भारतीय क्रिकेटमधला सर्वोत्तम ऑल-राउंडर विनू मांकड

विनू मांकड.

भारतीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम ऑल-राउंडर पैकी एक नाव. विनू मांकड यांचं नाव सर्वाधिक चर्चिलं जातं ते १९५६ साली त्यांनी पंकज रॉयसह खेळताना उभारलेल्या ४१३ रन्सच्या ओपनिंग पार्टनरशिपसाठी.

१९५६ साली चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी २३१ रन्सची इनिंग साकारली होती. पंकज रॉयसह उभारलेल्या ४१३ रन्सची पार्टनरशिप त्यावेळी ओपनिंगसाठीची विश्वविक्रमी पार्टनरशिप ठरली होती.

२००८ सालापर्यंत म्हणजे पुढची ५२ वर्षे हा विश्वविक्रम मांकड-रॉय जोडीच्याच नावावर होता. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथ आणि मॅकंझी यांनी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ४१५ रन्सची पार्टनरशिप साकारताना ‘मांकड-रॉय’ जोडीचा विश्वविक्रम मोडला.

मांकड यांचा १९४८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक किस्सा खूप फेमस. या दौऱ्यात मांकड यांना ऑस्ट्रेलियाच्या रे लिंडवॉल याचा सामना करायला जमत नव्हतं. सिरीजच्या पहिल्या दोन टेस्टमधल्या ४ डावांमध्ये लिंडवॉलने मांकड यांना आउट केलं होतं. या ४ इनिंगमध्ये मिळून मांकड यांना ०,७,७,५ असे फक्त १९ रन्स काढता आले होते.

तिसऱ्या कसोटीपूर्वी एक  पार्टी ठेवण्यात आली होती होती. तेव्हा मांकड लिंडवॉलकडे गेले आणि त्याचा पेग भरून देताना त्यांनी लिंडवॉलला विचारलं,

“प्रत्येक वेळी मला तूच कस काय आउट करतोयेस..?”

लिंडवॉल थोडासा हसला आणि म्हणाला,

“तुझा बॅट फ्लो स्लो आहे. तुझ्या बॅटला माझ्या यॉर्करखाली यायला लेट होते ”

मांकड यांच्यासाठी ही शिकवण पुरेशी होती. बॅटिंगमध्ये आपण नेमकी कुठे आणि काय सुधारणा करायला पाहिजे, हे त्यांना कळून चुकलं होतं.

सिरीजच्या तिसऱ्या आणि चौथ्या या दोन्ही कसोटीत मांकड यांनी शतक ठोकताना अनुक्रमे १११ आणि ११६ रन्सची इनिंग खेळली. या इनिंगदरम्यान जेव्हा कधी ते लिंडवॉलला चौकार ठोकायचे त्यावेळी ते त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारायचे,

“आता माझी बॅट यॉर्करखाली यायला लेट तर होत नाहीये ना..?”

या सिरीजच्या ठीक वर्षभरापूर्वीचा एक किस्सा देखील असाच रंजक. याच किस्स्यामुळे बॉलरने ‘नॉन स्ट्रायकिंग एंड’वरील बॅट्समनला रन आउट करण्याच्या पद्धतीला त्याचं नाव मिळालं. ही पद्धत म्हणजे ‘मान्कडिंग’.

१९४७ साली सगळ्यात पहिल्यांदा एका फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सामन्यात मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्याच बिल ब्राऊन याला आधीच क्रीझ सोडल्यामुळे ‘नॉन स्ट्रायकिंग एंड’वर रन आउट केलं होतं. रन आउट करण्यापूर्वी मांकड यांनी ब्राऊनला ४ वेळा वार्निंग दिली होती. पण जेव्हा ब्राऊन ऐकतच नाही हे लक्षात आलं, त्यावेळी मांकड यांनी त्याला आउट केलं. पुन्हा सिडनी टेस्टमध्ये देखील मांकड यांनी ब्राऊनला याच पद्धतीने आउट केलं. यावेळी मात्र त्यांनी कसलीच वार्निंग दिली नव्हती.

तेव्हाचपासून ‘नॉन स्ट्रायकिंग एंड’वरील बॅट्समन अशा पद्धतीने रन आउट झाला, तर त्याला ‘मान्कडिंग’ म्हणायची पद्धत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरु झाली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.