एक घाव पाच तुकडे…पण कसे तर ते असे….
संजय राऊत ४१, प्रफुल्ल पटेल ४३, इम्रान प्रतापगढी ४४, पियुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८ आणि धनंजय महाडिक ४१.५ .
संजय राऊत यांच्यापेक्षा दूसऱ्या फेरीत ०.५ मतांची आघाडी घेवून भाजपने सहाव्या जागेचा उमेदवार निवडून आणला. या विजयावर प्रतिक्रीया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती”.
अन् देवेंद्र फडणवीस यांनी ते करुन दाखवलं. या निवडणूकीत पियुष गोयल यांना ४८ आणि अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली. तर भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत काही माध्यमांच्या मते २६ किंवा तर काहींच्या मते २७ मते मिळाली, त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पहिल्या फेरीत एकूण १२२-१२३ मतं मिळाली.
भाजपचे आमदार आहेत १०६ आणि भाजपला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या आहे ६ याचाच अर्थ भाजपला महाविकास आघाडीची ९ ते १० मते फोडता आली.
शिवसेनेचे एक मत रद्द झाले नसते सोबतच अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करता आले असते तरिही धनंजय महाडिक यांचा विजय झाला असता अशी फिल्डिंगच देवेंद्र फडणवीस यांनी लावली होती.
पण ही फिल्डिंग फक्त या निवडणूकीपुरती होती का ? तर नाही….राज्यसभेच्या या विजयाचे ५ अर्थ काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत..
१. महाविकास आघाडीचा वाद चव्हाट्यावर आणण्यात भाजपला यश
३१ जुलै २०२० रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीबाबत भाष्य करताना म्हणाले होते की, “महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे आपल्याला दाखवले जात आहे. मात्र, खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. काँग्रेसने असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार…”.
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर भाजपचे नेते महाविकास आघाडी ही अंतर्विरोधानेच पडेल अशी टिका करत आलेले आहेत. मात्र देगलूर, पंढरपूर व कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने समन्वयाने निवडणूक लढवली. राज्यसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत असणारा हाच अंतर्विरोध पुढे आणणे व तिन्ही पक्षात झुंज लावणे हेच भाजपचे मुख्य टार्गेट होते.
ठरल्याप्रमाणे सहाव्या जागेसाठी उमेदवारी देवून भाजपने आपला उमेदवार जिंकवून आणलाच, सोबत महाविकास आघाडीच्या १० मतांना देखील खिंडार पाडलं. अर्थात ही मते कॉंग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीला पाठींबा देणाऱ्या अपक्षांची असतील पण यामुळे महाविकास आघाडीतली अंतर्गत धुसफूस वाढवण्यात व ती चव्हाट्यावर आणण्यात भाजपला यश मिळालं आहे..
२) ऑपरेशन लोटसची सुरवात.
भाजपने अतिरिक्त उमेदवार देवून निवडणूक लादली त्यामागचं मुख्य कारणच ऑपरेशन लोटसची चाचपणी असल्याचं सांगण्यात येतं. पहाटेच्या शपथविधीनंतर प्रत्येक गोष्ट अंदाज घेवूनच करण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा रोख राहिलेला आहे.
ऑपरेशन लोटससाठी अचानक अविश्वास ठराव आणलाच तर पुन्हा धोका होवू शकतो. हे हेरूनच राज्यसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने किती फुटतात? कोण फुटतात? याचा अंदाज भाजप घेणार होतं.
जवळपास १० मतं फोडून भाजपने आपला डाव योग्य रितीने टाकला. सहाव्या जागेवर भाजपचा झालेला विजय म्हणजे आमदार फुटू शकतात, अपक्ष ओढता येवू शकतात हा अंदाज भाजपला योग्य रितीने बांधता आलेला आहे.
त्यामुळेच आत्ता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच ऑपरेशन लोटस राबवण्यासाठी केंद्रातून हिरवा कंदील मिळू शकतो..
३) २०२४ चा लोकसभा निवडणूकीसाठी मोदींचा मार्ग सुकर.
२०२४ साली लोकसभेच्या निवडणूका आहेत. अगदी ग्रामपंचायतच्या निवडणूकांपासून ते प्रत्येक राज्याच्या निवडणूकांमध्ये भाजपला मोदींच्या नावाचा फायदा होत असतो. त्यामुळे मोदींचा सत्तेचा मार्ग सोप्पा करणं हे प्राथमिक धोरणं भाजपच राहिलेलं आहे. अशा वेळी २०२४ मध्ये महाराष्ट्रासारखे मोठ्ठे राज्य महाविकास आघाडीच्या सत्तेखाली असणं व महाविकास आघाडीच्या अधिपत्याखालील राज्यात लोकसभा निवडणूक पार पाडणं भाजपसाठी कष्टाचं ठरणार आहे.
यामुळेच कोणत्याही स्वरूपात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात हवी आहे. भाजपचे सध्या महाराष्ट्रातून २३ लोकसभा खासदार आहेत. तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूका लढल्या तर निश्चितच लोकसभेच्या निवडणूकीत फटका बसू शकतो. आजच्या विजयामुळे भाजपला राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी सत्ता स्थापन करता येवू शकते हा कॉन्फिडन्स निश्चितच आलेला आहे.
त्यामुळेच येत्या काही काळात साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप राज्यात सत्तास्थापनेचा खेळ खेळेल अस बोललं जात आहे.
४) सुडबुद्धीच्या राजकारणाचा फॉर्म्युला सक्सेसफुल.
राज्यसभेच्या निवडणूकीत महत्वाची मदार होती ती अपक्ष व छोट्या मोठ्या पक्षांच्या आमदारांवर. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत आणि खुद्द मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंचे मेव्हणे अशा लोकांवर ईडी मार्फत कारवाई झाली. पैकी अनिल देशमुख व नवाब मलिक असे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आत आहेत.
राज्यात भाजपतर्फे सुडबुद्धीच राजकारण सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. अशा वेळी नाही म्हणायला सर्वच पक्षाच्या आमदार व नेत्यांमध्ये असुरक्षिततेच वातावरण आहे. अशा वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे बडे नेते देखील भाजप विरोधात थेट मैदानात येत नाहीत अस चित्र दिसून येत, असं असेल तर अपक्ष व लहान पक्षांकडून महाविकास आघाडी काय अपेक्षा ठेवणार.
नेमकं हेच चित्र आजच्या निकालात दिसलं. लहान पक्ष व अपक्ष आमदार काहिही करुन भाजपला थेट अंगावर घेण्यास तयार नाहीत. हेच फुटलेल्या मतांमधून दिसून येतं. विरोधी पक्षावर आरोप-प्रत्यारोपांच राजकारण येत्या काळात अधिक वेगाने होईल हेच या निवडणूकीतून दिसून आलं..
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे,
५) राष्ट्रीय राजकारणातलं शरद पवारांच महत्व कमी करणं.
महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे देशाच्या राजकारणात शरद पवारांची इमेज एक उत्तम समन्वय साधणारा नेता अशी झाली आहे. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या शिवसेनेला कॉंग्रेससोबत घेवून जाण्याचं काम शरद पवारांच्या नेतृत्वात झालं राज्यात झालेलं आहे. अशा वेळी देशभर मोदी विरोधी गटांची मोट बांधू शकणारे नेते म्हणून मोदी विरोधक शरद पवारांकडे पहात असतात.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकांसाठी देशपातळीवर तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करू शकणारा नेता म्हणून शरद पवारांच नाव चर्चेत येतं. अशा वेळी पवारांची असणारी चाणक्य ही इमेज निवडणूकांच्या राजकारणातून डॅमेज करण्याचा प्लॅन भाजपमार्फत यशस्वीपणे आखण्यात आला. या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली होती.
शरद पवारांच्या विरोधात फडणवीसांना मोठ्ठ करणं व पवारांची इमेज तोडण्यात भाजपला यश आलं आहे, असच निवडणूकीचा निकाल सांगतो..
थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती…
त्यांचे हे जिंकणं फक्त चौथ्या जागेवरचा उमेदवार जिंकवून आणण्याहून अधिक होतं हेच राज्यसभेच्या निवडणूकीतून दिसून येतं.
हे ही वाच भिडू :
- गेहलोत यांना उगाच जादूगार म्हणत नाय, डाव पलटवणं त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे…
- नुपूर शर्मा प्रकरणावरून देशभरातला मुस्लीम समाज ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरला आहे
- प्रचारात हिंदूत्वाचा मुद्दा आणला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला होता..