आज जगप्रसिद्ध झालेल्या रतलामी शेवचं क्रेडिट भिल्ल समाजाला जातं…!!!

रतलाम जंक्शन. मध्यप्रदेशातलं प्रसिद्ध रेल्वे स्टेशन. या स्टेशनवर कधी गेलात तर तिथे रतलाम शेव विकणारे बरेच भेटतील. आपल्याकडे जी शेव असते त्यापेक्षा बरीच मोठ्ठी. अगदी जाड गाठी असणारी शेव. एकदम मसालेदार आणि तिखट असणारी ही शेव प्रचंड भारी असते. म्हणजे या शेव चा एक विशिष्ट फॅन बेस देखील आहे. 

रतलाम हा मध्यप्रदेशातला जिल्हा. माळवा भागात येणारा. या शहराची स्थापना २०० वर्षांपूर्वी झाल्याचं सांगण्यात येत. त्यापूर्वी देखील रतलाम होतंच पण तेव्हा रत्नापुरी अशी त्याची ओळख होती. आजही उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाताना रतलाम लागतं. 

आज ते रेल्वेने जाताना लागतं आणि काही शेकडो वर्षांपूर्वी ते ब्रिटींशांना, मुघलांना, मराठ्यांना लागायचं. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा व्यापारी मार्ग हा रतलाम वरूनच जायचा. याच भागात रतलामी शेव प्रसिद्ध झाली.. 

रतलामी शेवचा इतिहास काय आहे… 

हा इतिहास सुमारे ३०० हून अधिक वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत. त्या काळात मुघल सैन्य दक्षिणेकडे चालले होते. वाटेत या मुघल सैन्याचा मुक्काम रतलामच्या आसपास पडला. इथे मोठ्या प्रमाणात भिल्ल आदिवासी समाजाच्या लोकांची वस्ती होती. 

मुघलांच्या सैन्याला तेव्हा शेव खायची इच्छा झाली.

पण त्या काळात या भागात गहू पिकवला जात नव्हता. साहजिक शेव हा प्रकार भिल्ल समाजाला माहित नव्हता. हरभरा आणि बाजरी हे तेव्हाचं प्रमुख पीक असल्याचं सांगितलं जातं. तेव्हा बेसनाच्या पीठाचा वापर करुन भिल्ल समाजाने शेव केली. त्यांच्या स्थानिक पद्धतीने ही शेव मसाला टाकून करण्यात आली.

दिल्ली किंवा उत्तर भारतात तेव्हा असणाऱ्या शेवपेक्षा ही शेव जास्त तिखट आणि मसालेदार होती. त्यामुळे मुघलांना हि शेव बरीच आवडली व पुढे व्यापारी मार्गावर ही शेव विकली जावू लागली अशी कथा आहे… 

आत्ता यात किती तथ्य आहे हे सांगता येत नसलं तरी रतलामच्या शेवला GI टॅग भेटला आहे. त्यामुळे रतलाम शेव ही मुळची रतलामचीच व इथल्याच स्थानिकांनी ती विकावी यावर तर शिकामोर्तब झालेलच आहे. 

२०१७ साली GI टॅग भेटला, रतलाम शेवची या भागातून दरदिवशी सुमारे १० ते १५ टनांची विक्री होत असल्याची आकडेवारी सांगते. नुसत्या रतलाम व आजूबाजूच्या भागात रतलाम शेव विकणाऱ्या दुकानांची संख्या ५०० च्या घरात आहे. कधीकधी तर लोकांची मागणी पुर्ण करता येत नसल्याचं दुकानदार सांगत असतात. 

आज या भागात रतलामी शेवची एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे आणि त्याचं श्रेय निर्विवादपणे “भिल्ल” समाजाला जात हे मात्र नक्की..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.