मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जीपने धडक मारणाऱ्या राजाचा एन्काउंटर करण्यात आला होता…
भारताचा इतिहास हा राजेरजवाडे आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टींनी भरलेला आहे. असाच आहे आजचा किस्सा एका पराक्रमी राजाबद्दलचा. राजस्थानच्या भरतपूर साम्राज्याचे राजे होते राजा मानसिंग, ते फक्त राजवटीचे वतनदार नव्हते तर एक उच्चशिक्षित इंजिनीअरसुद्धा होते. ७ वेळा ते आमदारसुद्धा होते. राजा मानसिंग हे लोकांमध्ये अनेक कारणांनी लोकप्रिय होते.
राजा मानसिंग हे दिवसा शेतकऱ्यांना मदत करताना शेतात दिसायचे आणि रात्री राजांसोबत क्लबांमध्ये चर्चा करताना दिसायचे.
रागीट तर इतके होते कि रागाच्या भरात डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला आपल्या जीपने धडक मारली होती. या घटनेमुळे राजस्थानमध्ये मोठी चर्चा झाली होती. पण पुढे या राजा मानसिंगची हत्या करण्यात आली होती काय होतं प्रकरण जाणून घेऊया.
१९२१ मध्ये राजा मानसिंगचा जन्म झाला होता. राजपरिवाराच्या परंपरेनुसार विदेशात शिकायला जाण्याची पद्धत होती. त्यामुळे राजा मानसिंग पुढे ब्रिटनला शिकायला गेले. शिकून आल्यावर इंग्रज सेनेने त्यांना सैन्यात सेकंड लेफ्टिनंट पद देऊ केलं. त्याकाळात भरतपूरमधले लोक आपल्या गाडीवर आणि घरावर दोन झेंडे लावत असे. मानसिंग यांनीही तस केल्यावर ब्रिटिशांनी त्यांना त्यापासून रोखलं. मानसिंग यांनी ब्रिटिशांच्या नोकरीला लाथ मारली.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर निवडणूक सुरु झाल्या होत्या. १९५२ साली राजा मानसिंग यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. पण काँग्रेससोबत न जाता त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. डिग विधानसभेत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आणि काँग्रेस सोबत चर्चा करून तिथे उमेदवार न देण्याचा ठराव मंजूर केला. पुढे १९५२ ते १९८४ पर्यंत राजा मानसिंग ७ वेळा आमदार झाले.
१९८५ च्या निवडणुकांवेळी राजा मानसिंग यांचं वर्चस्व तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांना खटकायला लागलं होतं. यावेळी त्यांनी मानसिंग यांच्या विरोधात आपला उमेदवार उतरवला. आजवरच्या सगळ्या अटी तोडून ते राजा मानसिंग यांच्या विरोधात प्रचार करायला पोहचले. मुख्यमंत्र्यांना बघून काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजा मानसिंग यांचे पोस्टर फाडायला सुरवात केली.
मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांच्या या धोरणामुळे राजा मानसिंग रागाने लाल झाले , त्यांनी सगळ्यात आधी तो मंच तोडून टाकला जिथून शिवचरण माथूर भाषण देणार होते.
त्यानंतर ते आपली जीप घेऊन हेलिपॅडच्या दिशेने झेपावले. तिथे हेलिकॉप्टर बघून त्यांनी जीपला टक्कर मारायला सुरवात केली. राजा मानसिंग यांच्या या पराक्रमामुळे शिवचरण माथूर जयपूरला पळून गेले.
मानसिंगच्या या घटनांचा मुख्यमंत्र्यांनाही अंदाज नव्हता, त्यांनी सगळ्या राज्यभर कर्फ्यू लागू केला.
२१ फेब्रुवारी १९८५ रोजी राजा मानसिंग हे आपल्या जीपमधून बाहेर पडले. घरच्यांनी त्यांना बाहेर फिरायला मनाई केली होती पण राजा मानसिंग कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. ते जेव्हा आपल्या जीपमधून बाहेर पडले तेव्हा काही वेळानंतर त्यांच्या जीपचा पाठलाग करत काही पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयन्त केला पण मानसिंग थांबायच्या तयारीत नव्हते. अचानक गोळीबार सुरु झाला आणि यात राजा मानसिंग यांचा एन्काऊंटर झाला.
या घटनेत राजा मानसिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांची हत्या झाली होती. सगळा राजस्थान या घटनेने हादरून गेला. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी निवडणूक काळात केलेल्या हरकतींमुळे संशयाची सुई हि मुख्यमंत्र्यांकडे फिरू लागली. लोकांच्या भीतीने मुख्यमंत्र्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देऊन टाकला.
या घटनेच्या ३५ वर्षानंतर राजा मानसिंग यांना न्याय मिळाला. २२ जुलै २०२० रोजी या एन्काउंटरमध्ये ११ पोलिसांना दोषी पकडण्यात आलं आणि त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राजा मानसिंग यांच्या आयुष्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला धडक देणारा राजा म्हणून नोंद झाली.
हे हि वाच भिडू :
- राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ८ वेळा विजेता असलेल्या प्लेअरची हत्या करण्यात आली होती..
- याआधी एकदा पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.
- कोडॅक कॅमेरा बनवून जगाला फोटोग्राफी शिकवणाऱ्या ईस्टमनने शेवटी आत्महत्या केलेली
- पंजाबच्या लोकगायकाची गाणं गात असताना स्टेजवरच हत्या करण्यात आली होती…