नेव्हीचे सिक्रेट पेन ड्राइव्ह मधून पळवणारा ऑफिसर आजही इंग्लंडमध्ये चैनी करतोय

मे २००५. भारतीय एअरफोर्सच्या इंटलिजन्स डिपार्टमेंटने विंग कमांडर एस एल सुर्वे यांच्या दिल्लीतल्या घरावर छापा मारला. सुर्वे यांच्या पत्नीने एअर फोर्स कडे तक्रार केली होती की माझ्या नवऱ्याचे एका बाईशी अफेअर सुरु आहे. हनी ट्रॅपची शक्यता ओळखून गुप्तचर यंत्रणेने सुर्वेंच्यावर पळत ठेवली व हा छापा मारला.

तिथे त्यांना एक पेनड्राइव्ह सापडले. या पेनड्राइव्ह मध्ये नौसेनेची काही खास सिक्रेट फाईल लपवलेली आढळली. यात भारतीय नेव्हीच्या येत्या वीस वर्षातील योजना होत्या. एअर फोर्सने नेव्हल डिपार्टमेंटच्या इंटलिजन्स विभागाशी संपर्क केला.

रिसर्च केल्यावर सापडलं की ही सगळी माहिती दिल्लीच्या मंत्रालयाच्या साऊथ ब्लॉकमधील नेव्हल वॉर रम मधल्या एका कॉम्प्युटरमधून घेण्यात आली आहे.

हि साधी सुधी गोष्ट नव्हती. एका मोठ्या रॅकेटचा हा भाग असू शकतो हे लक्षात आलं. नेव्हीने पुढच्या काही महिन्यात कसून तपास केला. यातून एक मोठा घोटाळा बाहेर पडला.

हाच तो नेव्ही वॉर रूम स्कॅम

डिसेंबर महिन्यात विजेंद्र राणा, विनोद कुमार झामी, कॅप्टन कश्यप कुमार याना अटक झाली. कोणतीही चौकशी वॉरंट न दाखल करता या तिघांना आर्टिकल ३११ चे खास प्रोव्हिजन वापरून ताब्यात घेण्यात आले होते. या सगळ्यांनी मिळून ७००० पानांचे गुप्त डॉक्युमेंट्स लीक केले होते.

वर्तमानपत्रात या स्कॅमबद्दल माहिती छापून आली. देशभर खळबळ उडाली. अगदी थेट संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांना या बद्दल खुलासे करावे लागले.

या स्कॅमचा मुख्य मास्टर माईंड होता एक्स नेव्ही ऑफिसर रवी शंकरन.

१९९४ साली नौदलामधून तो सेवानिवृत्त झालेला. त्याने शॅक्स ओशिनियरिंग नावाची एक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत तो भारतीय लष्कराला संरक्षण साहित्य पुरवणाऱ्या परदेशी कंपन्यांना कन्सल्टन्सी पुरवायचा. साध्या शब्दात सांगायचं तर तो एक मोठा दलाल होता.

आता दलाल म्हटल्यावर काळ्या पांढऱ्या गोष्टी आल्याचं. वरतून या रविशंकरन हा नेव्हीचे प्रमुख ऍडमिरल अरुण प्रकाश यांचा बायकोच्या साईडने नातेवाईक सुद्धा लागायचा. या आपल्या मोठमोठ्या लिंक्सचा वापर त्याने डिफेन्स मिनिस्ट्री मधून सिक्रेट इन्फॉर्मेशन चोरण्यासाठी केला.

विंग कमांडर संभाजीलाल सुर्वे यांची २००४ साली ऑपरेशन ऑफ एअर डिफेन्सच्या जॉईंट डायरेक्टर पदी निवड झाली तेव्हापासून रवी शंकरन याने त्यांच्या भोवती जाळे फेकण्यास सुरवात केली. पुण्याच्या राजरानी जयस्वाल यांची त्यांना भुरळ घालण्यासाठी निवड केली. दिल्लीच्या थंडीत या दोघांचं प्रेमप्रकरण रंगू लागलं. राजरानी जैस्वाल यांनी गोड बोलून सुर्वेंच्या कडून डिफेन्स मिनिस्ट्रीमधली सिक्रेट माहिती पेन ड्राइव्ह मधून आणायला लावली.

पण त्यांचं दुर्दैव कि सुर्वेंच्या बायकोला त्यांच्या लफड्याची शंका आली आणि सगळं भांडं फुटलं.

रवी शंकरन याने कुप्रसिद्ध आर्म्स डीलर अभिषेक वर्मा बरोबर ही डील केली होती असं म्हणतात. या अभिषेक वर्माचे किस्से आणि स्टोरी पुन्हा कधी तरी पण एका वाक्यात याच्या बद्दल सांगायचं झालं तर या माणसाने थेट वरून गांधीला हनी ट्रॅप मध्ये अडकवलं होतं. म्हणजे विचार करा काय लेव्हलचा हा माणूस असेल.असो.

रवी शंकरनला तब्बल १२ अब्ज रुपये या डीलमधून कमिशन म्हणून मिळणार होते.

सुर्वे, राणा, विनोद कुमार यांना अटक झाली आणि हि नावे बाहेर येऊ लागली. कुलभूषण पराशरला दिल्ली एअरपोर्टवर पकडण्यात आलं. पण रवी शंकरनचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याचे पासपोर्ट, भारतातील प्रॉपर्टी सील केली गेली.

पराशरने सांगितलं की तो नुकताच रवी शंकरला लंडनमध्ये भेटला आहे. सीबीआयने स्कॉटलंड पोलीसला त्याला अटक करण्याची विनंती केली. तिथल्या कोर्टाने तसे आदेश देखील दिले.पण रवीशंकरण इंग्लंडमध्ये देखील नव्हता.

अखेर इंटरपोलने त्याच्या नावाची जगभरात रेड अलर्ट नोटीस जाहीर केली.

सीबीआयच्या सायबर टेक्निकल टीमने त्याला ट्रॅक डाऊन केलं तेव्हा तो कधी फ्रान्स, कधी स्पेन तर कधी स्वित्झर्लंडमध्ये असल्याचं कळत होतं. त्याचे पार्टी करतानाचे फोटो अधूनमधून झळकत होते. स्वीडनमध्ये तर तो सापडला देखील होता मात्र तिथून पाबोरा करण्यात तो यशस्वी झाला.

त्याच्या या सगळ्या पराक्रमामुळे नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांच्यावर देखील आरोपांची राळ उडवण्यात आली. त्यांनी राजीनामा देखील देऊ केला पण प्रणव मुखर्जी यांनी तो स्वीकारला नाही.

अखेर २०१० साली रवी शंकरन स्वतःहून लंडनमध्ये पोलिसात जमा झाला. पुढच्या तीन वर्षात इंग्लडच्या तेव्हाच्या गृह मंत्री तेरेसा मे यांनी त्याला भारतात प्रत्यार्पण करण्याची घोषणा केली. पण रवी शंकरनने त्याच्या विरुद्ध तिथल्या कोर्टात टाकली.

२०१४ साली इंग्लंडमधील कोर्टाने रवी शंकरन विरुद्ध सीबीआय कडे पुरेसे पुरावे नाहीत असं म्हणत त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास नकार दिला. पुढे सगळीकडे सरकारे बदलली. हे प्रकरण आश्चर्य कारक रित्या मागे पडत गेले.

सीबीआयने देखील यावर पुन्हा दावा करायचे टाळले.

एकूण काय तर रवी शंकरनचे साथीदार आजही जेलमध्ये आहेत, काही जणांना बेल मिळालाय पण कोर्टाच्या चकरा मारत आहेत पण या नेव्ही वॉर रूमचा मास्टरमाईंड लंडनमध्ये निवांत चैनी करतोय. लंडनमध्येच लपलेल्या विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाच्या चर्चा जेव्हा जेव्हा वर येतात तेव्हा तेव्हा रवी शंकरणचे फोटो पुन्हा दिसू लागतात काही दिवस धुरळा उडतो आणि पुन्हा शांत होतो.

आता एखादी वेबसीरीज किंवा सिनेमा आला तरच रवी शंकरनची आठवण सगळ्यांना होईल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.