मुंबईत स्वातंत्र्यदेवतेप्रमाणे इंदिरा गांधींचा भव्य पुतळा उभारायचं ठरत होतं

न्यूयॉर्कमधला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजे अमेरिकेची जगभरात असलेली ओळख. दरवर्षी लाखो पर्यटक या भव्य पुतळ्याला भेट देत असतात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वरून प्रेरणा घेऊन जगभरात अनेक पुतळे उभे राहिले आहेत.

भारतात देखील गुजरातमधला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा, मुंबईत प्रस्तावित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पेक्षाही जास्त भव्य आणि अद्भुत शिल्पकलेचा अविष्कार मानले जातात.

पण भिडूंनो तुम्हाला माहित आहे का ? न्यूयॉर्कमधला स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या धर्तीवर भारतात त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईतल्या समुद्रात इंदिरा गांधींचा पुतळा उभारण्यात येणार होता. पण काही कारणाने तो प्रोजेक्ट बारगळला. त्याचीच ही गोष्ट…

३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राजीव गांधींना मोठा जनाधार लाभला आणि ते पंतप्रधान बनले. पुढच्या दोनच वर्षात काँग्रेसने १०० व्या वर्षात पदार्पण केलं. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत जानेवारी १९८६ ला इंडियन नॅशनल काँग्रेसने आपला शतक महोत्सव साजरा केला. त्याची जागा होती क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियम. मुंबईतला उच्चभ्रू असा नरिमन एरिया.

ते अधिवेशन बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे जणू काय संपूर्ण मुंबईच या अधिवेशनाला लोटली असावी.

कारण राजीव गांधींच्या सत्तेचा आणि प्रभावाचा तो एक कळसबिंदु होता. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शिवाजीराव निलंगेकर पाटील. हे अधिवेशन ज्या नरिमन भागात सुरु होत त्या भागात तत्कालीन मुंबई महापालिकेचे आयुक्त बी. जी. देशमुख पाहणी करण्यासाठी फिरत होते. त्यावेळी त्या भागातील भोसले मार्गावरती सारंग इमारती समोर एक मोठी झोपडपट्टी पसरली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी या भागाचा विकास करण्यात रस घेतला.

पण ती झोपडपट्टी काढण्यासाठी काही चळवळे लोक आड येत होते. त्यावेळी निलंगेकर पाटील मुख्यमंत्री पदावरून गेल्यावर त्यांच्या जागी शंकरराव चव्हाण येईपर्यंत मध्ये अल्पकाळ का होईना सरकार नव्हते. त्या कालावधीत बी.जी.देशमुखांनी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन ती झोपडपट्टी उठविण्यास सांगितले. आणि त्या जागी काही बॅरॅक्स उभ्या करण्यात येऊन त्या लोकांना तिकडे स्थलांतरित करण्यात आलं.

नरिमन पॉईंट हा विभाग शहराचे एक मोठे आर्थिक केंद्र समजलं जाई. त्यामुळं या भागच सुशोभीकरण करण्याचा मुद्दा पुढं आला.

त्यातलाच एक प्रस्ताव म्हणजे इंदिरा गांधींचा भव्य पुतळा मरीन ड्राईव्हच्या दक्षिण टोकाला उभा करण्याचा एक प्रस्ताव पुढे आला. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीचा पुतळा जसा समुद्राकडे तोंड करून उभा आहे त्याच धर्तीवर असा पुतळा उभा करावा असा तो प्रस्ताव होता.

यासाठी एम. एफ. हुसेन या नावांजलेल्या चित्रकाराकडून या पुतळ्याचे एक रेखाचित्र तयार करून घेण्यात आले. या प्रोजेक्ट मध्ये कफ परेडजवळ अनधिकृतरित्या समुद्रात भर घालून नवीन खूप विस्ताराची जमीन तयार केली गेली होती. त्या जमिनीवरती सरकारने बाग करायची ठरवली. कफ परेड आणि नरिमन पॉईंट हे एका पुलाने जोडायचे होते. आणि कोळी लोकांची वस्तीही पर्यटकांना कोळी लोकांच्या खेड्याचे आकर्षण वाटेल अशा आधुनिक पद्धतीने, पुनर्र्चीत करायची होती.

हे सर्व कार्यक्रम कफ परेड नरिमन पॉईंटच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाचे भाग होते. परंतु ह्या सर्वच प्रकल्पाला खो घातला गेला.

कारण कोळी लोकांना कोणीतरी बिथरवून दिले होते कि या नवीन रचनेत आपल्यावरती पाळत ठेवली जाईल. त्यामुळे त्यांनी कडाडून विरोध केला. परिणामी या भागाच्या सुशोभीकरणाची योजना नेस्तनाबूत झाली. आणि परिणामी इंदिरा गांधींचा पुतळा उभारण्याचा प्रकल्प पण बारगळला.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.