बँकेत नवीन खातं उघडायला गेलेल्या केंद्रीय उपमंत्र्यांनाही अपमान सहन करावा लागला होता…

त्यादिवशी सकाळ सकाळ उठलो, ऑफिसमध्ये होती सुट्टी. त्यामुळं दिवस निवांत जाणार याची गॅरंटी होती. पांघरुणाची घडी न घातल्यामुळं बोलणी खाण्याचा शुभारंभ झाला आणि तो थांबला, ‘आज करायची कामं’ ही लिस्ट हातात पडूनच. भाजी आण, दळण आण, केर साफ कर, गाडी सर्व्हिसिंगला टाक ही कामं दिवसातून चारदा करायला सांगितली, तरी लोड नाही. लोड फक्त एकाच गोष्टीचा येतो बँकेत जाण्याचा.

होतं कसं की, आपला पायगुण इतका भारी की बँकेत गेल्यावर एकतर लंच टाईम सुरू असतो, नायतर बँक बंद व्हायला आलेली असते. आणि बँकेत गेल्यावर तोंडावर अपमान झाला नाही, तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. आता आपल्याला काय वाटतं, की आपण पडलो सामान्य लोकं, आपल्या बँक अकाऊंटमध्ये पाच आकडी पैसे असणं पण लय दुर्मिळ गोष्ट त्यामुळं बँकवाले आपल्याला भाव देत नाहीत. पण असं काय नाहीये… एकदा बँकेत गेलेल्या केंद्रीय उपमंत्र्यांनाही अपमान सहन करावा लागला होता.

आधी तुम्हाला त्या उपमंत्र्यांबद्दल सांगतो-

ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन पुजारी. पेशाने वकील असणारे पुजारी १९७७ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पुढच्या तीन टर्म पुजारी यांनी आपला मतदारसंघ राखला. त्यांची १९८२ मध्ये केंद्रीय अर्थखात्यात उपमंत्री म्हणून नियुक्ती झाली. पुढे त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदही भूषवलं. पुजारी केंद्रीय अर्थखात्यात उपमंत्री असताना त्यांनी एकदा बँकेला सरप्राईज व्हिजिट देण्याचा निर्णय घेतला आणि किस्सा झाला.

सकाळी साधारण दहा-साडेदहाची वेळ. मुंबईतल्या प्रसिद्ध हुतात्मा चौकातल्या एका नॅशनलाईज्ड बँकेत पुजारी अगदी साध्या कपड्यात, कोणताही लवाजमा न बाळगता गेले. त्यांनी एक नजर फिरवली आणि पाहिलं तर काही जण निवांत चहा पित होते, काही जण मस्त ग्रुप जमवून गप्पा हाणत होते, काही टेबलं तर रिकामीच होती.

पुजारी एका टेबलपाशी गेले, तिथे असलेल्या अधिकाऱ्याला त्यांनी शांतपणे विचारलं, ‘अहो मला नवीन अकाऊंट उघडायचंय, त्यासाठी काय करावं लागेल?’ समोरुन टिपिकल उत्तर टिपिकल टोनमध्ये आलं.. ‘इकडे नाही तिकडे जा, तिकडून पलीकडच्या काऊंटरवर जा.’ पुजारी काही बोलले नाहीत, ते गेले डायरेक्ट मॅनेजरकडे. मॅनेजरला आपली ओळख सांगितली, साहजिकच मॅनेजर थेट सावधान मोमेन्टमध्ये आला. पुजारी मॅनेजरला घेऊन बँकेत आणखी एक राऊंड मारायला गेले. पण गप्पांचे अड्डे आणि हातातले चहाचे कप या गोष्टी काय बदलल्या नाहीत. अखेर जाहीर झालं की, आलेला माणूस हा केंद्रीय उपमंत्री आहे.
मग झाली धावपळ.
चहाचे कप, गप्पांची मंडळं या गोष्टी बाजूला राहिल्या आणि सगळे कर्मचारी शिस्तीत उभे राहिले. तेव्हा अचानक गर्दी कमी व्हायला लागली. त्यामुळं पुजारींना प्रश्न पडला. त्यांनी काही लोकांना थांबवून प्रश्न विचारले. मग त्यांना समजतलं, की हे बँकेचे कर्मचारीच नाहीत. फक्त एसीची हवा खायला मिळतेय म्हणून गोळा झालेली माणसं आहेत.

फक्त मुंबईच नाही, तर बँगलोर, दिल्ली आणि कटकमध्येही त्यांना असाच अनुभव आला. बँगलोरमध्ये तर दोन वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव खुद्द मॅनेजरलाच माहीत नव्हतं.

पुजारी यांनी बँकांना अशी सरप्राईज व्हिजिट का दिली होती?
अर्थखात्यात काम करताना, त्यांना बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी ते वेषांतर करुन साध्या कपड्यांत बँकांना भेटी देऊ लागले. बँक कर्मचाऱ्यांनी मंत्री महोदय म्हणतात तशी परिस्थिती अजिबात नाही असा दावा केला, मात्र पुजारी यांनी बँकेतली परिस्थिती थेट मॅनेजरकडून लिहून घ्यायला सुरुवात केली, अर्थातच बँक कर्मचाऱ्यांचा दावा फोल ठरला.
या घटनेला आता काही वर्ष उलटून गेली, मात्र आजही बँकेत कधी कधी अगदी सेम वातावरण असतं, तर कधी अगदी उलट. कोविड काळात बँक कर्मचाऱ्यांनी केलेलं काम विसरूनही चालणार नाही. पण १९८२ च्या दरम्यान कुठल्याही बँक कर्मचाऱ्याला हिशोबात घोळ घावल्यावर जेवढं टेन्शन येत नसेल, तितके पुजारी बँकेत येण्याच्या भीतीमुळं येत असेल, हे फिक्स.
हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.