त्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, पण

त्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, त्याने मॅच जिंकणं पसंत केलं !

२० फेब्रुवारी १९९९ या दिवशीच्या इंग्रजी वृत्तपत्रातली ही हेडलाईन. आदल्या दिवशी कोलकात्याच्या इडन-गार्डन्सवर सचिनला वादग्रस्तपणे रन-आउट दिल्यानंतर जे काही घडलं त्याविषयीचं अगदी अचूक वर्णन करणारी. १९९९ सालच्या १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात कोलकात्याच्या इडन-गार्डन्सवर कसोटी सामना खेळविण्यात येत होता.

सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने चौथ्या डावात भारतासमोर २७९ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. 

सदागोपन रमेश आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांनी यांनी भारताला मजबूत सलामी दिली होती. पण थोड्या कालावधीच्या अंतरात सक्लेन मुश्ताकने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तरीही भारत चांगल्या स्थितीत होता. 

भारताच्या १४३ रन्सवर २ विकेट पडल्या असल्या तरी अजून सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड मैदानात होते. शिवाय मोहोम्मद अझरूद्दीन आणि सौरव गांगुली बॅटिंगला यायचे होते. साहजिकच भारत अगदी सहजतेने विजयाकडे वाटचाल करतोय असं दिसत होतं. 

पण अजून मैदानात बरच काही नाट्य घडायचं होतं.

वसीम अक्रमने टाकलेल्या एका बॉलवर सचिन आणि द्रविड यांनी २ रन्स पूर्ण केले होते आणि ते तिसरा रन घेण्यासाठी धावले. तिसरा रन देखील सहज पूर्ण होईल असं वाटत असताना शोएब अख्तर सचिनला येऊन धडकला आणि,

नदीम खानच्या डायरेक्ट हिटवर सचिन रन-आउट झाला. 

शोएब सचिनला धडकला असल्याने मैदानातील अंपायर्सनी हे प्रकरण थर्ड अंपायर के.टी. फ्रान्सिस यांच्याकडे रेफर केलं. खरं तर सचिन सहज तो रन पूर्ण करू शकेल, असं वाटत होतं. पण थर्ड अंपायर फ्रान्सिस यांना मात्र तसं वाटलं नाही आणि त्यांनी सचिनला आउट दिलं. 

सचिनला आउट दिल्याने मात्र इडन-गार्डनमध्ये जमलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तसाही इडन-गार्डनचा क्राऊड त्यासाठी प्रसिद्ध होताच. इडन-गार्डन्सवरच १९९६ साली प्रेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे भारत श्रीलंकेकडून पराभूत झाला होता आणि विनोद कांबळी मैदानात ढसाढसा रडला होता. 

निर्णयाने नाराज झालेल्या प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या फेकायला सुरु केल्या.

खेळात व्यत्यय आला. त्यानंतर खुद्द सचिन तेंडूलकर आणि त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या जगमोहन दालमिया यांना प्रेक्षकांना शांत राहण्याचं अपील करावं लागलं. 

त्यानंतर खेळ सुरु झाला, पण भारताने आपल्या ३ विकेट्स पटापट गमावल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ६ विकेट्स गमावून २१४ रन्स काढल्या होत्या आणि जिंकण्यासाठी अजून ६५ रन्स हवे होते. सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे मैदानात होते. 

शेवटच्या दिवशी मॅच सुरु झाला, पण भारताचा कुठलाच प्लेअर संघर्ष करू शकला नाही आणि चिडलेल्या प्रेक्षकांनी मैदानात पाण्याच्या बॉटल, दगड आणि फळे फेकायला सुरुवात केली. मैदानात दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. 

हा सगळा गोंधळ शांत करून मैदान खाली करायला पोलिसांना जवळपास ३ तास लागले. शेवटी प्रेक्षकांशिवाय खाली असलेल्या मैदानात व्यंकटेश प्रसादच्या स्वरुपात भारताची शेवटची विकेट पडली आणि,

पाकिस्तानने ४६ रन्सनी हा मॅच जिंकली.

हे ही वाच भिडू –   

Leave A Reply

Your email address will not be published.