जेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदीला विरोध केला होता

दिवस होता ५ जानेवारी २००४.  संभाजी ब्रिगेडच्या १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन (BORI) संस्थेवर  हल्ला केला.  इमारतीची तोडफोड केली, पुस्तके आणि कलाकृतींची, मालमत्तेची नासधूस केली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती अजूनही स्पष्ट झाली नाहीये. विशेषत:  हस्तलिखिते आणि इतर ऐतिहासिक कलाकृतींचं न भरून येणारं नुकसान झालं होतं असं सांगण्यात येतं. या हल्ल्याच्या आरोपाखाली संभाजी ब्रिगेडच्या ७२ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

आणि हल्यामागचं कारण होतं जून २००३ मध्ये प्रकाशित झालेलं जेम्स लेनचचं ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचं पुस्तक.

या पुस्तकात माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. त्यामुळे सुरवातीपासूनच या पुस्तकाचा जोरदार विरोध करण्यात येत होता.

याधीही शिवसेना कार्यकर्त्यांनी भांडारकर संस्थेशी संलग्न एका स्कॉलरवर पुस्तकाच्या कामी लेनला मदत केली म्हणून हल्ला केला होता.

मात्र तरी प्रकरण शांत होत नव्हतं. आणि त्यातच पुन्हा २००४ च्या संभाजी ब्रिगेडने केलेल्या हल्ल्यानंतर वातवरण खवळून निघालं होतं.

संभाजी ब्रिगेडच्या हल्यावर प्रतिक्रिया देताना तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले होते-

”अशा हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो पण त्याचवेळी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या लेखकावर काही कारवाई केली जाऊ शकते का? पुस्तकावर बंदी घालता येईल का? या प्रश्नावर राज्यसरकार कायदेशीर सल्ला घेत आहे”

पुढे ९ जानेवारी २००४ ला डेक्कन जिमखाना पोलिसांनी जेम्स लेनच्या विरोधात FIR देखील दाखल  केला. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३(ए) अंतर्गत आरोप नोंदवले गेले होते. या गुन्ह्यात ऑक्सफर्ड प्रेसवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तोपर्यंत ऑक्सफर्ड प्रेसने देखील हे वादग्रस्त पुस्तक बाजारातून माघारी घेतलं.

आणि तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने पण कलम १५३ आणि १५३(ए)  या दोन कलमांच्या अंतर्गत जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातली. 

मात्र या घटनेचे पडसाद पुन्हा देशभर उमटले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही ठोस कारवाई तोपर्यंत झाली नव्हती. त्यातच सरकराने पुस्तक बॅन केलं होतं. महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला होता.

मात्र पुस्तकावरील बंदीला विरोध करणाऱ्यांमध्ये एक आश्चर्यचकित करणारं नाव पुढं आलं होतं… ते म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी.

त्यावेळी केंद्रात एनडीएच्या नेतृत्वाखालचं वाजपेयींचं सरकार होतं. आणि पंतप्रधानांकडून बंदीच्या विरोधात भाष्य करण्यानं विषय पुन्हा चर्चेला जाऊ लागला.

“तुम्हाला एखाद्या पुस्तकातील काही आवडत नसेल, तर त्यावर बसून चर्चा करा. पुस्तकावर बंदी घालणे हा उपाय नाही, आपण त्याला वैचारिकदृष्ट्या हाताळले पाहिजे… एखाद्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतरही मतभेद कायम राहिले तर सर्वोत्तम मार्ग आहे, या विषयावर आणखी एक चांगलं पुस्तक घेऊन येणं “

आणि वाजपेयींनी ज्या ठिकाणी हे मत व्यक्त केलं होतं त्याचा एक इंटरेस्टिंग निरीक्षण टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळी छापून आलं होतं.

“आयरनी म्हणजे सहारा विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजींच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केलं होतं”

आजच्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वी सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव होतं.

पंतप्रधानांच्या या विधानाचे राज्यात जोरदार पडसाद उमटले. पण सगळ्यात जास्त गोची झाली तेव्हा भाजपचा मित्र पक्ष असेलल्या शिवसेनेची. यात भर पडली तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या विधानाची. १६ मार्च २००४ ला  अडवाणी यांनी

 “ते कोणत्याही वादग्रस्त प्रकाशनावर बंदी घालण्याच्या विरोधात आहेत”.

असं विधान केलं.

देशातल्या दोन प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. विरोधकांच्या हातात तर आयताच कोलीत सापडलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेतपण यावरून जोरदार गदारोळ झाला.

 पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केल्यानंतर सभागृह तहकुब देखील करावं लागलं होतं.

त्याचवेळी राज्याच्या विधासभेच्या निवडणुका तोंडावर होत्या. आणि याच निवडणुकांच्या प्रेशरखाली वाजपेयींनी आपली भूमिका बदलली.

त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करताना अचानक लेनच्या पुस्तकावर सरकारी बंदी घालण्याचा जो निर्णय  होता त्यावर यु टर्न घेतला आणि ही एक चांगली कल्पना होती असं म्हटलं. इतकंच नाही तर

 “आम्ही परदेशी लेखकावर कारवाई करण्यास तयार आहोत. सर्व परदेशी लेखकांना चेतावणी आहे की आमच्या राष्ट्रीय अभिमानाशी खेळू नका”

अशी भूमिकाही वाजपेयींनी घेतली.

आता जेम्स लेनने मी लिहलेल्या पुस्तकांसाठी मला बाबासाहेब पुरंदरे यांची कोणतीच मदत झाली नव्हती असं म्हटल्याने पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यासाठीच सांगितलेला हा किस्सा.

संदर्भ:-

  • https://indianexpress.com/article/news-archive/pm-flags-off-mumbai-campaign-opposes-ban-on-shivaji-book/
  • https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/uproar-in-house-as-df-defends-shivaji-ban/articleshow/567254.cms
  • https://www.complete-review.com/quarterly/vol5/issue1/laine0.htm

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.