आणिबाणीच्या काळात देखील संजय गांधी करण थापरच्या घरात ट्रांझिस्टर दुरुस्त करायला जायचे..

करण थापर यांची संपूर्ण भारताला ओळख म्हणजे मोदींची ती कुप्रसिद्ध मुलाखत घेणारा पत्रकार. हा पठ्ठ्या ऐन मुलाखतीमध्ये गुजरात दंगलीचा प्रश्न विचारतो काय आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदी दोस्ती बनी रहे म्हणत काढता पाय घेतात काय? सगळंच नवल.

पण मोदीजी थापर यांना दोस्ती बनी रहे म्हणत होते पण थापर हे तर मित्र आहेत गांधी फॅमिलीचे. स्पेसीफिकली सांगायचं झालं तर ते एकेकाळी संजय गांधी यांचे फ्रेंड होते. 

आता गांधी घराण्याबरोबर मैत्री म्हणजे थापर हे तितक्याच तोलामोलाच्या श्रीमंत घराण्यातील असणार हे नक्की. करण थापर यांचे वडील प्राणनाथ थापर हे भारताचे लष्करप्रमुख होते. दिल्लीमध्ये आजही किंग जॉर्ज अव्हेन्यू नावाच्या भागात आर्मी हाऊस येथे त्यांचं घर होतं. तेव्हा पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू.

कित्येकदा प्राणनाथ थापर यांचे कुटूंबीय तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधानांच्या भेटीला जायचे.

तेव्हा तिथे पंडित नेहरू आपली मुलगी इंदिरा गांधी आणि नातू राजीव संजय सोबत राहायचे. तेव्हा संजय गांधी यांची थापर यांच्या मुलांशी ओळख झाली. प्राणनाथ थापर यांची थोरली मुलगी शोभा यांच्याशी त्यांची चांगलीच गट्टी निर्माण झाली होती.

संजय गांधी असेल तेरा चौदा वर्षांचा. शोभा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती. पण वयाचं अंतर त्यांच्या मैत्रीच्या आड आलं नाही. संजय अबोल होता. तो दुपारी शाळा सुटल्या नंतर थापर यांच्या घरी यायचा. संजय गांधी अबोल होता मात्र शोभा थापर बडबडी होती. तिच्याशी तो गप्पा मारायचा, दोघे पत्ते खेळायचे, गाणी ऐकायचे. घरातले इतर सदस्य देखील त्यांच्याबरोबर असायचे.

संध्याकाळ झाली तशी इंदिरा गांधींचा फोन यायचा. संजय गांधींचा होमवर्क राहिलेला असायचा म्हणून इंदिराजी काळजीत असायच्या. पण सन्ध्याकाळचा नाश्ता करूनच संजय पंतप्रधान निवास मध्ये परतायचा.

हि मैत्री मोठेपणी देखील अशीच टिकली. शोभा थापरच लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याशी देखील संजय गांधींचे सूर जुळले. त्याच्यासोबत देखील तो चहाचे कप रिचवत तासन तास गप्पा मारत बसायचा. परदेशात इंजिनियरिंग शिकण्यासाठी गेलेला संजय खूप काळ तिथे टिकला नाही. गाडयांची त्याला खूप हौस होती. रोल्स रॉयस कंपनीमध्ये इंटर्नशिप केली आणि भारतात मारुती कार बनवण्याचं स्वप्न घेऊन परत आला.

तोवर इकडे भारतात राजकीय चित्र बदलून गेलं होतं. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या होत्या. संजय गांधी एका दिल्लीत मेकॅनिककडे गॅरेजमध्ये कार बनवण्याच्या खटपटीला लागला होता. तेव्हा देखील तो बऱ्याचदा शोभा थापर यांच्या घरीच जेवायला वगैरे जायचा. अगदी तिथली वरणभात वगैरे खाऊन देखील स्वारी खुश असायची.

इतकं सगळं असूनही त्याच आणि करण थापर ची खूप मैत्री होती असं नाही. एकदा थापर बहीणभाऊ आणि संजय गांधी जीप घेऊन फिरायला गेले. छत्तरपूर भागात फिरताना शोभाने संजयला टेकड्यांवरून गाडी पळवण्याचं चॅलेंज दिलं. संजय गांधीने ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अगदी रॅश ड्राइव्हिंग केली. करण थापर वगैरे सगळे अगदी जीव मुठीत धरून बसले होते. संजय गांधी यांनी कसबस त्यांना घरी परत आणलं. पुन्हा त्याच्या गाडीत बसायचं नाही असं त्यांनी मनाशी ठरवलं.

पुढे संजय गांधी राजकरणात गेले. शोभा थापर देखील आपल्या नवऱ्यासोबत परदेशी गेल्या. इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीचा हा काळ. संजय गांधी तेव्हा भारताच्या राजकारणात पंतप्रधानाच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती बनला. अगदी केंद्रीय मंत्री देखील त्याला घाबरायचे. मोठमोठे अधिकारी संजय गांधींच्या इशाऱ्यावर काम करायचे.

इतक्या धामधुमीतहि संजय गांधीच थापर यांच्या घरी येणं जाणं चालूच असायचं. करण थापर यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. करण देखील तेव्हा शिकायला केंब्रिज येथे गेले होते. ते सांगतात,

“बऱ्याचदा माझी आई त्याला दाराची कडी दुरुस्त करून दे, ट्रान्झिस्टर दुरुस्त कर अशी कामे लावायची. आणिबाणीतला सर्वात ताकदवान राजनेता असलेला संजय गांधी आमच्या घरात जमिनीवर बसून ट्रान्झिस्टर दुरुस्त करतोय हे दृश्य मी कधीच विसरणार नाही.”

पुढे माझी आणि संजयची देखील मैत्री जमली. 

१९७६ सालच्या सुमारास करण थापर यांना संजय गांधींनी एकदा दिल्लीच्या फ्लाईंग क्लबवर नेले. संजय तिथे नेहमी जायचा आणि एक इंजिन असलेलं छोट विमान उडवायचा. त्या दिवशी करण थापरला देखील त्यांनी आपल्या विमानात बसवलं आणि तुला फ्लायिंग करायला शिकवतो म्हणून सांगितलं.

करण थापर खुश होऊन विमानात चढले मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सन्जय गांधी यांनी त्या दिवशी छत्तरपूर येथे जीप ज्याप्रमाणे पळवली होती अगदी त्याच्यापेक्षाही डेंजरस पद्धतीने त्यांनी विमान उडवलं. करण थापर यांना संजय गांधी विमानाच्या कसरती करून दाखवत होते आणि थापर कधी एकदा जमिनीवर जातोय असा विचार करत बसले होते. 

खाली जमिनीवरून शेतात काम करणारे शेतकरी त्यांना हात हलवून अभिवादन करत होते पण संजय गांधी यांनी वेगाने विमान इतक्या खाली नेलं कि ते सगळे शेतकरी जीव वाचवून धावू लागले.

करण थापर म्हणतात लोकांची उडालेली भांबेरी बघून संजय खुश होता आणि खोडसाळपणे हसत होता.  

जेव्हा ते फ्लाईंग क्लब वर परतले तेव्हा ज्याप्रमाणे मोदी निम्म्यातून मुलाखत सोडून गेले त्याच्याही दुप्पट वेगात करण थापर संजय गांधींचं विमान सोडून पळाले. परत कधीच त्याच्या विमानात बसायचं नाही अशी शपथ मनाशी घालूनच.

योगायोग असा कि पुढच्या काही वर्षातच संजय गांधी यांचं विमान अपघातातच निधन झालं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.