१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये हवाईदलाला उतरवलं असतं तर विजय पक्का होता ?

आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८९ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे.

भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण १ हजार ५०० हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे. यामध्ये ६०० लढाऊ विमाने तसेच ५०० हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे.

भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे. भारतीय हवाई दलाची एवढी क्षमता असूनही तुम्हाला माहिती आहे का की ऑक्टोबर १९६२ मध्ये चीन सोबत  झालेल्या युद्धात भारतीय हवाई दलाला लढण्यास परवानगी देण्यात आली नव्हती , तुम्हाला पण प्रश्न पडला असेलच कि अशी काय कारणे होती ज्यामुळे हवाई दल  युद्धात सामील होऊ शकलं नाही.

चला तर मग जाणून घेऊया त्यामागील कारणे

भारत-चीन युद्धात झालेला भारताचा पराभव यासाठी अनेक कारणं जबाबदार असून त्यातील अतिशय महत्वाचं कारण भारतीय हवाई दलाला युद्धात उतरण्याची परवानगी न देणे हे असल्याचं  सांगण्यात येतं.भारतीय आणि चीन च्या लष्करी सैन्याची तुलना करता त्यांचे प्रमाण १:३ इतके होते यावरून चीनी सैन्य युद्धासाठी पूर्णतः  तयार असल्याचं दिसून येत होतं.

हिमालय पर्वताने कायमच मंगोल आक्रमणापासून ते सर्बिया पासून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून भारताचे रक्षण केले आहे. चीनने १९५९ मध्ये लष्कराच्या साहाय्याने तिबेट वर बेकायदेशीर ताबा मिळवला होता आणि त्यामुळे हवाई दलासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्यांच्याकडे अभाव होता. १५००० फीट उंच ठिकाणावर चीन कडे हवाई तळ नव्हते विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरवण्यासाठी लागणारी धावपट्टी त्या भागात चीन कडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे हवाई दलाचा युद्धात उपयोग करून घेणे चीन साठी योग्य पर्याय नव्हता 

त्याउलट भारताच्या हवाई दलाचे गुवाहाटी, तेजपूर, दौलत बेग येथे सुसज्ज असे हवाई तळ  होते. चीन च्या तुलनेने हवाई दलचा वापर करून घेण्यास भारत उत्तम स्थितीत होता.  युद्धनीती नुसार हवाई दल वापरणे भारताच्या उपयोगाचे ठरले असते.

१९६२ साली भारतीय हवाई दलात २२ कॉम्बॅट स्केड्रॉन, ५०० पेक्षा जास्त एअर क्राफ्ट सामील होते.त्यावेळी भारताकडे असलेला कॅनबेरा बॉम्बर हा त्या वेळचा सर्वोत्कृष्ट बॉम्बर होता. परंतु भारतीय हवाई दल न वापरण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे घेतला गेल्याच तज्ज्ञांकडून बोललं जातं.

१९५५ मध्ये भारताने दिलेला हिंदी-चिनी भाई भाई हा नारा आजही  प्रसिद्ध आहे.

दोन देशांमधील संबंध यामधून घट्ट होतील अशी नेहरूंना अपेक्षा होती. चीनने तिबेट वर केलेला अवैध कब्जा यावर नेहरूंनी  मैत्री शाबूत ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नव्हतं . यामुळे चीनला भारताविरुद्ध कुरघोडी करण्यास प्रोत्साहन मिळत गेलं.चीन भारताविरुद्ध युद्ध करेल यावर भारतीय नेतृत्व गाफील राहिले . भारत युद्धात लष्करी  सैन्याच्या आधारे युद्धात उतरेल यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन ठाम होते.

भारत लष्कराच्या बळावर युद्धाला समोर जात होता तरी भारताने हवाई दल वापरले नाही यावर काही सैन्यातील तज्ज्ञांचे मते, त्यावेळी भारताला भीती होती कि भारताने जर हवाई दलाचा वापर चीन  विरुद्ध  केला तर चीन भारतातील गुवाहाटी, कोलकाता, आदी मोठ्या शहरांवर बॉम्बने हवाई हल्ला करू शकतो.

तर इतर काही तज्ज्ञांच्या मते, नेहरूंचा आणि व्ही. के. कृष्ण मेनन यांचा भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमतेवर विश्वास नव्हता.कारण युद्धाच्या वेळी हवाई दलाशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधला गेला नाही .त्यांचा वापर फक्त सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी करण्यात आला होता.

तसेच नेहरूंनी भारताचे  स्वतःचे हवाई  दल असून सुद्धा अमेरिकेच्या हवाई दलाची मदत घेण्यासाठी अमेरिकेचे  तत्कालीन राष्ट्रपती जॉन केनेडी यांच्या सोबत पत्रव्यवहार केला होता. यावरून भारताने  भारताच्याच हवाई दलाच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं सांगण्यात येतं

तत्कालीन कारणे काहीही असली तरी प्रत्येक भारतीयाचा भारताच्या हवाई दलावरचा विश्वास हा अबाधित राहिला आहे आणि तो कायम अबाधितच राहील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.