शाळेतील सर्वात दंगेखोर विद्यार्थी टेरेरिस्ट एक्सपर्ट वकील कसा बनला ?

परवा रात्री शाहरुख खानचं उचापती लेकरू एका फाईव्ह स्टार क्रूझवर पार्टीसाठी गेलं होतं.  आता हि पार्टी निघाली रेव्ह पार्टी. म्हणजे दारू पासून ते ड्रग्जच्या सगळ्या प्रकारचा ऊत आलेली पार्टी. देशविदेशातले अतिश्रीमंत तरुण तरुणी, सेलिब्रिटींचे पोरेबाळे इथे गोळा झाले होते. पार्टी रंगात आली होती आणि अचानक एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने इथं छापा मारला.

आर्यन खान आणि त्याची दोस्त मंडळी रंगेहाथ सापडली. समीर वानखेडे या दबंग अधिकाऱ्याने या स्टार किड्स ना उचललं. खुद्द शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. कित्येकांनी या बापलेकावर यथेच्छ टीका केली तर सलमान सारखे बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटी शाहरुखच्या दुःखात सामील होण्यासाठी मन्नत बंगल्यावर जमा झाले.

आता आर्यन खानला सोडवायचं झालं तर केस कोणाला द्यायचं हा प्रश्न होताच. त्यावेळी एक नाव समोर आलं, ते होते

भारताचे सेलिब्रिटी क्राईम लॉयर  सतीश मानेशिंदे.

सतीश मानेशिंदे सध्याचे भारतातले सर्वात हायेस्ट पेड वकील आहेत. मध्यंतरी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस त्यांनीच लढवली म्हणून ते चर्चेत आले होते. यापूर्वी देखील १९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संजय दत्तची अटक, सलमान खानचं ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरण, राखी सावंत, छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटके पर्यंत अनेक हाय प्रोफाइल केस त्यांनी लढले आहेत.

असं म्हणतात कि मानेशिंदे एका दिवसाची दहा लाखांची फी आकारतात. 

कोण आहेत हे सतीश मानेशिंदे

सतीश मानेशिंदे मूळचे धारवाडचे. तिथंच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. सतीश मानेशिंदे सांगतात ते अगदी लहानपणापासून दंगेखोर होते. कॉलेजमधील देखील सुरवातीच्या काळात ते बॅक बेन्चर म्हणून प्रसिद्ध होते. तिथे अनेकदा फी वाढी विरुद्धची आंदोलने, भांडण मारामाऱ्या या सगळ्यात एक स्टुडन्ट  लीडर म्हणून मानेशिंदे आघाडीवर असायचे. 

त्यांचा हा आक्रमक स्वभाव, नेहमी होणारे वाद यामुळे कॉलेजचे प्रिन्सिपल मानेशिंदेंच्या बद्दल नेहमी काळजीत असायचे. एकदा तर त्यांनी सतीश मानेशिंदेना थेट धमकी दिली होती,

जर बाहेरचे उद्योग बंद करून अभ्यासावर लक्ष केंद्रित नाही केलं तर थेट कॉलेजमधून हाकलून लावेन.

त्यानंतर सतीश मानेशिंदे आपल्या करियरच्या बाबतीत थोडेसे सिरीयस बनले. त्यांना कॉलेजमधून कढून टाकण्याची धमकी देणाऱ्या प्रिन्सिपलनीच सतीश यांच्या अभ्यासासाठी एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. तिथे ते बारा चौदा तास अभ्यास करायचे. याचाच परिणाम ते अतिशय चांगल्या मार्कानी पास झाले आणि शेवटी आऊटस्टँडिंग स्टुडन्ट म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला.

कर्नाटक युनिव्हर्सिटीतून वकिलीची डिग्री घेऊन सतीश मानेशिंदे मुंबईला आले. तिथे योगायोगाने त्यांना भारतातले  तेव्हाचे सर्वात मोठे क्रिमिनल वकील राम जेठमलानी यांच्याकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. हीच ती त्यांच्यासाठी आयुष्य बदलणारी घटना.

अगदी कमी वयात त्यांनी आपली मेहनत आणि प्रचंड हुशारीच्या जोरावर राम जेठमलानी यांना जिंकलं. त्यांनी या आपल्या तरुण सहकाऱ्याकडे अगदी महत्वाचे केसेस देखील सोपवू लागले. १९८६ साली मानेशिंदे यांच्याकडे पहिली टाडाची केस आली. तिथून त्यांनी टेरेरिस्ट एक्सपर्ट म्हणूनच आपली ओळख निर्माण केली.

पुण्यात झालेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या खुंटले आरोपी जिंदा व सुखा या अतिरेक्यांचा बचाव मानेशिंदे यांनी केल्यावर त्यांच्यावर अँटी नॅशनल म्हणून ठपका देखील लावण्यात आला पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी आपलय केसेस तितक्याच गंभीरतेने लढल्या.

पुढे त्यांनी राम जेठमलानी यांच्या पासून वेगळे होऊन स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली. १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यात त्यांना संपूर्ण देशभरात प्रसिद्धी मिळाली. याच खटल्यात संजय दत्त देखील अडकला होता. आधी संजय दत्तची केस मानेशिंदे यांच्याकडे नव्हती पण जेव्हा हायकोर्टातून संजय दत्तचा जामीन नामंजूर करण्यात आला तेव्हा सुनील दत्त स्वतः मानेशिंदे यांच्या भेटीला आले. त्यांनी  संजय दत्तची केस मानेशिंदे यांच्याकडे सोपवली.

तेव्हापासून आजपर्यंत सतीश मानेशिंदे हे नाव भारताच्या क्रिमिनल जगतात फेमस आहे.

म्हणूनच कधी अतिरेक्यांचा वकील तर कधी राष्ट्रद्रोही म्हणून त्यांच्यावर शिक्के बसले पण मानेशिंदे यांच्यावर शाहरुख खान सारखा मोठा सुपरस्टार आपल्या पोराला ड्रग्जच्या केसमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतो.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.