पुरंदरच्या ऋतुराज गायकवाडच्या रूपात धोनीला त्याचा दुसरा सुरेश रैना मिळालाय…

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा कालपासून सुरू झालाय. यात कालच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केलाय. मात्र चेन्नईच्या या विजयाचा ओरिजनल शिल्पकार ठरला तो पुण्याचा मराठमोळा ऋतुराज गायकवाड. स्वतः महेंद्रसिंग धोनीने या विजयाचं श्रेय ऋतुराजला देत त्याच्या खेळीचं कौतुक केलंय.

मागच्या वर्षी आयपीएलच्या १३ व्या हंगामात देखील ऋतुराज गायकवाडने चेन्नईसाठी अखेरच्या काही सामान्यांमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. तेव्हा देखील धोनीने ऋतुराज गायकवाड सर्वात दर्जेदार खेळाडू असून त्याला फलंदाजीची चांगली समज असल्याचे म्हंटले होते.

त्यामुळे सलग दोन वर्ष धोनीच्या गुडबुकमध्ये आलेला ऋतुराज गायकवाड नेमका आहे तरी कोण? 

तर ऋतुराज गायकवाडचं मूळ गाव हे पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे. ३१ जानेवारी १९९७  रोजी ऋतुराजचा जन्म झाला. तर सध्या पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा विद्यार्थी आहे. ऋतुराजचे वडील डीआरडीओमध्ये अधिकारी, तर आई शिक्षिका. पण हा पठ्ठया क्रिकेटकडे वळला.

शैलीदार फलंदाजी हि ऋतुराजची मुख्य ओळख. प्रतिभावंत असल्यामुळे १९ व्या वर्षीच त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणणाची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली.

त्या हंगामाची एक आठवण म्हणजे त्यावर्षी झारखंड टीमचा मेन्टॉर म्हणून महेंद्रसिंग धोनी होता.

त्यावेळी झारखंडविरुद्धच्या मॅचमध्ये वरुण ऍरॉनचा एक बॉल ऋतुराजच्या बोटावर जाऊन लागला. पण तरीही दुखऱ्या बोटाने तो खेळत होता. मात्र त्यावेळी नीट खेळता येत नसल्याने मोठा शॉट मारताना तो आऊट झाला. लंचवेळी महेंद्रसिंग धोनी ऋतुराजच्या दुखापतीविषयी विचारायला आला. त्यावेळी धोनीने ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटाला लावलेल्या प्लॅस्टरवर लिहिलं,

‘गेट वेल सून’

त्यानंतर ऑक्टोबर २०१८ साली देवधर ट्रॉफीच्या भारत ‘ब’ संघात त्याची निवड झाली होती. डिसेंबर २०१८ झाली ते एमसीसीच्या एमर्जिंग टीममध्ये होता. सोबतच २०१८-१९ च्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७ मॅचेसमध्ये ६३.४२ च्या सरासरीने ४४४ रन्स केल्या आहेत.

इंडिया ‘ए’ कडून क्रिकेट खेळताना देखील ऋतुराजने धावांचा पाऊस पाडला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पण त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. कारण तो गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यातून बाहेर येत त्याने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध ११२.८३च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. त्याचा स्ट्रइक रेट ११६.७२ होता.

ऋतुराजची धावसंख्या नाबाद ८७, नाबाद १२५ ९४, ८४,७४,३,८५, २० आणि ९९ अशी होती.

या दरम्यान डिसेंबर २०१८ साली चेन्नई सुपर किंग्जने २० लाखच्या बेस प्राइसवर ऋतुराजला विकत घेतले. पण त्याला २०१९ च्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र मागच्या वर्षी आणि या हंगामात त्याला मिळालेल्या संधीचा त्याने भरपूर फायदा घेतला. 

गतवर्षी आयपीएल सुरू होण्याआधी त्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यानंतर तो फिट होऊन टीममध्ये परत आला. मात्र या दरम्यान धोनी टीममधील युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्याचे म्हटले होते. त्याच्या या विधानावर अनेकांनी टीका देखील केली होती.

नेमकं याच काळात सुरेश रैना टीममध्ये नसल्यामुळे त्याच्या जागी ऋतुराजला संधी देण्यात आली आणि पुढच्या काही सामन्यांमध्ये ऋतुराजने धोनीच्या या विधानाला चुकीच सिद्ध केलं.

त्याने सलग दोन सामन्यात हाफ सेंच्युरी झळकावली. तर पाच सामन्यात त्याने १४२ धावा केल्या होत्या.  तेव्हाच म्हटलं जाऊ लागलं ,

ऋतुराज गायकवाडच्या रूपात धोनीला त्याचा दुसरा सुरेश रैना मिळालाय

त्यानंतर यंदाच्या आयपीएल हंगामात पण ऋतुराजने कालच्या मॅचमध्ये नॉटआऊट ८८ रन्स करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. इतकंच नाही तर त्याच्या याच खेळीने चेन्नईच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.