नेहराजी काय करू शकतात? हातात कागद आणि शहाळं घेऊन टीमला प्लेऑफमध्ये नेऊ शकतात

यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चेत राहील असं काय घडलं? तर मुंबई इंडियन्स झटक्यात प्लेऑफ्सच्या रेसमधून बाहेर गेली. चेन्नईची पण सारखीच स्थिती, गतविजेती असणारी टीम प्लेऑफ गाठण्यासाठी बेरजेवर अवलंबून आहेत. म्हणजे ज्या दोन टीम्सकडे १४ पैकी ९ आयपीएल ट्रॉफी आहेत, त्यांचा यावेळी बाजार उठला.

दुसऱ्या बाजूला ही आयपीएल गाजवली, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांनी. गुजरात तर यावेळी प्लेऑफ्स गाठणारी पहिली टीम ठरली आहे.

तसं गुजरातची टीम चर्चेत आली होती, ते पार मालक, लोगो आणि नाव ठरलं तेव्हापासून. पण या चर्चेनं कळस गाठला, जेव्हा गुजरातचा कॅप्टन म्हणून नाव जाहीर झालं, हार्दिक पंड्याचं. पंड्या तसा क्रिकेटर म्हणून स्फोटक, त्यात टी२० मध्ये तर गडी राडाच करत असतोय.

हे भारी असलं, तरी पंड्याचं मैदानाबाहेरचं वागणं, त्याचा गंडलेला फॉर्म या गोष्टी फक्त चर्चेचा नाही, तर चिंतेचा विषय होता. त्यात कॅप्टन्सीचं ओझं पंड्या कसा पेलणार हेही महत्त्वाचं होतं.

गुजरातनं कॅप्टन अनाऊन्स केल्यावर जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी त्यांनी कोच अनाऊन्स केल्यावर झाली. कारण कोच कोण होतं? तर आशिष नेहरा. 

आपले लाडके नेहराजी.

मैदानाबाहेर, मुलाखतींमध्ये, मित्रांच्या गप्पांमध्ये नेहरा म्हणजे एकदम फनी माणूस वाटतो. जोक झाला की टाळी देणारा, सिरीयस मोमेन्टमध्ये हसवणारा… फुल चिल कार्यकर्ता. नेहराच्या दातावर आपण केलेले जोक नेहराला सांगितले असते, तर तो त्यावरही हसला असता, इतका निवांत माणूस.

नेहराला चिडलेलं दोनच वेळा पाहायला मिळालं, पहिल्यांदा जेव्हा धोनीनं त्याच्या बॉलिंगवर कॅच सोडला तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा नेहरा आरसीबीचा कोच असताना प्लेअर्सनं चुका केल्या तेव्हा.

त्यामुळं पंड्या आणि नेहराजी हे मिश्रण कसं फिट बसतंय याचीच सगळीकडे चर्चा होती.

ऑक्शनमध्ये जिथं बाकीचे भिडू सुटाबुटात, चष्मा लाऊन आले होते, तिथं नेहराजी मात्र शर्ट पॅण्टमध्ये होते. तिथंही चेष्टामस्करी सुरूच होती. खरी परीक्षा होती ती मैदानात…

आयपीएलचे कोच म्हणलं की डगआऊटच्या पुढं एक टेबल, आजूबाजूला एक दोन कार्यकर्ते, समोर लॅपटॉप, डायरी, मधूनच नोट्स काढणार, लॅपटॉपवर काहीतरी लिहिणार… पण नेहराजींचा पॅटर्न वेगळाय, हा बाऊंड्री लाईनच्या जवळ उभा रहायचा हातात फक्त एक कागद घेऊन. कधी कधी पॅव्हेलियनच्या पायऱ्यांवर तोच कागद वाचत बसायचा.

बाकीचे कोच, प्लेअर्स एनर्जी ड्रिंक्स, महागडं पाणी पित असतात, तिथं नेहरा शहाळ्याचं पाणी पित निवांत असतोय. ना कसला बडेजाव, ना लय टेन्शन.

आपल्या आयुष्यातला हा मंत्र नेहरानं गुजरातच्या प्लेअर्सलाही दिला. गुजरातनं आपली दुसरी मॅच जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेहराला स्पीच द्यायचं होतं. त्याच्याआधी भलंमोठं स्पीच झालेलं, 

पण नेहरा म्हणला… ”कुछ नहीं. अच्छेसे खाओ और सो जाओ. अगले मॅच के लिए हमारे पास पाच दिन है, चिल करो.”

कोण बरोबर खेळलं, कोण चुकीचं खेळलं याचा कणभरही लोड नेहरानं घेतला नाही आणि प्लेअर्सनाही दिला नाही. भारतीय संघाचा माजी कोच गॅरी कर्स्टननं एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मोठ्या प्लेअर्सना तुम्ही बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कशी करायची याबाबत कोच म्हणून सांगत बसण्यात काय अर्थ नाही. तुम्ही त्यांना गरज असेल तेव्हा सल्ला देता, मदत करता.”

नेहरानं अगदी हेच केलं. टीमचा पहिलाच सिझन, कॅप्टनची पहिलीच मोठी जबाबदारी, सिनिअर खेळाडूंपेक्षा नवीन पोरांवर दाखवलेला विश्वास आणि परफॉर्मन्सचं दडपण न देता खेळायचं स्वातंत्र्य देणं या गोष्टींचा गुजरात टायटन्सला मोठा फायदा झाला.

एक कोच नाही, तर कोचची फौज असून पण टीम्स अपयशी ठरतायत, तिथं नेहराच्या स्ट्रीट स्मार्टनेसनं राडा केलाय. अधेमध्ये तो बाऊंड्री रोपवर उभा राहून चीडचीड करतो, टाईमआऊटमध्ये येऊन हार्दिक पंड्या सोबत तावातावानं गप्पा मारतो… पण चिल राहतो.

सिझन सुरू व्हायच्या आधी, एका मुलाखतीत नेहरा बोलला होता… “पहिल्या सिझनपासून ट्रॉफी जिंकण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे.”

त्याची टीम प्लेऑफ्समध्ये जाणारी पहिली टीम ठरलीये, जिंकणं अशक्य वाटत होतं अशा मॅचेस त्यांनी मारल्यात आणि भल्याभल्यांना घामही फोडलाय. गुजरातनं ट्रॉफी मारली, तर हार्दिकची टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून दावेदारी आणखी स्ट्रॉंग होईल, आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या यंगस्टर्सना मोठा चान्स मिळेल.. याचं जितकं क्रेडिट त्यांच्या परफॉर्मन्सला जाईल, तितकंच नेहराजींच्या कोचिंगलाही.

एक मात्र आहे, बिस्किटात पार्लेजी आणि क्रिकेटमध्ये नेहराजी… नाद नाहीच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.