विद्यार्थी आंदोलनाला हलक्यात घेऊ नका, खुद्द मुख्यमंत्री निवडणूक हरलेले

भारत हा तरुणांचा देश मानला जातो. म्हणजे जगभरातल्या बाकीच्या देशांची तुलना जर केली तर भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे. त्यामुळे सरकार कोणाचंही असो, नवीन नियम, योजना, बजेट,निवडणूका असल्या कि तरुणांच्या दृष्टीने आधी विचार करणं भाग असत. कारण तरुण पिढीमध्ये अशी ताकद आहे, जी सरकार बनवू सुद्धा शकते आणि ते पाडू सुद्धा शकते.

याची कित्येक उदाहरण आहेत. म्हणजे भारताला स्वातंत्र मिळालं ते तरुणांच्या स्वातंत्रलढ्यामुळचं. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या बऱ्याच छोट्या – मोठ्या आंदोलनामुळे राज्य सरकारला तर धक्का बसलाच, पण यामुळे दिल्लीला सुद्धा चांगलाच हादरा बसला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे कित्येक मंत्र्यांना राजीनामा तर द्यायला लागलाच तर काही घटनांमध्ये सरकार सुद्धा पडलं.

अशीच घटना बिहारच्या विद्यार्थी आंदोलनाची. १९६७ चं साल होत. के. बी. साहाय राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत होते. तर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी पटणा विद्यापीठात पहिल्यांदाच राम जतन सिंग अध्यक्ष म्हणून निवडून आले होते तर नरेंद्र सिंग उपाध्यक्षपदी निवडून आलेले. राम जतन यांना अध्यक्ष बनवण्यात बाल मुकुंद शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती. 

याआधी १९६४ च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांचे स्वरूप वेगळे होते. तेव्हा प्रत्यक्ष निवडणुका व्हायच्या नाहीत. प्रत्येक वर्गातून एक-एक कौन्सिलर निवडले जायचे, जे नंतर मुख्य निवडणुकीसाठी मतदान करायचे.

राम प्रसाद यादव आणि मुन्ना त्रिपाठी यांची जुन्या पद्धतीनुसार विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. दरम्यान, निवडणूक पद्धतीत बदल करण्याची मागणी होत होती. राम जतन यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर १९६७ मध्ये जबरदस्त आंदोलन झाले. आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. सरकार विरुद्ध घोषणाबाजी सुरु झाली आणि हे आंदोलन वाढतच गेले. 

संतप्त विद्यार्थ्यांनी खादी ग्रामोद्योग आणि रीजेंट सिनेमा हॉलमध्ये जाळपोळ केली.  बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी रास्ता रोको झाला, हे आंदोलन इतकं चिघळल कि, तत्कालीन मुख्यमंत्री के.बी सहाय यांना यात डोकं घालावं लागलं. पण तरीसुद्धा विद्यार्थी काही माघार घेत नव्हते. एवढंच नाही तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावर तोडगा काढायची ताकीद दिली. 

काही दिवस सुरु असलेलं हे आंदोलन नंतर हळू- हळू शांत झालं. पण हे फक्त वरवरून वाटत होत, सरकारच्या विरुद्ध विद्यार्थ्यांचा राग तसाच पेटंत होता.  जो पुढच्या विधानसभा निवडणुकात स्पष्टपणे दिसून आला. म्हणजे आंदोलन थंड झाल्यांनतर काही दिवसांनंतरच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूक झाल्या.

मुख्यमंत्री असलेले के. बी. सहाय यांनी पाटणामधून विधानसभेची निवडणूक लढवली.  त्याच्या विरोधात जनता पार्टीचे उमेदवार महामाया प्रसाद सिन्हा  होते. महामाया प्रसाद हे  त्या विद्यार्थी आंदोलनात हिरो बनून समोर आले होते. ते विद्यार्थ्यांना ‘जिगर का तुकडा’ म्हणायचे.  त्यामुळे निवडणुकीत विद्यार्थ्यांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आणि शेवटी कौल सुद्धा महामाया प्रसाद यांच्याच बाजूने लागला. आणि माजी मुख्यमंत्री केबी सहाय यांचा दाबून पराभव झाला. 

अश्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या छोट्या आंदोलनाने अख्खच्या अख्ख सरकार पालटलं, महत्वाचं म्हणजे तिथून पुढेच बिहारमध्ये आणि सोबतच सगळ्या देशभरात विद्यार्थी संघटनांची ताकद वाढली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.