कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणजे, निवडणूकीआधीच कॉंग्रेसचा गेम झालाय?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सद्या राज्यसभा निवडणुकीची लगबग चालू आहे. प्रत्येक पक्षांनी आप-आपले उमेदवार जाहीर केले. मात्र यात काँग्रेसने जाहीर केलेली त्यांच्या १० उमेदवारांची लिस्ट बघून कॉंग्रेसमधलेही आणि कॉंग्रेसबाहेरचेही सगळेच नेते कोड्यात पडले. कारण पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे या यादीत नाहीच आहे.

इतकंच नाही तर या १० नावांच्या यादीत ७ नावं अशी आहेत, त्यांना दिलेली उमेदवारी म्हणजे पुरता गंडलेला कार्यक्रम आहे. 

म्हणजेच नेते एका राज्याचे आहेत आणि त्यांना तिकीट वेगळ्या राज्यातून दिलं गेलंय आणि त्यामुळे काँग्रेसच्या गोटात धुसपूस सुरु झाली.

थेट मुद्द्यावर येऊया. 

काँग्रेसने जाहीर केलेला राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीतील १० नावांपैकी ७ नावं अशी आहेत ज्यांचा कसलाही संबंध नसलेल्या राज्यातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुरुवात आधी महाराष्ट्रापासून करूया.. 

राज्यातील काँग्रेसच्या कोट्यातली जी जागा आहे ती खरं तर महाराष्ट्रातल्या नेत्याला दिली पाहिजे होती अशी अपेक्षा होती. पण ती दिली गेली उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगढी यांना. 

३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी हे अवघ्या तीन वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसच्या जाहीर उमेदवारांपैकी ते सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी प्रियांका गांधींची सासुरवाडी म्हणजेच युपीच्या मुरादाबादमधून लोकसभा निवडणुक लढवली होती मात्र ते हरले. २०२१ मध्ये पक्षाने त्यांना काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली. 

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत देखील प्रतापगढी हे काँग्रेससाठी स्टार प्रचारक होते. आणि आता त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे.

इतक्या लवकर पक्ष त्यांना संधी देतोय यामुळेही ज्येष्ठ नेत्यांची नाराजी आहे आणि इतर नेते राज्यसभा तिकिटाच्या रांगेत असतांना इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवत असल्यामुळे देखील नाराजी आहे.  

महाराष्ट्रातल्या एकमेव जागेवर काँग्रेसला महाराष्ट्रातला एकही नेता या जागेसाठी पात्र वाटला नसावा का? असा प्रश्न समोर येतोय… 

यात मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, संजय निरुपम हे नेते महाराष्ट्रातून इच्छुक होते. त्यांचं नाव का घेतलं नसावं? 

आता इम्रान प्रतापगढी हेच महाराष्ट्रातून का ? तर ते राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत अशी चर्चाय.. असो.

छत्तीसगडचं बघू…

पप्पू यादव यांच्या पत्नी रंजित रंजन यांना छत्तीसगडमधून राज्यसभेची सीट देण्यात आलीये ज्या बिहारच्या नेत्या आहेत. राजीव शुक्ला यांनाही छत्तीसगडमधून राज्यसभेची सीट दिली गेली जे उत्तर प्रदेशचे नेते आहेत. 

राजस्थानचे प्रकरण आणखीनच इंरेस्टिंग आहे. 

रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे तीनही उमेदवार ‘बाहेरच्या राज्यातले’ आहेत. त्यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

यातले रणदीप सुरजेवाला हे हरियाणाचे, मुकुल वासनिक हे महाराष्ट्राचे तर प्रमोद तिवारी हे यूपीचे आहेत आणि या नेत्यांना राजस्थानमधून राज्यसभेची सीट देण्यात आली आहे. 

हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीयेत त्यामुळे राजस्थानमधील सिरोही येथील काँग्रेसचे आमदार संयम लोढा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, राजस्थानच्या कोणत्याही काँग्रेस नेत्याला किंव्हा कार्यकर्त्याला राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार न करण्याचे कारण काय?’ याचं स्पष्टीकरण पक्षाला द्यावंच लागेल अशी ठाम भूमिका राज्यातील नेत्यांनी घेतलीये.  

हरियाणात काय घडलं ???

तर रणदीप सुरजेवाला यांच्या हरियाणातली राज्यसभेची सीट दिल्लीतल्या अजय माकन यांना देण्यात आली आहे. 

आता सुरजेवाला यांना हरियाणातून राज्यसभेची सीट न देण्यामागे भूपिंदरसिंग हुड्डा आणि सुरजेवाला यांचं भांडण असल्याचं सांगण्यात येतंय. म्हणजेच एकीकडे भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या मनासारखं करून एकाअर्थी सोनिया गांधी आणि राहुल गांधी किती कमकुवत झाले आहेत अशी चर्चा होतेय. तेच दुसरीकडे हरियाणातली जागा दिल्लीच्या नेत्याला दिल्यामुळे हरियाणातील काँग्रेस नेते नाराज आहेत

नेते एका राज्यातले अन खासदारकी दुसऱ्या राज्यातून अशा प्रकरणात अपवाद ठरलेत जयराम रमेश, विवेक तनखा आणि चिदंबरम.

जयराम रमेश यांना त्यांच्याच कर्नाटक राज्यातून राज्यसभेची जागा मिळणारे, दुसरे विवेक तनखा यांना देखील त्यांच्याच मध्यप्रदेशमधून राज्यसभेची जागा मिळतेय आणि तिसरे चिदंबरम. चिदंबरम हे अगोदर महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले होते. मात्र यावेळेस ते स्वत:च्या मूळ राज्यातून म्हणजेच तामिळनाडूतून राज्यसभेवर जाणार आहेत.

राज्यसभेच्या उमेदवारीचा जो क्रॉस कनेक्शन गोंधळ काँग्रेसने करून ठेवलाय त्याचा परिणाम असा होणार आहे तो म्हणजे यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांची भली मोठी यादी तयार होतेय आणि त्यात रोज एका-एका नेत्याची भर पडतेय.

त्यात आशिष देशमुख, मिलिंद देवरा, संजय निरुपम, गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शीद, पवन खेरा, नगमा अशी अनेक नेते या लिस्टमध्ये आहेत. 

यातले राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा हे काँग्रेसच्या उत्तम प्रवक्त्यांपैकी एक आहेत आणि मीडियावरील चर्चेत भाजप नेत्यांविरुद्ध ते कायमच आक्रमक भूमिका घेत असतात. नॅशनल मीडियासमोर सतत आपल्या पक्षाला डिफेन्ड करणं सोपं काम नाहीये.

मूळचे राजस्थानचे असलेले पवन खेरा हे काँग्रेसचे राज्यसभेचे दावेदार होते. मात्र त्यांचंही नाव या यादीत नाही.

उमेदवारांची लिस्ट जाहीर झाल्यानंतर पावन खेर यांनी एक ट्विट केलं…‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’ या ट्विटमधून त्यांची नाराजी स्पष्ट होतेय.. 

 

जर पावन खेर यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली असती तर त्यांच्यासारख्या प्रवक्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असता. 

मात्र इम्रान प्रतापगढ़ी यांच्यासारख्या नवख्या नेत्याला उमेदवारी देऊन खेरा यांच्यासारख्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करणं काँग्रेसला कदापि परवडणारं नाहीये.  पवन खेरा हे राजस्थानचे आहेत, त्यात राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यात आगामी काळात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत

महाराष्ट्रातलं वातावरण मात्र आणखी तणावग्रस्त आहे.  

थोडक्यात प्रदेश काँग्रेसमधून देखील पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतांना, इथे एक स्थानिक खासदार देऊन पक्षाला ताकद द्यायला हवी होती मात्र बाहेरची व्यक्ती आणल्यामुळे नुकसान होईल, त्यापेक्षा  मुकुल वासनिक यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्रातून उमेदवारी द्यावी अशी राज्यातून मागणी होतेय त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर आहेत.

पण दूसऱ्या राज्यातून राज्यसभेवर पाठवण्याची कॉंग्रेसची ही खेळी पहिल्यांदाच घडलेय का?

याचं उत्तर ‘नाही’असं आहे.. 

डॉ.मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, राजीव शुक्ला असे नेते स्वत:च्या राज्यातून राज्यसभेवर न जाता इतर राज्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत. मात्र आत्ता टिका होतेय त्याचं कारण म्हणजे…टायमिंग !!!

कारण यापूर्वी वेगवेगळ्या राज्यातून राज्यसभेला नेते पाठवले जात तेव्हा कॉंग्रेस अस्तित्वाची लढाई लढत नव्हता. 

आज मात्र कॉंग्रेसपुढे अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातून नवनेतृत्व उभा करणं व त्याला त्याच्याच राज्यातून ताकद देण्याचं काम कॉंग्रेस नेतृत्वाला करावं लागणार आहे. अस असताना इतर राज्यातून उमेदवारी देणं, मासलिडर नेत्यांएवजी पुन्हा दरबारी नेत्यांना चान्स देणं या गोष्टी कॉंग्रेसला अजूनच पाठीमागे घेवून जाणाऱ्या ठरू शकतात.. 

पक्षाकडे अस्तित्व टिकवण्याचं संकट असतांना ही निवडणूक काँग्रेससाठी एक संधी होती. मात्र ती संधीही काँग्रेसने गमावली असं चित्र निर्माण झालं. हा सगळा विषय आणि पक्षांतर्गत वाद काय वळण घेईल यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.