त्यानं खून फक्त दोनच केले, पण खरा टेरर पसरवला तो मृतदेहांपासून दागिने तयार करुन

एखाद-दोन वर्षांपूर्वीची गोष्टय, मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पाच रुपयाच्या मास्कपासून पाचशे रुपयाच्या मास्कपर्यंत आपण लय दुनियादारी केली. आजकाल फारसं कुणी मास्क वापरत नाय, पण त्यातल्या व्हरायटीनं कित्येक महिने गाजवले.

आम्हाला आज अशी अचानक मास्कची आठवण आली, ते एका स्टोरीमुळं. काय स्टोरी? कुठली स्टोरी? सगळं सांगतो. आधी जरा बॅकग्राऊंड बघुयात, कारण बॅकग्राउंड डेंजर आहे.

गोष्ट सुरू होते अमेरिकेत. एड गीन नावाचा एक पोरगा आपल्या कुटुंबासोबत राहायचा. त्याची आई लईच डेंजर होती, तिनं त्याला कुणाशी मैत्री करण्याला नकार दिलेला. पोरगं दिवसभर एकटंच राहायचं, शाळेत गेल्यावर स्वतःशीच बडबड करुन हसायचं. लोकांना वाटायचं की हे हाताबाहेर गेलंय.

पण एडचं आयुष्य निवांत सुरू होतं, वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यानं आपल्या भावासोबत गावात छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली, त्याचं मोठं शेत होतं त्यामुळं तिथं काम करण्यातही वेळ जायचाच. एक दिवस आपल्या भावासोबत शेतात काम करताना आग लागली.

अग्निशामनवाले आले आणि त्यांनी आग विझवलीही. काही वेळानं एडचा भाऊ गायब झाल्याचं लक्षात आलं, शोधाशोध झाली आणि त्याचा डायरेक्ट मृतदेहच सापडला.

अंगावर भाजल्याची खूण नव्हती, त्यामुळं गुदमरल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्याच्या डोक्यावर मार लागल्याच्या जखमा होत्या, पण पोलिसांनी हत्येच्या दृष्टीनं तपास केला नाही.

पुढं एड पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू लागला, आईला पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर तिची सेवा करू लागला. मात्र १९४५ ला त्याची आई वारली आणि एड पडला एकटा.

ही बॅकग्राऊंड वाचल्यावर, तुम्हाला एड बद्दल जराशी सहानुभूती निर्माण झाली असेल, तर थांबा आता कुठं स्टोरी सुरू झालीये.

आई गेल्यावर एड छोटीमोठी कामं करु लागला, त्यानं भावाच्या नावावर असलेलं शेतही विकलं. पण एक दिवस अचानक पोलिसांनी त्याला उचललं. आजूबाजूच्या लोकांना आधी भनक लागली नाही, मात्र नंतर समजलं की त्यानं एका महिलेचा मर्डर केलाय.

आपल्याच गावातल्या हार्डवेअर स्टोअरच्या मालकिणीला एडनं मारलं होतं. पोलिसांनी तपास केला तेव्हा या दुकानात गेलेला शेवटचा माणूस एड गीन होता हे समजलं. पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं.

त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली आणि पोलिस गार पडले.

एडच्या घरात एका मुलीचा मृतदेह टांगण्यात आला होता. पण ती हार्डवेअरच्या दुकानातली महिला नव्हती, तर भलतंच कुणीतरी होतं. या मुलीला मारुन तिची स्किन काढण्यात आली होती. धड वेगळं करुन डोकं एका बॉक्समध्ये ठेवलं होतं. हार्डवेअरच्या दुकानातून गायब झालेल्या महिलेचीही हीच गत होती. हे दोन खून एड गीननं केले होते.

त्यानं कित्येक मृतदेह छिन्नविछिन्न केले होते. त्यांची त्वचा आणि हाडं अगदी शिताफीनं वेगळी केली होती. यापासून दागिने आणि खुर्च्यांना कव्हर बनवले आणि इतकंच नाही तर ट्रॉफ्याही बनवल्या.

जर एडनं फक्त दोनच महिलांना मारलं, तर बाकीचे मृतदेह आले कुठून ?

एड जवळपास पाच वर्ष स्मशानभूमीला भेट द्यायचा आणि तिथून गाडलेले मृतदेह उकरायचा आणि त्यांच्यावर हे अघोरी प्रकार करायचा. त्याला त्यांच्या स्किनपासून एक मानवी देह तयार करायचा होता, ज्याने करुन त्याला त्याच्या आईची आठवण होईल.

चेहरा बनवण्यासाठी त्यानं एका मुलीच्या चमडीपासून मास्क बनवलेलं, आपलं मास्क कुठं आणि त्याच्या मास्कची व्याख्या बघा.  

इतके विचित्र आणि गंभीर प्रकार केल्यानंतर एडला फाशीची शिक्षा झाली असेल, असा अंदाज आपण लावतो, मात्र तसं काही घडलं नाही.

पोलिसांनी त्याला कोर्टात सादर केलं तेव्हा न्यायालयानं एकाच खुनाच्या केसवरुन त्याच्यावर खटला चालवण्याचं ठरवलं. मात्र हा खटलाही चालला नाही, याचं कारण होतं एडची मानसिक स्थिती. कोर्टानं त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं खटला चालवायला नकार दिला आणि त्याची रवानगी झाली मेंटल हॉस्पिटलमध्ये.

तिथंच कोणत्याही शिक्षेशिवाय एड गीनचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूनंतरही विचित्र घटना घडल्या, त्याच्या घराला आग लागली, गाडीचा लिलाव झाला. जिथं एडला दफन करण्यात आलं होतं, तिथं त्याच्या नावाचा दगड बसवण्यात आला होता… हा दगड चोरांनी गायब केला.

पुढं एडच्या आयुष्यावरुन हॉलिवूडमध्ये अनेक पिक्चर आले, ‘The Texas Chain Saw Massacre’ हा पिक्चर तर विशेष गाजला. पण त्याचं घर आणि त्यातला टेरर लोकांच्या मनावर कायम राहिला.. तो राहिलाच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.