वाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत मग कोण होते, भाजपचे पहिले दोन खासदार ?

लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता भारतीय जनता पक्ष हा आजघडीला देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या संख्येनुसार भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात येतो. मात्र भाजपचा इथपर्यंत हा प्रवास मोठा रंजक राहिलेला आहे.

१९८० साली स्थापन करण्यात आलेल्या भाजपला आपलं लोकसभा सदस्यत्वाचं खातं उघडण्यासाठी १९८४ पर्यंत वाट बघावी लागली होती.

१९८४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त २ जागाच जिंकता आल्या होत्या.

या २ खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा राजकीय प्रवासात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत  २८२ जागा मिळवून स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याइतपत मजल भाजपने मारली.

आज ‘माहितीच्या अधिकारात’ जाणून घेऊयात कोण होते हे भाजपचे १९८४ साली सर्वप्रथम निवडून असलेले २ खासदार.

माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात १९८४ सालची लोकसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठाच फायदा झाला होता आणि न भूतो न भविष्यती आशा लोकसभेच्या ४२६ जागांवर विजय मिळवत राजीव गांधी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

या सहानुभूतीच्या लाटेत देखील भाजपकडून निवडून आलेले २ खासदार म्हणजे गुजरातमधील डॉ. ए.के. पटेल आणि आंध्र प्रदेशातील चंदूपाटला जंगा रेड्डी हे होत.

डॉ. ए.के. पटेल.

गुजरातमधील मेहसाना मतदारसंघातून डॉ. ए.के. पटेल हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या रायांका सागरभाई कल्याणभाई यांचा ४३ हजार ८९६ मतांनी पराभव केला होता.

१९८४ साली निवडून आल्यानंतर लोकसभेच्या पुढच्या ४ निवडणुकांमध्ये ए.के. पटेल यांनी या जागेवरून सलगपणे विजय मिळवला आणि १९९९ पर्यंत ते लोकसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधी राहिले.

१९९८ साली त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलं. २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्य राहिले.

व्यवसायाने डॉक्टर असलेले पटेल हे १९७५ ते १९८४ या काळात गुजरात विधानसभेचे सदस्य देखील होते.

चंदूपटला जंगा रेड्डी. 

आंध्रप्रदेश मधील हनामकोंडा लोकसभा मतदासंघातून आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि पुढे चालून देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या काँगेसच्या पी.व्ही. नरसिंह राव यांचा ५४ हजार १९८ मतांनी दणदणीत पराभव करत चंदूपटला जंगा रेड्डी यांनी या जागेवर भगवा फडकविण्याची किमया घडवून आणली होती.

त्यापूर्वी ते ३ वेळा आंध्रप्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.