देशाची तर वाट लागल्याच, पण श्रीलंकन क्रिकेटही खड्ड्यात गेलंय

आपले सख्खे शेजारी असणाऱ्या श्रीलंकेत सध्या मेजर राडा सुरू आहे. लोकांचे खायचे वांदे झालेत, जीवनावश्यक गोष्टी प्रमाणाच्या बाहेर महाग झाल्यात. तिथं आणीबाणी जाहीर झाली आहे आणि लोकं सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. कुणी आंदोलन करतंय, कुणी हिंसक झालंय… सगळेच जण आपला देश पुन्हा पूर्वपद व्हावा म्हणून झगडतायत.

विशेष म्हणजे देश संकटात असताना, नागरिकांवर अन्याय होत असताना तिथल्या क्रिकेटर्सनंही बोटचेपी भूमिका घेतलेली नाही. आंदोलकांना पाठिंबा देत त्यांनी सध्याच्या सरकार आणि व्यवस्थेविरुद्ध जाहीरपणे बोलायला सुरूवात केली आहे.

रोशन महानमा, सनथ जयसूर्या हे क्रिकेटर्स तर थेट आंदोलनात उतरलेत, पण सध्या आयपीएलसाठी भारतात असलेल्या कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, लसिथ मलिंगा यांनीही सोशल मीडियाद्वारे आपण लोकांसोबत असल्याचा दावा केलाय.

आता लंकेच्या राजकारणात आणि तिकडच्या सरकारनं ठरवलेल्या धोरणांमुळं प्रचंड उलथापालथ झाली आणि श्रीलंकन नागरिकांवर आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सध्या लंकेत जे सुरू आहे त्यावर तिकडचे क्रिकेटर बोलत असले, तरी त्यांच्या क्रिकेट विश्वातही सगळं काही आलबेल आहे असं नाही.

भारी भूतकाळ असलेलं लंकन क्रिकेट वर्तमानात गंडलेलं आहेच, पण त्यांच्या भविष्यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे.

भूतकाळ बघायचा झाला, तर…

सनथ जयसूर्या, रोमेश कालुवितरणा, अरविंदा डी सिल्व्हा, अर्जुन रणतुंगा… या चार नावांना घाबरण्यात कित्येकांचं बालपण गेलं. पहिल्या बॉलपासून तुटून पडणारी ओपनिंगची जोडी, महत्त्वाची मॅच असली की हमखास रन्स करणारा अरविंदा आणि कॅप्टन कमी आणि कुटुंबप्रमुख जास्त वाटणारा रणतुंगा… म्हणजे लंकन क्रिकेटचं सोनं होतं.

या चौकडीनं बराच काळ आपली दहशत बसवलीच, पण त्यांच्यानंतरही अट्टापटू, जयवर्धने, वास, संगकारा, मलिंगा, मेंडिस आणि दस्तुरखुद्द मुरलीधरन यांनी ही सुवर्णकाळाची परंपरा पुढं चालवत नेली. २००७ पासून तर लंकन टीम सातत्यानं वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धांच्या सेमीफायनल-फायनलपर्यंत पोहोचत होती. २०१४ मध्ये त्यांनी टी२० वर्ल्डकपही मारला, पण त्यानंतर मात्र त्यांची गाडी गंडली ती गंडलीच.

पण लंकन क्रिकेटचा बाजार का उठला?

प्लेअर्स आणि बोर्डातले वाद हे एक कारण. पैशांचे राडे तर सुरू होतेच, त्यामुळं प्लेअर्सला मॅचेस खेळूनही मानधन मिळत नव्हतं. मग आता प्लेअर्सनं संप करुन पाहिला, थेट बोलून पाहिलं. तडजोड झाली आणि क्रिकेट पुन्हा सुरू झालं.

मग क्रिकेटर्सनं काय केलं, तर सरळ बोर्डाला फाट्यावर मारायला सुरुवात केली. बायोबबलच तोड, महत्त्वाच्या मॅचआधी विश्रांतीच घे असे मॅटर सुरू झाले. हळूहळू सगळी सिस्टीमच गंडत गेली.

लंकन बोर्ड पण काय शहाणं नव्हतं, त्यांचं धोरण कुणाच्या तीर्थरुपांनाही कळायचं नाही. टीम जरा कुठं खराब खेळली, हे डायरेक्ट कॅप्टन बदलायचे, तरी खराब खेळली तर कोचला रामराम साहजिकच या सगळ्यामुळं एक ना धड भाराभर चिंध्या अशी लंकन क्रिकेटची परिस्थिती झाली.

२०१७ मध्ये अँजेलो मॅथ्यूजच्या जागी उपुल थरांगा कॅप्टन झाला, थरांगाला काही महिनेच झाले होते, तेवढ्यात थिसारा परेराकडं कॅप्टनशिप देण्यात आली. त्याच्याकडून काही महिन्यात पुन्हा मॅथ्यूज, त्याच्यानंतर दिनेश चंडिमल. पुन्हा कॅप्टन झाला लसिथ मलिंगा, मग वर्ल्डकप तोंडावर आलेला असतानाच दिमुथ करुणारत्ने. त्याच्यानंतर कुसल परेरा आणि मग दासून शनाका… असा सगळा खेळ.

या सगळ्याचा टीमवर तर परिणाम झालाच. कारण लंकन टीम म्हणजे किरकोळ टीम वाटायला लागली. ज्या टीममधल्या राखीव खेळाडूंची नावंही लक्षात असायची, त्यांच्या टीममधली सध्याची चार नावं पटकन आठवून बघा… गुगल करण्याशिवाय पर्याय नाही.

पण या परिस्थितीला श्रीलंकेचे माजी खेळाडूही काही प्रमाणात जबाबदार आहेतच,

आता भारताचे अनेक सुपरस्टार रिटायर झाल्यानंतरही भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलेत. त्यांनी अगदी अचानक देशातल्या क्रिकेटशी नाळ तोडली नाही. आपल्याच देशातला, ज्याला खेळताना पाहून आपण मोठे झालोय असा सिनिअर आपला कोच असणं कुठल्याही यंगस्टरसाठी महत्त्वाचं ठरतं.

तिकडं श्रीलंकेचे माजी खेळाडू कोच तर झाले, पण आपल्या देशासाठी नाही.

आयपीएल, बीबीएल इथं लंकन खेळाडू दिसू लागले, पण त्यांच्या क्रिकेटचा आणि यंगस्टर्सचा गंडेलशहा झाला होता. जर जयवर्धने, संगकारा, जयसूर्या, महानमा यांनी आपल्या देशातली पोरं घडवली असती, तर आज लंकन क्रिकेटचं चित्र खरंच वेगळं असतं.

सध्याचा मॅटर सोडला, तरी श्रीलंकेनं डोमेस्टिक क्रिकेट बलवान करण्याकडे लक्ष दिलंच नाही. भारतात ज्या प्रकारे मैदानं, स्पर्धा आणि आर्थिक ताकद उभी राहिली, ते श्रीलंकेत झालं नाही. त्यामुळंच रणतुंगा, अरविंदा, संगकारा, मुरली, जयवर्धने यांनी उभा केलेल्या सुवर्णकाळाला उतरती कळा लागली.

वाचताना तुम्हाला वाटलं असेल, की तिकडं एवढा राडा सुरू असताना आपण क्रिकेटबद्दल का बोलतोय?

तर जरा विचारांना थोडा ताण द्या. १९९६ मध्ये वर्ल्डकप सुरू असतानाच श्रीलंकेत अराजक माजलं होतं. राजकारणामुळे अर्थकारण आणि पर्यायानं लोकांचं जगणंही डळमळीत झालं होतं. पण रणतुंगाच्या सेनेनं वर्ल्डकप जिंकला आणि लंकन लोकांनी कित्येक दिवसांनंतर आनंद साजरा केला.

लोकांना एक करण्याची, नवी स्वप्नं दाखवण्याची आणि जगण्याचं कारण देण्याची ताकद क्रिकेटमध्ये असते, म्हणूनच आत्ताचा मॅटर निवळल्यावर लंकन क्रिकेटर्सनं राजकारण आणि बाहेरच्या देशातल्या कोचिंग सोबतच स्वतःच्या देशातल्या क्रिकेटकडं पाहणंही तितकंच गरजेचं आहे. नायतर भविष्यापुढं असलेलं प्रश्नचिन्ह काय मिटणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.