इंदिरा गांधींनी विद्यार्थी आंदोलन काबूत आणण्यासाठी यशवंतरावांना दिल्लीत बोलवून घेतलं.

वर्ष होत १९६६. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी येऊन काही महिने उलटून गेले होते. देशातली परिस्थिती दुष्काळ आणि बेरोजगारीमुळे कठीण बनत चालली होती. इंदिरा गांधीनी अमेरिकेला जाऊन धान्याची मदत आणली. शिवाय कृषीमंत्री सुब्रमण्यम हरितक्रांतीसाठी प्रयत्न करत होते मात्र ही योजना कार्यान्वित होऊन त्याचे रिझल्ट दिसण्यासाठी वेळ लागणार होता.

देशातील असंतोष वाढत चालला होता. संसदेत नवख्या असणाऱ्या इंदिराजींना विरोधकांना सामोरे कसे जावे हा प्रश्न पडला होता. म्हणूनच लोहियांनी त्यांना गुंगी गुडिया अशी संभावना केली होती.

कामराज आदि मातब्बर कॉंग्रेस नेते पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत इंदिरेला पाठींबा देऊन आपण चूक केली असे स्पष्ट म्हणू लागले होते.

त्यातच इंदिरा गांधी यांच्या पुढे मोठी आव्हाने आ वासून उभी राहिली. दिल्लीत सुरु असलेली आंदोलने

राजधानी दिल्ली हे आंदोलनाच मुख्य केंद्र बनलं होतं. राममनोहर लोहियांनी विद्यार्थ्यांची चळवळ उभी केली होती. देशभरातून विद्यार्थी दिल्लीला आणले जात होते. महागाई बेरोजगारी, फीवाढ या संदर्भात हे आंदोलन सुरु होतं. बिहार, उत्तरप्रदेश मधील मूले हिंसक झाली होती. सार्वजनिक मालमत्तेची नासाडी करत होते.

यासर्वात मोठ आंदोलन होत ते साधूंच गोवधबंदी आंदोलन”

पुरीच्या शंकराचार्यानी या मागणीला पाठीबा दिल्यामुळे हे आंदोलन एक धर्मयुद्ध बनलं होतं. जनसंघसारखे पक्ष या आंदोलनामुळे क्रांती घडेल व त्यातून आपल्या पक्षाला राजकीय बळ मिळेल या अपेक्षेत होते. यासर्वथरातून आलेल्या पाठीराख्यांमुळे साधूंचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी सरळ दिल्लीच्या संसदेवर हल्ला केला.

त्रिशूळधारी साधूंनी पूर्ण संसदेला वेढा घातला. प्रचंड मोठी दंगल झाली.

काही नेत्यांच्या ऑफिसची नासधूस करण्यात आली.एका पोलिसाचा मृत्यू देखील झाला. या आंदोलनासरोखण्यात अपयशी ठरल्यामुळे गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांचा तडकाफडकी राजीनामा पंतप्रधानांनी घेतला. नंदा यांचा या आंदोलनास छुपा पाठींबा असल्याची चर्चा सुरु होती.

दिल्लीत संपूर्ण अनागोंदी माजली होती. इंदिरा गांधीना सहकार्य न करण्याच धोरण जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी अवलंबल होतं. अखेर इंदिराजींना एकमेव व्यक्ती आठवली जी या सर्वातून बाहेर काढेल,

“यशवंतराव चव्हाण”

यशवंतराव चव्हाण तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री होते. मुंबईच्या त्यांचे पोटाचे ऑपरेशन झाल्यामुळे ते विश्रांती घेत होते. अचानक एका रात्री त्यांना फोन आला,

“ताबोडतोब दिल्लीला येऊन गृहमंत्रालयाचा कारभार हाती घ्या.”

यापूर्वी चीन युद्धात झालेल्या पराभवानंतर नेहरूंनी त्यांना आपल्या मदतीसाठी दिल्लीला बोलवून घेतल होतं अगदी त्याच प्रमाणे

हिमालयाच्या मदतीसाठी येणारा सह्याद्री इंदिराजींचा तारणहार म्हणून दिल्लीला परत आला.

यशवंतरावांनी परिस्थितीला आपल्या पद्धतीने हाताळायचं ठरवल. साधूंचे आंदोलन हिंसक झाल्यामुळे ते मोडून काढणे आवश्यक बनल होत. पुरीच्या शंकराचार्यांना अटक केली गेली. आयोग नेमण्याचे आश्वासन दिले गेले. यशवंतराव चव्हाणांच्या विनंतीमुळे जनसंघाच्या अटलबिहारी वाजपेयींनी आवाहन केले कि,”कोणत्याही प्रकारच्या हिंसेला आमचा पाठींबा असणार नाही.”

गोवधबंदी आंदोलनाची हवा कमी होण्यास सुरवात झाली. आता मुख्य प्रश्न उरला होता विद्यार्थी आंदोलनाचा. मोरारजी देसाई व स.का.पाटील या नेत्यांनी इंदिरा गांधींना सल्ला दिला होता कि बळाचा वापर करून हे आंदोलन मोडीस काढा. पण याच नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आंदोलकांवर हल्ले केले आणि त्याचा कॉंग्रेसला फटका बसला होता हे यशवंतरावांनी इंदिरा गांधीना आठवण करून दिली.

विद्यार्थी आंदोलन हा नाजूक विषय, त्यांच्या अनेक मागण्या योग्य होत्या पण त्यांचे आंदोलन आटोक्यात कसे आणायचे हा मुख्य प्रश्न होता. यासंबंधीचे सर्वाधिकार इंदिरा गांधीनी यशवंतरावांकडे दिले.

फक्त भारतातच नाही तर त्याकाळात जर्मनी पासून अमेरिकेपर्यंत संपूर्ण जगभरात विद्यार्थी आंदोलने सुरु होती. त्या आंदोलनाचा अभ्यास यशवंतरावांनी केला. सर्वप्रथम तातडीचा उपाय म्हणून राममनोहर लोहिया व इतर नेत्यांना अटक केली. दिल्लीत कडक बंदोबस्त केला. संसदेवर परत वेढा पडू नये यासाठी तिथली सुरक्षा वाढवली.

पण हा प्रश्न फक्त कायदा व सुव्यवस्थेचा नाही हे त्यांच्या लक्षात आले.

अभ्यास करताना जपान सरकार आंदोलनाला सामोरे जाताना जी पद्धत अवलंबिते ती जास्त परिणामकारक असल्याचं त्यांच मत पडलं. हाच उपाय भारतातसुद्धा करायचा विचार त्यांनी मांडला.

या पद्धतीमध्ये मोठ्याप्रमाणात निःशस्त्र पोलीस आंदोलकांच्या पुढे जातात आणि हिंसा न करण्याचे आवाहन करतात. यात काही पोलिसांना मार पडतो पण रक्तपात टळून आंदोलन अधिक व्यापक होत नाही व उग्रही होत नाही. लाठीचार्ज व गोळीबारापेक्षाही संवादाने व विश्वासाने आंदोलकांना जिंकता येते व आपोआप हिंसाचार थांबतो.

दिल्लीमध्ये ही पद्धत वापरून आंदोलन काबूत आणल गेल. याची परिणामकारकता आश्चर्यकारक होती. 

मात्र पुढील काळात शासनयंत्रणानी ही पद्धत वापरली नाही. आज गेली अनेक महिने विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. सरकारशी असलेल्या विसंवादामुळे, पोलिसी कारवाईच्या दमदाटीमुळे ते अधिकच चिघळत चालले आहे. अशावेळी यशवंतराव चव्हाणांच्या द्रष्ट्या नेतृत्वाची आठवण येते हे नक्की.

संदर्भ- यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तुत्व लेखक गोविंदराव तळवळकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.