क्रिकेटमधील पहिली त्रिशतकी पार्टनरशिप करणारा बॅट्समन, ज्याच्या विक्रमांची यादी संपतच नाही !

सर जॉन बेरी हॉब्ज.

क्रिकेट रसिकांना ‘जॅक हॉब्ज’ या नावाने परिचित असणाऱ्या या माणसाने क्रिकेटच्या इतिहासात एक महान खेळाडू म्हणून आपलं नाव कोरून ठेवलंय. ‘सरे’ आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना धावांचा शब्दशः पाऊस  पाडल्यामुळेच फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सर्वाधिक रन्स, सर्वाधिक शतके असे कितीतरी विश्वविक्रम अद्यापपर्यंत त्यांच्याच नावावर जमा आहेत.

१६ डिसेंबर १८८२ रोजी एका अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या हॉब्जने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरु केलं होतं. स्थानिक पातळीवरील त्याची कामगिरी बघून १९०३ साली सरेने त्याला आपल्या संघात घेतलं आणि तिथून जे काही क्रिकेटच्या मैदानात रन्सचा पाऊस पडायला सुरु झाला तो अगदी हॉब्ज निवृत्त होईपर्यंत.

हॉब्ज निवृत्त झाला त्यावेळी त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमधले ६१ हजार ७६० रन्स जमा होते आणि सोबतच १९९ शतकं. शतकांचं द्विशतक फक्त एका शतकाने हुकलं होतं. १९९ शतकांसह २७३ फिफ्टीज देखील त्यांच्या नावावर जमा आहेत. वयाच्या चाळीस वर्षानंतर काढलेले सर्वाधिक रन्स, सर्वाधिक शतके अशा अनेक विश्वविक्रमांची यादी त्यांच्या नावावर जमा आहे.

hobbs
हॉब्ज

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिली त्रिशतकी पार्टनरशिप उभारण्याचा मान देखील हॉब्ज यांच्याकडेच जातो. १९१२ सालच्या अॅशेज सिरीजमधली मेलबर्न टेस्ट. पाच मॅचेसच्या या सिरीजमध्ये इंग्लंडच्या संघाने २-१ अशी लीड मिळवली होती आणि मेलबर्न टेस्ट जिंकून अॅशेज खिशात घालण्याच्या इराद्याने इंग्लंडची टीम मैदानात उतरली होती.

पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची टीम सिडने बार्न्सने घेतलेल्या ५ आणि फ्रंक फोस्टरच्या ४ विकेट्समुळे अवघ्या १९१ रन्समध्ये कोसळली. इंग्लंडकडून हॉब्ज आणि विल्फ्रेड र्होडस मैदानात उतरले ते जणू काही परत न जाण्यासाठीच. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा स्कोअर ५४-०. हॉब्ज (३०) आणि र्होडस (२३).

टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ही जोडी अशी काही जमली की ऑस्ट्रेलियन बॉलर्स आणि फिल्डर्सकडे या जोडीचा नजाकतदार खेळ बघण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायाच शिल्लक नव्हता. दोघांनी मिळून इंग्लंडसाठी ३२३ धावांची ओपनिंग पार्टनरशिप दिली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं की फक्त ओपनिंगसाठीच नाही तर कुठल्याही विकेटसाठीची सर्वाधिक रन्सची पार्टनरशिप उभारली गेली होती. त्यापूर्वीचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या रॉजर हार्टगन आणि क्लेम हिल या जोडीच्या नावावर होता.

४ वर्षापूर्वीच्या अॅशेज सिरीजमध्ये आठव्या विकेटसाठी खेळताना त्यांनी २४३ रन्सची पार्टनरशिप उभारली होती. विशेष म्हणजे हॉब्ज- र्होडस जोडी हा विश्वविक्रम जमीनदोस्त करत असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी क्लेम हिल याच्यावरच होती.

या विश्वविक्रमी पार्टनरशिपच्या जीवावर इंग्लंडच्या टीमने आपल्या पहिल्या डावात ५८९ धावांचा डोंगर उभा केला. ३९८ रन्सची लीडच्या  पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियन्स आधीच प्रेशरखाली होते त्यामुळे त्यांची दुसरी इनिंग देखील १७३ रन्समध्ये संपली आणि इंग्लंडने ही टेस्ट इनिंग आणि २२५ रन्सने जिंकत अॅशेज देखील खिशात घातली.

विस्डेन दरवर्षी ‘प्लेअर ऑफ द येअर’ची यादी जाहीर करतं. या यादीत विस्डेन कधीच कुठल्याच प्लेअरला दुसऱ्यांदा स्थान देत नाही, पण हॉब्ज यांच्या संदर्भात विस्डेनने अपवाद केला आणि त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा १९०९ आणि त्यानंतर १९२६ साली ‘विस्डेन प्लेअर ऑफ द येअर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.