सेहवाग आणि नेहरा या दोन वाघांचा क्रिकेट प्रवास एकाच स्कुटरवरून सुरु झाला

तुम्ही बॉलर नसाल, तर वीरेंद्र सेहवाग हे नाव ऐकल्यावर चेहऱ्यावर फिक्स हसू येणार. त्याचं नाव ऐकून आपण लगेच, ‘काय साला दिवस होते’ मोडमध्ये जातो. सेहवाग गांगुली-कोहलीसारखा आक्रमक नव्हता, धोनीसारखा शांत नव्हता, सेहवाग फक्त सेहवाग होता. खिशातला लाल रुमाल, डोक्याला बांधलेलं लाल फडकं, ब्रिटानियाची बॅट, मॅचच्या पहिल्या बॉलवर बाऊंड्री आणि छकडा मारून पूर्ण केलेलं शतक म्हणजे टिपिकल सेहवाग.

मुलतान का सुलतान, नजफगढचा नवाब अशी विशेषणं विरुला मिळत असली; तरी तो खऱ्या अर्थानं बॉलर्सचा कर्दनकाळ होता. भीती, प्रेशर, टेन्शन असले विषय भाऊच्या आजूबाजूला पण फिरकले नाहीत. समोर अख्तर असो, ब्रेट ली असो, वॉर्न असो किंवा मुरली असो प्रत्येक बॉलरचा सामना हा गाणं गुणगुणत करणार. आदल्या बॉलवर सिक्स मारलाय म्हणून पुढचा बॉल डिफेन्ड करायचा, असले लाड नाहीत, एकदा हाणायचं ठरवलं की हाणायचं.

सेहवागच्या मैत्रीचे किस्सेही फेमस आहेत. सचिन-सेहवाग, दादा-सेहवाग या जोड्या कितीही घनिष्ट असल्या, तरी आपल्या विरुचा जय एकच तो म्हणजे आशिष नेहरा. सेहवागचा सिनिअर लेव्हलवरचा पहिलाच सामना होता. त्यानं समोरच्या टीममधल्या प्रत्येक बॉलरला चोपला. त्यात सगळ्यात जास्त फटके कुणी खाल्ले असतील, तर आशिष नेहरानं. पुढं याच दोघांची मैत्री लय गाजली. दोघंही दिल्लीचे भिडू, दोघंही मस्तमौला. दिल्लीच्या संघातून सुरू झालेला त्यांचा प्रवास भारतीय संघापर्यंत पोहोचला.

हा प्रवास सुरू झाला तो स्कुटरवर. अहो खरंच. विषय असा होता की, सुरुवातीला सेहवाग बसनं ग्राऊंडवर जायचा. मग त्याला स्कुटर मिळाली. आता आपल्याकडे गाडी आहे म्हटल्यावर सेहवाग एकटा कसा जाईल? सेहवाग रहायचा नजफगढला आणि नेहरा दिल्ली कॅंटोन्मेंटला. सेहवागची स्कुटर सकाळी नेहराच्या घरी यायची आणि मग दोघं गडी ग्राऊंडला जायचे.

सेहवाग पोहोचायचा तेव्हा नेहराजी निवांत घोरत असायचे. मग त्यांचे फादर म्हणायचे, ‘बाबा वीरु, जा त्याला उठव.’ मग, ‘भावा १५ मिनिटांत आवरून येतो’ सांगून नेहरा २५ मिनिटं गायब व्हायचा. एवढ्या वेळात नेहरा आणि सेहवाग दोघांसाठी दुधाचे ग्लास यायचे. नेहराला दूध काय आवडायचं नाही. त्यामुळं आपला ग्लासही तो सेहवागला द्यायचा.

आता दुधाचे दोन ग्लास पिल्यानं, ग्राऊंडवर पोहोचेपर्यंत सेहवागच्या पोटात लिटरभर दूध असायचं. हीच ताकद मग बॉलर्सवर निघायची आणि ग्राऊंडवर टोलेबाजी व्हायची.

यायचा जायचा प्रवास एकत्र करणाऱ्या या दोघांनी एक डील केलं होतं. ग्राऊंडवर जाताना सेहवाग गाडी चालवणार आणि झोप पूर्ण न झालेला नेहरा मधल्या किटबॅगवर डोकं ठेवून झोपणार. येताना नेहरा गाडी चालवणार आणि बॉलर्सला हाणून दमलेला सेहवाग किटबॅगवर डोकं ठेवून झोपणार.

सेहवागला दूध किती आवडायचं याचाही एक किस्सा आहे. त्याचे पालक आपल्या मुलाची प्रगती विचारायला कोच शर्मा सरांकडे गेले. तेव्हा शर्मांनी सेहवागच्या वडिलांना सांगितलं, ‘भैस बांध दो इसके लिए.’ सेहवागचे वडील काय बोलले माहीत नाही, पण त्यांनी डायरेक्ट दारात म्हैस आणून उभी केली. हवं तितकं दूध पिण्याची मुभा सेहवागला मिळाली. त्यानंतर जिथं मॅच असंल, तिथं सेहवाग दुधाची सोय करणार हे फिक्स!

धोनीच्या करिअरच्या सुरुवातीला एक अफवा उठली होती, की हा रोज चार लिटर दूध पितो. त्याच्यावर काय लय लोकांचा विश्वास बसला नाही. सेहवागच्या बाबतीत अशी अफवा उठली असती, तर लोकं म्हणाली असती,

बॉलर्सला एवढं हाणतोय म्हणल्यावर पीत असंल की, सेहवाग कधी काय करणार हे सांगता थोडी येतं!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.