एन्काऊंटरमधे भलत्याचाच गेम झाला आणि १८ पोलिसांना जन्मठेप सुनावण्यात आली….

तारीख होती ३ जुलै २००९. ही तारीख सामान्य तारीख कधीच नव्हती, या तारखेला डेहराडून पोलिसांनी एक एन्काउंटर घटनेला पूर्णत्वास नेल खरं पण हा एन्काउंटर इतका बेक्कार महागात पडेल असं या पोलिसांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या डेहराडून शहरात येणार होत्या. त्यामुळं संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सगळीकडे पोलिसच पोलीस दिसत होते. वाहतुकीची सोय दुसऱ्या बाजूला करण्यात आलेली होती. सगळ्या शहराला हाय अलर्ट देण्यात आलेला होता. सगळीकडे नाकाबंदी केलेली होती आणि नागरिकांची चेकिंग केली जात होती. आधीच अर्धे लोकं आपापल्या कामामुळे वैतागलेले असतात आणि त्यातल्या त्यात हे चेकिंग प्रकरण त्यामुळे लोकांचं हिरमोड होत होता.

याच चेकिंगच्या दरम्यान सर्क्युलर रोडवर असलेल्या तत्कालीन अराघर चौकीचे इन्चार्ज पि.डी. भट्ट यांनी एका मोटारसायकल वरून ट्रीप्सी जाणाऱ्या तिघांना त्यांनी अडवलं आणि त्यांची चौकशी त्यांनी सुरू केली. पण इथ एक वेगळाच विषय झाला या मोटासायकलस्वार तिघांनी थेट इन्चार्ज पी. डी. भट्ट यानाच चोपायला सूरवात केली.

पोलीस अधिकाऱ्याला मारून त्या तिघांनी त्यांची पिस्तूल हिसकावून घेतली आणि फरार झाले. पोलीस अधिकारी या तिघांना शोधू लागले.

या घटनेच्या दोन तासानंतर या घटनेतील एका आरोपीला लाडपुरच्या जंगलात एन्काउंटर करून ठार करण्यात आलं तर इतर २ आरोपी कल्टी गायब झाले. एन्काउंटर मध्ये गारद केलेल्या युवकाचं नाव होतं रणवीर सिंग. हा रणवीर सिंग बागावत गावाचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळलं.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्याच्या काळात हे एन्काउंटर प्रकरण घडल्याने सगळ्या शहरात गदारोळ झाला आणि सगळ्या पेपरच्या हेडलाईन्स म्हणून या एन्काऊंटरला हाइप दिली गेली. जेव्हा ही घटना रणबीर सिंगच्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांनी तात्काळ डेहराडून पोलीस स्टेशन गाठलं.

पोलीस स्टेशनमध्ये मात्र पोलिसांच्या डोक्याला मुंग्या आणणारी घटना घडली ती म्हणजे हा एन्काउंटर नकली होता म्हणजे ज्याला उडवायचा होता तो गायब झाला होता आणि यात या रणबीरचा गेम झाला होता.

रणबीरच्या घरच्यांनी सांगितलं की, रणबीर हा डेहराडून मध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला आला होता. आता मात्र पोलिसांची पाचावर धारण बसली. रणबीर सिंगच्या घरच्यांनी पोलिसांना विरोध केला आणि फुकट आमचं पोरगं मारलं म्हणून न्याय मागायला सुरवात केली. नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाई करा म्हणून आकांडतांडव करायला सूरवात केली मग मात्र पोलिसांनी उलटा गेम फिरवला आणि नातेवाईकांनाच लाठीचार्ज करून प्रसाद दिला.

हे प्रकरण तापू लागलं आणि राज्य सरकारवर दबाव वाढू लागला. हे प्रकरण आता हाताबाहेर जाण्याचे लक्षण दिसू लागल्याने राज्य सरकारने सीबीआय आणि सीआयडीच्या ताब्यात ही केस दिली. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला आणि या केसचा एक एक पदर उलगडू लागला.

या रिपोर्टमध्ये मारण्याच्या आधी रणबीरच्या शरीरावर २८ जखमांच्या शिवाय २२ गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. पोस्टमार्टमच्या या रिपोर्टमुळे पोलिसांनी रचलेला एन्काउंटर नकली असल्याचं समोर आलं आणि जोरदार कारवाई सुरू झाली. हे प्रकरण इतकं वाढलं की ३१ जुलै रोजी सीबीआय पथक डेहराडूनला पोहचलं. तपास सुरू झाला.

पोलिसांनी या एन्काउंटरमध्ये २९ गोळ्या झाडल्या असल्याचा दावा केला होता पण मृत तरुणाच शरीर भयानक काळं पडलेलं होतं त्यावरून या प्रकरणाची भीषणता लक्षात येतं होती. सीबीआयने पोलिसांच्या या पराक्रमाला चांगलच फैलावर घेतलं आणि कोर्टात याचिका दाखल केली. जिथं पराक्रमाच्या बढाया मारल्या जात होत्या तिथं पोलिसच नागडे झाले.

९ जून २०१४ रोजी तीस हजारी कोर्टाने १८ पोलिसांना अपहरण, खंडणी, खून अश्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. यातला एक पोलीस नंतर सुटला. नंतर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि ४ वर्षांची जेलवारी त्याला भोवली. २००९ सालचा हा फेक एन्काउंटर चांगलाच गाजला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.