दारु पिण्याला विरोध करणारे लाख असतील, पण ड्राय डेला विरोध करणारा एकच बादशहा होता

बाकी दुनिया है बेमानी,
पिले पिले ओ मेरे जानी…

पोटात द्रव्य ढकललेलं असो किंवा नसो, या गाण्याचा आवाज ऐकला की आपले पाय आणि शरीर आपोआप डुलायला लागतं. त्यातच डोक्यावर बाटली धरून नाचणारा कार्यकर्ता सोबत असेल, तेव्हा मैफिलच रंगते. आता या मैफिली तशा कधीही रंगतात, पण दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल… तर या मैफिलींना आणखी रंग चढतो.

त्यामुळं सुट्टीचं निमित्त साधून या मैफिली अरेंज केल्या जातात आणि तेव्हा वेळापत्रकात एक गोष्ट पाहिली जाते, ती म्हणजे ‘अरे ड्राय डे तर नाही ना?’ कारण ड्राय डे म्हणलं की बार बंद, स्टॉक घ्यायला दुकानं बंद..सगळ्याच प्लॅनचा पचका.

आता आम्हाला ड्राय डे ची आठवण आली, याच्यामागचं कारण आहे, दिल्ली सरकारनं दिलेला निर्णय. हा निर्णय वाचून आमच्या एका कार्यकर्त्यानं नारा दिला, ‘चलो दिल्ली.’ तो गडी एवढा उत्सुक होता कारण, दिल्ली सरकारनं घोषणा केलीये की.. आता राज्यात ड्राय डे ची संख्या २१ दिवसांवरुन फक्त ३ दिवसांवर आली आहे. गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या तीन दिवसांसाठीच दिल्लीत ड्राय डे असेल. कळलं का? आमचा कार्यकर्ता चलो दिल्ली का म्हणाला?

आता या निर्णयाला काही लोकांनी विरोध केला, शौकीन लोकांची काळजी घेणारा निर्णय होतोय आणि त्यालाही विरोध होणार म्हणल्यावर आम्हाला एकदम बॅड फील झालं. पण जर ड्राय डे कमी करण्याला विरोध होत असेल, तर असं कुणीतरी असणारच की जो ड्राय डे च्याच विरोधात होता. शोधलं की सापडतंच.. आणि आम्हाला असा माणूस सापडला… जो ड्राय डे च्याच विरोधात होता.

किंग ऑफ गुड टाइम्स, स्वतः विजयभाऊ माल्ल्या. कितीही झोल झाले, भाऊ लंडनमध्ये गेले.. तरी प्रत्येक बारमध्ये प्रेरणास्थान म्हणून माल्ल्या भाऊंचा अदृश्य  फोटो असतोच. आता ड्राय डे म्हणलं की माल्ल्या भाऊंचा बिझनेस थंड होणारच. पण तरी शौकीन कार्यकर्त्यांची काळजी किती…

झालं असं की,  २००६ मध्ये दिल्ली सरकारनं निर्णय घेतला होता, की आता राज्यात फक्त सातच ड्राय डे असतील. तेव्हा खासदार असणारे विजयभाऊ म्हणाले, ‘ड्राय डे ही संकल्पनाच बोगस आहे आणि ती बंद करण्यात यावी. जर कायदा आणि सुव्यवस्था असूनही निवडणुकांच्या वेळी घोडेबाजार रोखता येत नाही. त्याचप्रमाणं दारूच्या विक्रीबाबत असे नियम लावूनही काही होणार नाही. शासन जितके नियम लावेल, तितक्याच पळवाटा यातून निघतील आणि लोकं दारुचा साठा करुन ठेवतील. त्यामुळं ड्राय डे चा फार्स बंद करायला हवा.’

आता तेव्हा चर्चा होण्या व्यतिरिक्त यावर काही झालं नाही, पण समस्त शौकीन मंडळांच्या मनात माल्ल्या भाऊंबद्दलचा रिस्पेक्ट फुल्ल वाढला. रेग्युलर बसणाऱ्या मेम्बर्सचा ड्राय डे कसा जात असेल याचा विचार फक्त त्यानं केला होता. म्हणूनच त्यांना तो भगवान का आदमी वाटला होता. ड्राय डे मुळं जिंदगीत एका दिवसाचाही बॅड टाइम नको, असं ध्येय बाळगणारा माल्ल्या खऱ्या अर्थानं किंग ऑफ गुड टाइम्स होता… असं शौकीन कार्यकर्ते म्हणत होते.. आमच्या फक्त कानावर आलं.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.