“वडा आणि चिकन सुप” गाजलं अन् राज ठाकरेंनी निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतला

राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित अयोद्धा दौरा रद्द…

सकाळी ही बातमी आली आणि मिडीयातून दिवसभर हाच मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालं. आपल्या तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरेंनी अयोद्धेचा नियोजित दौरा रद्द केल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तरिही राज ठाकरेंनी अचानकपणे आपला निर्णय बदलल्याने ट्रोलिंग देखील सुरू झालं. या ट्रोलिंगमध्ये खुद्द संजय राऊत यांनीही हात धुवून घेतले.

दूसरीकडे चर्चा सुरू झाली ती राज ठाकरेंच्या अचानक निर्णय बदलण्याच्या कृतीची. इतिहासात राज ठाकरेंनी असाच एक निर्णय घेतला होता. त्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अन् अचानकपणे तो बदलला देखील होता..

झालेलं अस की मनसेला जोष देण्यासाठी राज ठाकरेंनी स्वत: विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अचानकपणे हा निर्णय बदलण्यात आला. मात्र अचानक बदललेल्या या निर्णयामागे अनेक कारणं होती त्यातलचं एक होत प्रसिद्ध झालेल्या,

तेलकट वडे व चिकण सुपच..

त्याचं उत्तर २०१४ च्या घटनेत आहे. एप्रिल- मे महिन्याच्या दरम्यानची लोकसभा निवडणुकीचं वारं होतं. प्रचार सभांची लाट आलेली. जो तो राजकीय नेता भव्य-दिव्य राजकीय सभा घेत होता. आता याच दरम्यान देशात मोदी लाट होती.

महाराष्ट्रात मात्र एक वेगळीच लाट आलेली. राज – उद्धव ठाकरेंच्या शब्दयुद्धाची !

प्रचारसभांमध्ये ठाकरे घरातल्या कौटुंबिक कलहाबद्दल थेट राजकीय स्टेजवर बोलल्या जाऊ लागलं. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा नक्कीच दुखावला असावा.

याच दरम्यान एप्रिल २०१४ मध्ये डोंबिवलीच्या एका सभेत राज ठाकरे असं काहीतरी बोलून गेले ज्याचा पश्चाताप त्यांना आजही होत असावा. कारण या भाषणाचा परिणाम म्हणजे राज ठाकरेंनी निवडणूक लढवली नाही. 

तर मेन मुद्द्यावर येऊया..

असं काय म्हणाले होते राज ठाकरे ?

याला पार्श्वभूमी म्हणजे, राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप उद्धव ठाकऱ्यांनी राज ठाकरेंवर केला होता. त्याच आरोपांवर राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या सभेत जाहीर उत्तर दिले होते.

या सभेत केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले होते.

“बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत मी माझ्या घरून त्यांच्यासाठी चिकन सूप पाठवत असे. त्या काळात कधीही बाळासाहेबांनी असं व्यक्त केलं नाही की, मी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांची (उद्धव ठाकरेंची) भावना आहे. बाळासाहेब जेंव्हा लीलावती रुग्णालयात दाखल होते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना तेलकट बटाटेवडे खायला द्यायचे, जे आपल्या काकांच्या तब्येतीसाठी घातक ठरले होते”.

मात्र राजसाहेबांचं हे विधान मराठी माणसांना फारसं रुचलं नाही. आपल्या काकांच्या नावाचा गैरवापर करून ते राजकीय फायदा उपटू पाहताहेत, असं काहींचं मत बनलं.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली.  कार्यकर्त्यांमध्ये वातावरण इतके तापले होते की घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना लाठीमार करावा लागला. लाठीमारात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने ठाकरे घराण्याचे हे शब्दयुद्ध सुरू झाले होते. घरातली भांडणं जगाला सांगण्याचा तो प्रकार होता.

गेलेल्या माणसासाठी आपण काय काय केलं, याचं कुणी भांडवल करत नाही आणि बाळासाहेब गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा अनपेक्षित परिणाम झाला. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेची दणदणीत हार झाली.

असं असलं तरी, आपल्या पक्षाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी राज ठाकरेंनी जाहीर केले,

“मनसे विधानसभा निवडणूक लढवणार!” 

मनसेने भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकऱ्यांचे नावच जाहीर केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे कुटुंबापैकी कोणाचे तरी नाव पहिल्यांदाच उच्चारले जात होते. यामुळे तरी पक्षात उत्साह संचारेल आणि लोकांचाही पाठिंबा वाढेल, असे त्यामागे गणित असेल, असं म्हंटलं जातं.

माहीममधून विधानसभा निवडणूक लढवावी, असा राज ठाकरे यांचा विचार होता. मात्र मनसेच्या तेथील प्रभावाला ओहोटी लागल्याचे त्यांच्या ध्यानात आले. 

याबाबत मनसेचे नेते वागीश सारस्वत याबाबत सांगतात, “वडा आणि चिकन सूपबद्दलच्या विधानांमुळे महाराष्ट्रीय माणसं राज ठाकरेंवर चांगलीच नाराज होती. मी मनसेचा माणूस आहे, हे उघड न करता मी दादरमध्ये फिरलो आणि अनेकांशी बोललो. आपण बाळासाहेबांसाठी किती केलं, याचं राज ठाकरेंनी प्रदर्शन मांडलंय असं वाटून लोकं राज ठाकरेंवर संतापले होते”.

वडा आणि चिकन सूप यांबद्दलच्या विधानांनी पक्षाची हानी झाली. स्वतः विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय राजसाहेबांनी मागे घेतला, अन त्याचाही पक्षाला फटका बसला. 

मागच्या २००९ च्या निवडणुकीला जिंकलेल्या १३ जागी मनसे पराभूत झाली होती. यात मनसेला फक्त १ च जागा जिंकता आली. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधून शरद सोनवणे जिकून आले होते. ज्यांनी २०१९ ला शिवसेनेत प्रवेश केला.

पूर्वी मनसेने जिंकलेल्या शिवडी, विक्रोळी, भांडुप, कल्याण ग्रामीण, मागाठाणे या सगळ्या जागा २०१४ मध्ये शिवसेनेने जिंकल्या होत्या जयंत माहीम च देखील समावेश होता.

…..जिथून राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार होते !

मनसेचे एक ज्येष्ठ नेते सांगतात कि,

खरं तर आमच्या सर्वेक्षणानुसार राजसाहेबांनी माहीममधून निवडणूक लढवली असती, तरी ते घरबसल्या आरामात निवडून आले असते. पण काही नेत्यांनी सुचवलं की, एकाच मतदारसंघात स्वतःला बंदिस्त करण्यापेक्षा राजसाहेबांनी राज्यभरच्या प्रचाराची धुरा सांभाळणं अधिक महत्त्वाचं. आमचा सगळ्यात प्रभावी ‘स्टार’ प्रचारक एकाच मतदारसंघात अडकून पडणं पक्षालाही परवडणारं नव्हतं.”

वागीश सारस्वतांनी मनसेच्या राजकारणातील आणखी एक लंगडी बाजू निदर्शनाला आणली होती,

“बाळा नांदगावकरांसारखे काही अपवाद सोडले, तर मनसेच्या कुठल्याच नेत्याला प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव नव्हता.”

या सगळ्या गोंधळात राज ठाकरेंनी निवडणूक लढवायचं मागे पडलं अन त्याचा फटका मनसेला बसला होता. त्यात भरीस भर म्हणजे,

राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे मराठी तरुण मनसेत होते. मात्र त्या आधी २०१० साली आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ‘युवा सेना’ स्थापन केली होती. मनसेकडे असलेला तरुणाईचा आधार आपल्याकडे खेचणे हा युवा सेनेचा उद्देश होता. मनसेची आधीच सुरु झालेली घसरण आणखीनच वाढली. 

मनसेच्या अनपेक्षित पीछेहाट झाल्याची कारणीमीमांसा करायची झाली तर चिकन सूप व वडे हे स्टेटमेंट नक्कीच ग्राह्य धरावं लागेल. 

संदर्भ: ठाकरे विरुद्ध ठाकरे, धवल कुलकर्णी

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.