कपड्याचा साबण बायकांनी अंघोळीला वापरला आणि जन्म झाला लक्स साबणाचा

रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या गोष्टीचे ब्रँड ठरलेले असतात. कित्येक वर्ष त्यात बदल होत नसतात. आपल्याला लागलेली त्या ब्रँडची सवय काही सुटत नाही. पार टूथब्रश, टूथपेस्टपासून, कपडे, घड्याळ अशा सगळ्या गोष्टींचा ब्रँड ठरलेला असतो.

सकाळी अंघोळीला जातानाही आपल्या आवडीचा साबण आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं…

जम्मूपासून ते कन्याकुमारीपर्यंत कुठंही जा. मोठ्या शहरापासून खेड्यातल्या किराणा दुकानात या साबणाची जाहिरात हमखास पाहायला मिळते. ७ दशकानंतरही अजूनही या साबणानं आपला दबदबा मार्केटमधून कमी होऊ दिला नाही. त्याचं कारण त्यांच्या मार्केटिंग करण्याच्या पद्धती तर आहेतच. त्याबरोबर सर्वांना परवडणारी किंमतही.  

तर ही गोष्ट आहे सर्वांच्या आवडत्या लक्स साबणाची 

लक्स साबण स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय बाजारात आहे. आपल्या घरात एकतरी असा व्यक्ती असतो, ज्याला लक्स शिवाय दुसरा कुठलाच साबण आवडत नाही. यामुळे लक्सनं इतक्या वर्षांनंतरही बाजारातला आपला दबदबा टिकून ठेवला आहे.

पण कपडे धुण्यासाठी तयार झालेला साबण तुमच्या-आमच्या बाथरुममध्ये कसा आला हे पण तेवढंच इन्टरेस्टिंग आहे.  

लक्झरी या शब्दापासून लक्स हा शब्द घेतला गेला आहे. लक्स फेमस होण्यास मार्केटिंग बरोबर एक अजून एक फंडा महत्वाचा आहे. श्रीमंत व्यक्ती वापरत असेलल्या लक्झरीयास वस्तुंना कमी किंमतीत मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचवण्यात लक्स यशस्वी ठरला. त्यामुळेच लक्स सगळ्यात जास्त मिडल क्लास लोकांच्या बाथरुममध्येच दिसतो. 

लक्सचा प्रवास सुरू झाला, टॉयलेटमध्ये वापरण्यात येणारा साबण म्हणून. विलियम लिव्हर आणि जेम्स डोर्सी लिव्हर या दोघा भावांनी मिळून १८८५ मध्ये लिव्हर ब्रदर्स नावाची साबण बनवण्याची लहान कंपनी सुरु केली होती. पुढे जाऊन हीच कंपनी युनिलिव्हर झाली.  

कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या साबणापासून कंपनीनं सुरुवात केली. मात्र साबणाबाबत बाजारात काय चर्चा आहे हे जाणून घेतल्यानंतर, लिव्हर भावंडांच्या लक्षात आलं की, आपण बनवलेला साबण महिला कपडे धुण्याऐवजी अंघोळीसाठी वापरतायत.

लिव्हर भावंडानी ही गोष्ट हेरुन आपल्या साबणात काही बदल केले आणि हीच गोष्ट त्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी उपयोगाची ठरली.

या दोघा भावंडांनी विल्यम हॉक नावाच्या केमिस्टला पार्टनर केलं. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साबणात ग्लिसरीन आणि पाम ऑइल वापरून मनमोहक सुगंध देणारा आणि चकाचक करणारा साबण बाजारात आणला.

इथं मात्र त्यांनी डोकं वापरलं, या साबणाला नाव दिलं हनी साबण. नावामुळे सगळ्यांचं लक्ष साबणाकडं गेलं. परत नाव बदलून सनलाइट करण्यात आलं. मात्र, हे नाव जास्त दिवस ठेवलं नाही. पुढं ते बदलून लोकांच्या जीवनशैलीशी जोडलं.

आणि नाव ठेवण्यात आलं लक्स.

ज्यावेळी भारतीय बाजारात लक्सची एंट्री झाली, त्यावेळी स्वदेशी वस्तूंबाबत लोकं आत्मीयता बाळगून होते. त्यामुळे इथे जम बसवण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागेल याची जाणीव लक्सला होती. 

भारतात लक्सची इंट्री झाली ती १९२५ साली. 

त्यावेळी भारतीय बाजारात काही मोजक्याच साबणाच्या कंपन्या होत्या. स्वदेशी असणारा ‘वतनी’ नावाचा साबण भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होता. याचा प्रचार स्वातंत्र्यलढ्यातील काही जण करत होते असंही सांगण्यात येतं. वतनी याचा अर्थ ‘वतन से’ असा होतो. १९५० मध्ये मधुबाला सारख्या अभिनेत्रीनंही या साबणाची जाहिरात केली होती.  

पहिल्या महायुद्धामुळे युरोपात होणारी चंदनाची निर्यात ठप्प झाली होती. त्यामुळे म्हैसूरच्या राजानं या चंदनाचा उपयोग करण्याच्या विचार केला. त्यातून म्हैसूर सॅंडल सोपचा जन्म झाला. 

तर गोदरेजचे सिंथॉल आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध होते. अशा परिस्थितीत लक्सला भारतीय बाजारपेठांमध्ये आपलं बस्तान बसवणं सोपं नव्हतं. एकीकडे जाहिरात आणि मध्यमवर्गीयांना आपल्याकडे खेचून घेण्यसाठी कमी किंमतीत चांगला पर्याय देत लक्सनं भारतीय बाजारपेठेत आपलं बस्तान बसवलं.

 लक्सनं मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित केलं. कमी किंमतीत श्रीमंत वापरतात त्याप्रमाणं वस्तू मिळतील अशी जाहिरात केली. त्यामुळे गेल्या ७ दशकांपासून लक्स भारतीय ग्राहकांशी जोडलं गेलंय. अजूनही टॉप ५ साबणांमध्ये लक्सचं नाव घेतलं जातं.  

लक्सचा केवळ साबण नाही, तर इतर उत्पादनं सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. आता काही जण साबणाऐवजी बॉडी वॉश वापरतात. बाजारात बॉडी वॉश आणणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही लक्सचा समावेश आहे. हॅन्ड वॉश, लिक्विड जेल, परफ्युम या वस्तूही लक्सनं भारतीय बाजारपेठांमध्ये आणल्या असून त्यांना चांगली डिमांड आहे. 

लक्सच्या जाहिरातीत त्या-त्या काळातल्या फेमस असणाऱ्या सगळ्याच अभिनेत्री झळकल्या आहेत. 

भारतात लक्स साबणाच्या जाहिरातीत मधुबाला, माला सिंह, हेमा मालिनी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, जुही चावला, करिष्मा कपूर, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी, करीन कपूर, तब्बू , कॅटरिना कैफ अशी भली मोठी रांग आहे. यात अभिषेक बच्चन, शाहरुख खान या अभिनेत्यांचा सुद्धा समावेश आहे. मध्यंतरी शाहरुख खाननं केलेल्या लक्सच्या जाहिरातीमुळे मोठा वादही निर्माण झाला होता. ५० पेक्षा अधिक बॉलिवूडच्या कलाकारांनी लक्सची जाहिरात केल्याचं पाहायला मिळतं.      

लाईफबॉय, संतूर, पिअर्स, डेटॉल, डव यासारख्या तगड्या कंपन्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करत लक्स साबण बाजारात उभी आहे, आपल्याला सुगंध देत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.