क्रिकेट सोडा या १७ वर्षांच्या भारतीय मुलीनं थेट ऑस्ट्रेलियन सरकारला हरवलं होतं..

गेल्या अनेक वर्षांपासून जगात हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम हा कळीचा मुद्दा ठरला आहे. जगभरातल्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते या विषयावर वारंवार आवाज उठवत आहेत. नेत्यांच्या विविध परिषदाही पार पडत आहेत.

त्यामुळं हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र याच मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियन सरकारला काही किशोरवयीन मुलींनी थेट कोर्टात खेचलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी ही केस जिंकली देखील. या मुलींच्या ग्रुपचं नेतृत्व केलं ते १७ वर्षीय अंजली शर्मानं.

भारतातल्या लखनौमध्ये जन्मलेली अंजली १० महिन्यांची असतानाच तिचे आई-वडील ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले होते. २०१७ मध्ये दक्षिण एशियामध्ये आलेल्या महापुरानंतर, अंजलीनं हवामान बदलाचे दुष्परिणाम या विषयात जास्त रस घ्यायला सुरुवात केली. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यानं काय होऊ शकतं? त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल? हवामान बदलांमुळं लहान मुलांना आपला जीव गमवावा लागू शकतो का? असे प्रश्न तिला भेडसावू लागले.

त्यात गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये कार्बन उत्सर्जनाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. ऑस्ट्रेलिया कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यात कमी पडतंय असा आरोप बाकीचे देशही त्यांच्यावर करतायत. सोबतच कोळशाच्या खाणींमुळं ही पर्यावरणाची हानी होत असल्यानं, खाणींच्या विस्तारीकरणावर बंदी आणण्याची मागणी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी केली होती.

अंजली शर्मा आणि तिच्या ७ मैत्रिणींनी एकत्र येत देशाच्या पर्यावरणमंत्री सुसान ली यांना कोर्टात खेचलं. त्यांनी न्यू साऊथ वेल्सच्या कोळसा प्रकल्पाविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला. त्यांचं म्हणणं होतं की, हवामान बदलामुळं मुलांच्या आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यासाठी ली जबाबदार आहेत. ली यांनीच कोळसा प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता.

अंजली आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार सततच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. याचा परिणाम म्हणून जंगलांना आगी लागतील, पूर येतील, वादळं आणि चक्रीवादळंही निर्माण होतील. या हवामान बदलांमुळं मुलांच्या जीवाला धोका निर्माण होईल, सोबतच आर्थिक नुकसानही सहन करावं लागेल.

याबाबत कोर्टानं अंजली आणि तिच्या सहकाऱ्यांच्या बाजूनं निर्णय दिला. कोर्टानं कोळसा प्रकल्पावर स्थगिती आणली नसली, तरी ली यांच्यावर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी आहे, असं कोर्टानं नमूद केलं. ली यांनी या विरोधात वरच्या कोर्टात अपील केलं.

अंजलीच्या या कामाचं जगभरातून कौतुक झालं. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनंही अंजली आणि तिच्या सहकाऱ्यांचं कौतुक करत संपूर्ण पर्यावरण बदल चळवळीसाठी हा मोठा विजय असल्याचं ट्विट केलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.