धोनी आणि रैनाच्या दोस्तीत बिचाऱ्या उमर अकमलचा बाजार उठला होता…

सुरेश रैना हे नाव ऐकलं की, एक पिढी डायरेक्ट नॉस्टॅल्जीक होते. म्हणजे कसं आपल्याला शाळेचा अभ्यास, कॉलेजचं सबमिशन, आपलं चॅट गर्लफ्रेंडच्या घरातल्यांनी वाचलं, तर असं सगळं टेन्शन असायचं… या सगळ्या टेन्शनमधून सुखावणारी गोष्ट म्हणजे रैनाची बॅटिंग. बरं रैना फक्त पोरांनाच आवडायचा असं नाय. कित्येक पोरींच्या बॅगेतले चोरकप्पे आणि वहीच्या मागची पानं ही रैनाच्या फोटोंनी व्यापली होती.

सोनू आणि चिन्ना थला ही रैनाची फेमस टोपणनावं असली, तरी त्याला एकच नाव सगळ्यात जास्त शोभून दिसतं, ते म्हणजे…

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस

स्वतःच्या यशासाठी रैना जितका खुश होत नाही, तितका समोरच्या प्लेअरच्या यशासाठी. मग तो प्लेअर आपल्या टीममधला असुदे किंवा समोरच्या. आयपीएलमध्ये रिषभ पंतनं एकदा बेक्कार राडा बॅटिंग केली, पण त्याचं शतक अधुरं राहिलं. हताश झालेल्या पंतला समजवायला गेलेला प्लेअर होता रैना.

लय थोड्या लोकांना सदासर्वदा आनंदी राहायला, दुसऱ्याच्या खुशीत स्वतःची खुशी शोधायला जमतं. सुरेश रैनानं यात मास्टरकी मिळवलिये. थोडक्यात काय तर फक्त कडक बॅटिंग आणि खुंखार फिल्डिंगच नाय, तर आपल्या स्वभावामुळंही रैनाचं कॅरॅक्टर कायम लक्षात राहिलं.

आता कॅरॅक्टर म्हणल्यावर आणखी एक कार्यकर्ता आठवतो, तो म्हणजे पाकिस्तानचा उमर अकमल. तो विकेटकिपर, बॅटर असं सगळं काही आहे; पण आपल्या लक्षात तो राहिलाय ते त्यांच्या काळजात शिरणाऱ्या इंग्लिशमुळं. कार्यकर्ते पार्टीत कितीही डाऊन झाले, तरी जितकं भन्नाट इंग्लिश बोलू शकत नाहीत, तितकं वाढीव इंग्लिश उमर अकमल बोलतो.

अकमल एकदा मॅच सुरू असताना धोनीशी बोलला आणि चांगलाच पस्तावला. त्यात गडी हिंदीत बोलला होता आणि तरीही राडा झालाच.

हा किस्सा घडला, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू असताना. उमर अकमल क्रीझवर होता, पाकिस्तानची टीम टार्गेट चेस करत होती. आता या दोन संघात मॅच सुरू आहे म्हणल्यावर, टेन्शन चांगलंच वाढणार की. अकमल बेक्कार प्रेशरमध्ये होता. त्यात रैनानं त्याला स्लेज करायला सुरुवात केली. आधीच प्रेशर, भारताचे बॉलर्स कडक बॉलिंग करतायत त्यामुळं अकमल चांगलाच वैतागला.

रैनाची बडबड काय थांबेना, म्हणून तो अकमल गेला धोनीकडं. धोनीला म्हणाला, ”धोनीभाई ये रैना मेरे को गाली बक रहा है.” ओव्हर्सच्यामध्ये धोनी रैनाजवळ गेला आणि त्याला काहीतरी सांगितलं. हेल्मेटच्या मागं अकमलला हसू फुटलं, त्याला वाटलं असणार धोनीनं रैनाला झापलं.

पण धोनी आणि रैनामध्ये खरंच काय बोलणं झालं, हे रैनानं गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. रैना सांगतो, “धोनीनं विचारलं की काय बोललास त्याला. मी सांगितलं की, नॉर्मल स्लेज करत होतो. ‘भाई थोडा रन्स भी बनाले, टार्गेट चेस करना हे तुम्हे,’ एवढंच बोललो, शिव्या-बिव्या नाय दिल्या. धोनी हसला आणि म्हणाला, फोड डाल उसको.”

आता डायरेक्ट हायकमांडनं परमिशन दिलीये म्हणल्यावर रैनानं अकमलला अजिबात सुट्टी दिली नाही. आणखी बडबड सुरु झाली आणि बिचाऱ्या अकमलचा बाजार उठला.

धोनी आणि रैनाचं ट्युनिंग किती बाप होतं, हे आतापर्यंत लय वेळा आपण पाहिलंय. टीम इंडिया असेल किंवा टीम चेन्नई सुपर किंग्स; थला धोनीच्या या चिन्ना थलानं प्रत्येक जबाबदारी पार पाडली. आयपीएल, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यानं मजबूत रेकॉर्ड्स केले. रैना पॉईंट किंवा कव्हरला फिल्डिंगला थांबला की, बॅटर्स दोन रन सोडा सिंगल काढायला पण ठसायचे.

रैनाची दोस्ती इतकी कट्टर होती, की धोनीनी रिटायरमेंट घेतल्यावर रैनानंही रिटायरमेंट अनाऊन्स केली. धोनीनं आयपीएल खेळायचं थांबवलं की, आपण पण थांबणार, असं त्यानं आधीच डिक्लेअर केलंय. जय-वीरू, कुंदन-मुरारी, सर्किट-मुन्नाभाई बॉलिवूडमध्ये मैत्रीच्या अशा लय जोड्या आहेत, पण दोस्ती आणि क्रिकेट एकत्र आले की एकच जोडी आठवते…

सुरेश रैना आणि एमएस धोनी.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.