गणितात नोबेल नसण्याच्या चार थेअरीज..?

‘नोबेल फाउंडेशन’कडून १९०१ सालापासून स्वीडनचे वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. साहित्य, शांतता, अर्थशास्त्र, विज्ञान इ. महत्वाच्या विषयांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येते.

जवळपास सर्वच महत्वाच्या विषयांसाठी हा पुरस्कार असला तरी गणितज्ञांसाठी मात्र नोबेल पुरस्कार दिला जात नाही. तर तो नेमका का दिला जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आमचे देखील एक वाचक ‘गोविंद गोंगे’ यांना हाच प्रश्न सतावत होता. त्यांनी त्याविषयीची माहिती आमच्याकडे विचारली आणि मग आम्ही थोडी शोधा-शोध केली. त्यासंदर्भात जे सापडलं ते वाचकांशी शेअर करतोय.

गणितात नोबेल का दिला जात नाही, याचं कुठलंही अधिकृत कारण उपलब्ध नसलं तरी तो न देण्यामागच्या ४ थेअरीज प्रचलित आहेत. अनेकांनी गणितात नोबेल नसण्यामागे याच ४ थेअरीज असण्याची शक्यता वर्तविली आहे.

तर बघुयात मग कुठल्या आहेत या ४ थेअरीज..?

गणित हे व्यावहारिक शास्त्र नाही..?

मानवतेच्या सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाला गौरवान्वित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या नोबेल फाउंडेशनला  गणित हे फारसं व्यावहारिक शास्त्र वाटत नसावं. गणितातील बहुतांश गोष्टी या थेअरीवर अवलंबून असल्याने त्यांचा व्यावहारिक जीवनात फारसा उपयोग होत नाही.

ही थेअरी प्रचलित असली तरी यात फारसं तथ्य वाटत नाही. गणितातल्या आकडेवारीशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहार ठप्प होतील, त्यामुळे गणित हे व्यावहारिक शास्त्र नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

आल्फ्रेड नोबेल यांना गणितात रुची नसणे…?

नोबेल पारितोषिक ज्या विषयातील योगदानासाठी दिलं जातं, त्यातील फिजिक्स आणि केमेस्ट्री या दोन विषयासंदर्भातच आल्फ्रेड नोबेल यांचं काम होतं शिवाय जीवशास्त्र आणि साहित्याची त्यांना विशेष आवड होती. डायनामाईटच्या शोधामुळे जगाने आल्फ्रेड नोबेल यांना ‘मृत्यूदूत’ म्हणून लक्षात ठेऊ नये यासाठी शांततेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठीही हा पुरस्कार द्यायचा होता, पण अशा प्रकारे गणितात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार देण्यासाठी कुठलंही कारण नोबेल यांच्याकडे नव्हतं.

गणितासाठी प्रतिष्ठीत पुरस्काराचं आधीपासूनचं अस्तित्व…?

गणितज्ञांसाठी त्याकाळी किंग ऑस्कर दुसरा यांच्या अर्थसहाय्याने आधीपासूनच प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जात होता, त्यामुळे नोबेल यांना त्याला समांतर असं पारितोषिक सुरु करण्याची आवश्यकता वाटली नसावी, असा एक दावा करण्यात येतो.

या दाव्याला काहीच अर्थ अशासाठी नाही कारण किंग ऑस्कर दुसरा यांच्या अर्थसहाय्याने सुरु दिल्या जाणाऱ्या या गणितातील दुसऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या स्थापनेची, म्हणजेच ‘आबेल’ पुरस्काराची चर्चाच मुळी सुरु झाली होती, ती नोबेल यांनी या पुरस्काराच्या यादीतून गणिताला वगळल्यामुळे.

१८९९ साली ‘आबेल’ पुरस्काराच्या स्थापनेच्या चर्चेस सुरुवात झाली होती, जो पुढे शंभरेक वर्षांनी २००१ साली नॉर्वेच्या सरकारने स्थापन केला आणि २००३ साली सर्वप्रथम हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तात्कालिक गणितज्ञांशी असलेलं आल्फ्रेड नोबेल यांचं वैर..?

एक थेअरी अशीही आहे की काही तात्कालिक गणितज्ञांशी आल्फ्रेड नोबेल यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. त्यामुळे गणित विषयासंबंधी काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पुरस्कार देण्याची नोबेल यांची इच्छा नव्हती. नोबेल पुरस्कारांच्या यादीतून गणिताला वगळण्यामागे हे कारण असण्याची शक्यता जवळपास वाटत नाही, शिवाय ते सिद्ध करण्यासाठी कुठलेही पुरावे देखील उपलब्ध नाहीत.

हे हि वाचा –

 

1 Comment
  1. सोनल सुनील रामटेके says

    सर माफ करा , पण मी अस ऐकलेलं आहे की आल्फ्रेड नोबेल यांची पत्नी ही एक गणितशास्त्रज्ञ यांच्या सोबत पळून गेली होती या वैरी मुळे गणितात नोबेल प्राइझ दिला जात नाही हे खरं आहे का ?

Leave A Reply

Your email address will not be published.