ज्या पार्टीनं उत्तराखंड बनवलं ती निवडणुकीच्या रेसमध्ये मागे का राहिली?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलंय. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची नुसती धांदल उडालीये. सत्ताधारी पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपडतोय, तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या चुका लक्षात आणून देत, आम्ही किती भारी हे दाखवून देण्यात बिझी आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूक आहेत, त्यातचं एक उत्तराखंड आहे.

असं म्हणतात कि उत्तराखंडचा खरा रिमोट कंट्रोल हा उत्तर प्रदेशातून चालवला जातो. त्यामुळे युपी, पंजाब किंवा गोवा प्रमाण या राज्याकडे तितकसं लक्ष देत नाही. आणि म्ह्णूनच युपीप्रमाणं इथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा बोलबाला आहे. सध्या पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वात सगळा कारभार सुरु आहे.

पण काँग्रेससुद्धा इथं हातपाय मारण्याचा प्रयत्न करतंय. सध्या राज्यातली निवडणुकीची कमान हरीश रावत यांच्या हातात आहे, तर बाकीचे पक्ष आपलं अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय. असो… ते काही असलं तरी उत्तराखंडचा जेव्हा कधी विषय निघतो, तेव्हा एका पक्षाचा आवर्जून उल्लेख केला जातो, तो म्हणजे उत्तराखंड क्रांती दल…. हा तोच पक्ष आहे ज्याने उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य स्थापन केलं. पण सध्याच्या घडीला पाहिलं तर या पक्षाचा उल्लेख सुद्धा फार कमी होतो.

उत्तराखंड क्रांती दल (युकेडी) हा उत्तराखंडचा प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. उत्तराखंडमधील राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या विपरीत, हा स्वतःला उत्तराखंडमधील एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून घेतो, जो डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे.

१९३० च्या आसपास उत्तर प्रदेशातल्या गढवाल आणि कुमाऊ या हिमालयाच्या कुशीत असलेल्या भागातील जनतेने या क्षेत्राचं स्वतंत्र राज्य असावं अशी मागणी केली होती. तेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांबरोबरच त्या भागातील काही गटानं ही मागणी उचलून धरली. आणि याच गटातून २६ जुलै १९७९ मध्ये उत्तराखंड क्रांती दलाची स्थापना झाली. कुमाऊं विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.डी.डी. पंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना परिषद आयोजित करण्यात आली. 

या दलानं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या चळवळीला जास्तच उचलून धरलं, त्यामुळे तिथल्या जनतेसुद्धा त्यांना मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे वर्षभरातचं या पक्षातर्फे जसवंतसिंग बिश्त हे पहिले आमदार युपीच्या विधानसभेत निवडून आहे.  पक्षाच्या झेंड्याखाली वेगळ्या राज्याच्या मागणीने मोठ्या राजकीय संघर्षाचे आणि जनआंदोलनाचे रूप धारण केले आणि शेवटी ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तरांचल राज्य अस्तित्वात आल्यावर १ जानेवारी २००७ रोजी उत्तराखंड असे नामकरण करण्यात आले

२००२ मध्ये राज्यातील पहिल्या विधानसभा निवडणुकीत काशी सिंग ऐरी यांच्या युवा नेतृत्वाखाली, पक्षाने ७० पैकी ४ जागा जिंकल्या. पण निवडणुकीत फायदा मिळवून घेत राज्यात सरकार स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  स्वतंत्र राज्याच्या चळवळीत उशिरा सक्रिय असूनही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना राज्याच्या राजकारणात मर्यादित केले.

पण अंतर्गत फूट आणि गटबाजीमुळे उत्तराखंडच्या राजकारणात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याचं मूळ उद्दिष्ट आतापर्यंत पक्षाला गाठता आलेलं नाही. पण, उत्तराखंड क्रांती दल सामाजिक चळवळीच्या रूपात राज्यात प्रचलित असलेल्या उत्तराखंडमधील इतर लहान राज्यस्तरीय पक्ष आणि संघटनांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवते.

उत्तराखंडमधल्या मूळच्या रहिवाश्यांच्या हक्कांसाठी हा पक्ष नेहमीच पुढे असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे त्याची तुलना वर्णद्वेषी प्रादेशिकतेच्या ऐवजी नागरी प्रादेशिकतेच्या विचारसरणीसह स्कॉटिश नॅशनल पार्टी किंवा प्लेड सायमरू सारख्या डाव्या राष्ट्रवादी पक्षांशी केली जाऊ शकते, जरी या पक्षांपेक्षा युकेडीची मूळ कन्सेप्ट आणि उद्दिष्टे पूर्णपणे अविघटनवादी आहे.

पण असं असलं तरी पक्षाला राज्यात म्हणावा तसा पाठींबा अजूनही मिळालेला नाही. म्हणजे २००० साली पक्षाचे ४ आमदार, २००७ साली ३ आमदार, २०१२ च्या निवडणुकीत पक्षाने ७० पैकी १ चं जागा जिंकली होती. पण जसं कि आधी झालं, तसं भाजप किंवा कॉंग्रेस दोघांनाही पूर्ण बहुमत न मिळाल्याने, उक्राडने पुढील सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि बहुमत मिळवलेल्या कॉंग्रेसला पाठिंबा दिला. पण २०१७ मध्ये पक्षाची राज्यात परिस्थिती आणखी बेकार झाली आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

पक्षाचा सध्याचा चेहरा म्हणजे उत्तराखंड राज्य चळवळीचे प्रमुख नेते काशी सिंग ऐरी. जे उत्तर प्रदेश विधानसभेत तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. पण पक्षाची प्रसिद्धी अक्षरशः नाहीच्या घरात आहे. आता त्याच कारण आपण आधी पण पाहिलं कि, जरी उत्तराखंड स्वतंत्र राज्य म्ह्णून स्थापन होऊन २२ वर्षे झाली, पण राज्याची महत्वाची सूत्र आजही उत्तर प्रदेशातून चालतात. त्यामुळे यूपीत ज्याची सत्ता त्याचाच बोलबाला उत्तराखंड मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. 

 आता सध्याच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा उत्तराखंड क्रांती दलाने सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. त्यामुळे यंदा पक्षाच्या हाती कुठली जागा लागतेय कि, यंदाही रिकाम्या हाताने मग फिरावं लागतंय, हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.