणे काँग्रेसविरोधी असून देखील जनतेचा कौल त्यांनाच होता.

इथल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर राजे विश्वेश्वरराव यांना १९७७ साली इथल्या जनतेनं निवडून दिले होते. सोबतच सिरोंचा विधानसभा मतदारसंघावर देखील २००९ पर्यंत याच राजघराण्याचे वर्चस्व राहिले. मात्र ठरला अपवाद तो केवळ फक्त १९८० चा!

कारण १९८० सालच्या निवडणुकीत राजे आत्राम यांच्या एका चुकीमुळे त्यांचा पराभव झाला.

या सोबतच त्यावर्षींच्या निवडणुकीतील काँग्रेसचा महाराष्ट्रातील पहिला विजय आणि विदर्भातील एकमेव बिनविरोध आमदार निवडून आले होते.

१९८० च्या निवडणुका या अनेक अर्थांनी विशेष होत्या. पवारांचं पुलोद सरकार पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९८० मध्ये सत्तेवर येताच बरखास्त केले होते. त्यामुळे दोन वर्षातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या.

अशावेळी इंदिरा गांधींना सोडून गेलेली अनेक मंडळी पक्षात परत येत होती. या वेळी पक्षात “७८ चे निष्ठावान’ व “उपरे’, असा वाद उफाळून आला होता. १९७७-७८ मध्ये इंदिरा गांधींच्या संकटकाळात साथ देणारे स्वत:ला “७८ चे निष्ठावान’ म्हणवून घेत होते. तर १९८० मध्ये परत आलेल्यांना ते उपरे आणि सत्तेसाठी आलेले म्हणत होते.

त्यावेळी अहेरी-सिरोंचा मतदारसंघात राजे सत्यवान आत्राम नाग विदर्भ आंदोलन समितीतर्फे उभे होते. या मतदारसंघातून राजघराण्यातीलच उमेदवार निवडून येत असे आणि येतो हा इतिहास आहे. तर आत्राम यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसकडून पेंटा रामा तलांडी उभे होते. पेंटा रामा तलांडी हे त्या वेळी युवक काँग्रेसचे एक सामान्य कार्यकर्ते होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. निवडणूक लढवायलाही त्यांच्याजवळ पैसे नव्हते.

मात्र तरीही ते निवडून आले होते.

यामागे आत्राम यांचीच एक चूक कारणीभूत होती. कारण निवडणुकीच्या अर्जात राजे सत्यवान आत्राम यांनी जातीच्या रकान्यात आपली जात “राजगोंड’ अशी लिहिली होती. पण, निवडणूक निर्णय अधिकारी परांजपे यांनी राजगोंड ही जात एसटी प्रवर्गात येत नाही म्हणून राजेंचा अर्ज नाकारला.

राजे यांचा अर्ज बाद झाला आणि युवक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला. पेंटा रामा तलांडी आमदार झाले.

गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी एकेठिकाणी या विजयाची आठवण सांगून ठेवली आहे. ते म्हणतात,

त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची सुरुवात झाली ती याच मतदारसंघातून. अर्थात विदर्भातून. सोबतच ते विदर्भातून बिनविरोध आमदार होणारे आजवरचे एकमेव उमेदवार आहेत. याचमुळे तलांडी यांचा विजय त्यावेळी राष्ट्रीय बातमीचा विषय झाला होता. ही निवडणूक संपूर्ण देशभरात गाजली.

सोबतच १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला आणि त्या वर्षीच्या निकालात काँग्रेसने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या. दणदणीत सत्तेत पुनरागमन केले. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदी पुनरागमन केले.

पेंटा रामा तलांडी मात्र त्यानंतर पुन्हा कधी आमदार बनले नाहीत. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आदिवासींसाठी राखीव आहे. त्यामुळे त्यानंतर ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नी सगुणा तलांडी यांनाही विधानसभा निवडणुकीत यश आले नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.