एका गावातून १० टनापर्यन्त भडंग विकला जातो, असा असतो बिझनेस भावांनो…!

सांगली – कोल्हापूर हायवेला जयसिंगपूर लागतंय. तिथं एका हॉटेलच्या बाहेर मर्सिडीज, ऑडी वगैरे अशा सगळ्या ब्रँडेड गाड्यांपासून ते स्कुटीपर्यंत सगळ्या गाड्या उभ्या असतात. आता हे लोक या गाड्या थांबवून एसीतुन उतरून खास जेवायला थांबतात असं वाटत असेल तर तुम्ही थांबा.

यातील ९९ टक्के गाड्या उभ्या असतात ते जयसिंगपूरचं प्रसिद्ध असलेलं आंबा भडंग खाण्यासाठी.

आपल्याकडे उडपी ओळखले जातात ते टिपिकल इडली-डोसा सांबरम रस्सम या सगळ्या साऊथ इंडियन पदार्थांसाठी. पण जयसिंगपूरच्या एका उडप्याने भडंगचा व्यवसाय सुरु केला आणि त्याचा पण ब्रँड होऊ शकतो दाखवून दिलं आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली जयसिंगपूर ही उद्यम नगरी. या व्यापारी शहरात अनेक उद्योग भरभराटीस आले.  मूळचे उडपीचे असलेले जगू मुल्ल्या हे साधारण ६० च्या दशकात हॉटेल व्यवसायासाठी स्थलांतरित होऊन जयसिंगपुरात आले. आल्यानंतर १९६३ सालापासून त्यांनी साधं पत्र्याचं शेड मारून एक नाष्टा सेंटर सुरु केलं. त्यात ते भडंग पण पेपरमध्ये बांधून द्यायचे.

आता ते नुसतंच बांधून हे घे खा! असं करायचे का? तर आजिबात नाही. त्या लालेलाल आणि चमचमीत भडंगला अगदी गरम गरम फोडणी टाकून, कांदा, लिंबू, कोथिंबीर वगैरे मारून खाणाऱ्याच्या हातात ठेवायचे. आधीच टेस्टी असलेल्या पदार्थाला अजून टेस्टी बनवायचे. 

त्यावेळी त्यांचा सगळ्यात जास्त खपणार पदार्थ म्हणजे भडंगच होता.

थोड्याच दिवसात जयसिंगपूरमध्ये हे भडंग फेमस झालं. अगदी रोडलाच असल्यामुळे रस्त्यानं येणारी जाणारी माणसं टेस्ट घेऊ लागले. तेच लोकं पुढे इतरांना पण इथल्या या भडंग बद्दल सांगायची. मुळात जयसिंगपूरच्या रस्त्यावरुन कर्नाटक, कोकण वगैरे या भागातील लोकांची सतत ये जा असते.

त्याची कारण म्हणजे एकतर हे शहर सांगली आणि कोल्हापूर या दोन मुख्य शहरांच्या मुख्य रस्त्यावर आहे. सोबतच इथून कर्नाटक राज्याची सीमा जवळ आहे, त्यात जवळच नरसोबाची वाडी आहे. पुढे कोल्हापूरमध्ये आंबाबाई, ज्योतिबा या देवस्थानांना भेटी देणारे भाविक, खाली कोकणात जाणारे पर्यटक अशा सगळ्यांमुळे हे भडंग बाहेरच्या राज्यासह कोकणात लोक बांधून घेऊन जाऊ लागली.

मागणी वाढली म्हणून टेस्टमध्ये वडाप काम करायचं असला उद्योग मुल्ल्या यांनी कधीच केला नाही. पुढे त्यांची दुसरी पिढी या व्यवसायात उतरली. त्यांच्याकडून पण तीच टेस्ट मेंटेन ठेवली गेली. अगदी पुढचे ३७ वर्ष मुल्ल्यांकडून पेपरमधून किंवा प्लेट त्याचं प्रेमानं कांदा, लिंबू टाकून खाऊ घालायचे.

हळू हळू त्यांचं भडंग बाहेर विकायला नेण्यासाठी ऑर्डर येऊ लागल्या. लोक देखील बांधून नेत होते. त्यामुळे मुल्ल्या कुटुंबीयांनी पुढे उडी मारायची ठरवलं. २००० साली त्यांनी पॅकेजिंग मध्ये भडंग सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या आंबा भडंगने कधी मागं वळून बघितलेलंच नाही. 

पुढे मुल्ल्या कुटुंबीयांनी जय आंबा भडंग आणि आंबा भडंग असे दोन स्वतंत्र ब्रँड सुरु केले.

आज हे दोन्ही पण फेमस आहेत. शिवाय आता त्यांच्या तिसऱ्या पिढीकडे व्यवसाय आला असला तरी ५८ वर्षापूर्वीच्या जगू मुल्ल्यांची तीच टेस्ट कायम आहे.

आज नुसत्या एका जय आंबा भडंगच बघायचं झालं तर ते महिन्याला १० टनांपर्यंत भडंगाची विक्री करतेत. यात अगदी अख्ख्या महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये त्यांचं भडंग जाऊन पोहचलं आहे. २०१८ मध्ये तर आंबा भडंगची अमेरिकेसोबत इतर देशांमध्ये दररोज जवळपास २५० किलो भडंगाची निर्यात व्हायला लागली होती.

इडली डोश्याच्या चाकोरीतून बाहेर पडून एका उडप्यानं सुरु केलेला हा भडंगचा ब्रँड आज जयसिंगपूरच नाव करणारा ठरलाय हे नक्की.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.