या तीन क्रिकेटर्समुळं भारताला लॉन बॉल्समध्ये मेडल जिंकणं शक्य झालंय…

लव्हली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सायकिया आणि रूपा राणी तिर्की ही चार नावं आपल्यापैकी कित्येक भारतीयांना २ ऑगस्टपर्यंत माहिती नव्हती. मात्र कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचत या चौघींनी लॉन बॉल्स या क्रीडाप्रकारात गोल्ड मेडल जिंकून दाखवलं.

कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होण्यापूर्वी हा खेळ चर्चेत नव्हता, त्यात स्पर्धेत पहिल्याच फेरीत भारतीय संघाला हार पत्करावी लागली, मात्र त्यानंतर या चौघींच्या संघानी मागं वळून पाहिलं नाही. अगदी घासून झालेल्या गोल्ड मेडलच्या मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेचा १०-१७ असा पराभव करत भारतानं या खेळात पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गोल्ड जिंकलं.

खरंतर १९९६ च्या कॉमनवेल्थ गेम्सचा अपवाद सोडला, तर १९३० पासून आजवरच्या प्रत्येक कॉमनवेल्थ गेम्समध्ये हा खेळ खेळण्यात आलाय. आता गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी केल्यामुळं भारतात या खेळाची भरपूर चर्चा आहे. आपल्याकडचा ट्रेंड बघता काही दिवसात या खेळाला अनेक नवे चाहते, स्पॉनर्स आणि खेळाडूही मिळतील.

पण एक साधा प्रश्न पडतो की भारतात हा खेळ आला कसा..? तर क्रिकेटमुळं

याचं श्रेय जातं मधुकांत पाठक नावाच्या एका क्रिकेट अंपायरला. मधुकांत पाठक हे भारतीय क्रिकेटमधले नावाजलेले अंपायर. २०००-०१ मध्ये ऑस्ट्रेलियन टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती, त्यावेळी एका मॅच दरम्यान मधुकांत पाठक यांची ओळख झाली ऑस्ट्रेलियाचा चिवट कॅप्टन स्टीव्ह वॉ सोबत. २००३-०४ मध्ये पाठक ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले, तेव्हा वॉनं त्यांना आपल्या घरी यायचं आमंत्रण दिलं.

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यापासूनच लॉन बॉल्सची क्रेझ होती, स्टीव्ह वॉचा भाऊ आणि क्रिकेटर मार्क वॉ आपल्या घरात कित्येक तास हा खेळ खेळायचा. पाठक यांनी मार्कला हा खेळ खेळताना पाहिलं आणि त्यांनाही खेळाची गोडी लागली. कारण हा खेळ तसा निवांत होता.

विषय निघालाच आहे, तर या खेळात नेमकं असतंय काय हे सांगतो…

आपण लहानपणी गोट्या खेळायचो, त्याच्या जवळपास जाणारा हा गेम आहे. यात एक पिवळा बॉल ज्याला जॅक म्हणतात तो आधी मैदानात ढकलायचा, हा बॉल कमीतकमी २३ मीटर अंतरावर गेला पाहिजे हा बेसिक नियम. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला किंवा संघाला ज्या संधी मिळतात, त्या दरम्यान या जॅकच्या जवळ जास्तीत जास्त बॉल पोहोचवायचे असतात, ज्यांचे बॉल जास्त जवळ असतात, तो संघ किंवा खेळाडू विजयी होतो.

मार्क वॉ होता क्रिकेटर, क्रिकेटर लोकांमध्ये गोल्फ वैगेरे खेळण्याची क्रेझ असताना, मार्क वॉ हा खेळ का खेळतो ? असा प्रश्न पाठक यांना पडला. 

वॉचं उत्तर सोपं होतं, “ज्याप्रकारे आपण क्रिकेटमध्ये शॉट्स खेळतो, तसंच खाली झुकून इथं बॉल टाकावा लागतो. यामुळे एकाग्रता वाढण्यात प्रचंड मदत होते.” पाठक यांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये राहून या खेळाचं प्रशिक्षण घेतलं या खेळ शिकवायचा कसा, हेही शिकून घेतलं.

ते भारतात आले आणि झारखंडमध्ये खेळाडूंना लॉन बॉल्स शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकं या खेळाकडे खेळ म्हणून बघतच नव्हते, त्यामुळं लॉन बॉल्समध्ये करिअर होऊ शकतं असा विचार करणाऱ्यांची संख्या फार कमी होती.

मग पाठक यांनी इतर खेळातल्या खेळाडूंना टार्गेट करायचं ठरवलं, बरेच खेळाडू असे होते जे लॉन्ग जम्प, कबड्डी अशा इतर खेळांमध्ये एक्स्पर्ट होते, मात्र दुखापती, वय आणि संधी अशा गोष्टींमुळे त्या खेळात मागे पडले होते. या खेळाडूंना एकत्र आणत, झारखंडमधल्या पाठक यांच्या अकादमीमध्ये भारतीय लॉन बॉल्सची सुरुवात झाली.

२०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा भारताची लॉन बॉल्स टीम स्पर्धेत उतरली, त्यानंतर प्रत्येक कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं सहभाग नोंदवला. पदक जिंकण्यात येणारं अपयशही यंदाच्या स्पर्धेदरम्यान धुवून काढलं.

आज कितीही प्रकाशझोतात आला असला, तरी सरकारकडून मात्र या खेळाकडे दुर्लक्षच झालं आहे…

मधुकांत पाठक एका मुलाखतीत सांगतात, ‘लॉन बॉल्सच्या वर्ल्डकपसाठी पात्र ठरुनही भारतीय संघाला स्पर्धेत भाग घेता आला नव्हता, कारण संघाकडे तेवढे पैसेच नव्हते. अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या खिशातून पैसे खर्च केले. एक काळ असाही होता, जेव्हा खेळासाठी लागणारे कपडे आम्ही फक्त १००० रुपयात शिवून घेतले, जिथं बाहेरच्या देशात ५००-६०० डॉलर्स कॉश्च्युमसाठी दिले जातात.’

मार्क वॉ, मधुकांत पाठक यांच्यासोबतच आणखी एका क्रिकेटरचं या खेळाशी कनेक्शन आहे, तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी.

मधुकांत पाठक यांचे भाऊ शशिकांत पाठक हे धोनीचे कोच. त्यामुळं या दोघांची चांगली ओळख होती, मधुकांत यांनी रांचीमध्येच अकादमी सुरू केली होती. धोनीनं आधी उत्सुकता म्हणून या अकादमीला भेट घेतली होती, त्यानंतर या खेळाबद्दल समजून घेतलं आणि पुढं जाऊन रांचीमधल्या अकादमीमध्ये धोनी लॉन बॉल्स खेळलाही. जेव्हा जेव्हा तो रांचीमध्ये असतो, तेव्हा तो या अकादमीमध्ये जातो, खेळाडूंना भेटतो.

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय संघाचं सरासरी वय आहे ३७. यात कुणी पोलिस कॉन्स्टेबल आहे, तर कुणी शिक्षिका. वय, अपुऱ्या सुविधा बघता या खेळाडूंवर दडपण असणं साहजिक आहे.

विजेत्या संघातल्या लव्हली चौबे सांगतात, ‘धोनी अनेकदा आमच्या अकादमीमध्ये यायचा. खेळाबद्दल, मानसिक ताकदीबद्दल आमच्याशी बोलायचा ज्याचा निश्चितच फायदा झाला.’

थोडक्यात या तीन क्रिकेटर्सनं भारताला एका खेळाची ओळख करुन देण्यापासून, ते त्यात चॅम्पियन बनण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत केली. तरीही या विजयाचं श्रेय पूर्णपणे या चार खेळाडूंचं आहे. ज्यांनी कित्येक अडथळे पार करत इतकी मोठी झेप घेतली आणि लॉन बॉल्स खेळाला आणि आपल्या कर्तुत्वाला खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.