आपण सगळे विसरलो, तरी त्या एका वाक्यासाठी सचिन तेंडुलकर त्यांचे उपकार विसरणार नाही…

सुभाष गुप्ते. भारताचे आजवरचे सगळ्यात जादुई बॉलर. गुप्तेंचा रनअप काही पावलांचा, हलकी फ्लाईट घेऊन बॉल जमिनीवर पडायचा आणि गपकन वळायचा. गुप्ते लेगस्पिनर पण ऑफ स्पिनरला स्वतःची लाज वाटावी अशी त्यांची गुगली वळायची. लेग ब्रेक आणि गुगली दोघांनाही इतका शार्प टर्न होता की बॅट्समन सोडा, स्टम्प्स मागचा विकेटकीपरही गंडायचा आणि विकेटकिपर गंडला की फुकट रन्स वाटले जायचे.

गुप्तेंची बॉलिंग ओळखणार कोण ? हे मोठा प्रश्न होता आणि याचं उत्तर म्हणून भारताला मिळाले, नरेन ताम्हाणे. मुंबईचेच विकेटकिपर, शिवाजी पार्कच्या मातीत घडलेले, भारताकडून फक्त २१ टेस्ट खेळलेले आणि तरीही भारताचे सर्वोत्कृष्ट विकेटकीपर म्हणून ओळखले जाणारे, नरेन ताम्हाणे.

आपल्या डोक्यात एक स्टिरिओटाईप फिक्स बसलाय, मुंबईचा क्रिकेटर म्हणजे आर्थिक हलाखीतून वर आलेला असणार, त्याला कुणीतरी मदत केलेली असणार आणि त्याची गोष्ट गरिबीवर मात करण्याची असणार… मात्र नरेन ताम्हाणे याच स्टिरिओटाईपला धक्का देतात.

आधीच श्रीमंत असलेली माणसं पण कष्टाच्या जीवावर यशस्वी होऊ शकतात की. नरेन ताम्हाणे यांचे वडील सरकारी नोकरीत कॅशियरपदावर, त्यात सावकार त्यामुळं पैशांचं टेन्शन नव्हतं. बरं ही गोष्ट १९३० च्या काळातली आणि त्यातही मुंबईतली.

पण हे मुंबईतल्या सावकाराचं पोरगं क्रिकेटच्या मैदानात आलं आणि तिकडचंच होऊन गेलं.

त्याकाळी कॉलेज क्रिकेट आणि विद्यापीठ क्रिकेटला प्रचंड महत्त्व होतं. प्रगतीचा एक एक टप्पा पार करत, त्यांनी मुंबईच्या रणजी टीममध्ये स्थान मिळवलं. ताम्हाणे यांची खासियत एक होती, ते बॅट्समन म्हणून नाही तर फक्त विकेटकिपर म्हणून कुठल्याही टीममध्ये फिट बसले असते. त्याकाळात मुंबईच्या टीमचे किपर होते माधव मंत्री, म्हणजे आपल्या सुनील गावसकरचे मामा. ताम्हाणे टीममध्ये आल्यावर मंत्री फक्त बॅट्समन म्हणून खेळले कारण त्यांना किपींगचं टेन्शन नव्हतं.

रणजीनंतर टीम इंडिया, तिथं वेगवेगळे रेकॉर्ड्स आणि थेट सर डॉन ब्रॅडमनकडून कौतुक एवढी झेप ताम्हाणेंनी २१ टेस्ट मध्येच मारली. याचं सगळ्यात मुख्य कारण होतं, त्यांची विकेटकिपींग.

कुठलीही क्रिकेटची मॅच बघा, विकेटकिपर डाईव्ह मारुन कॅचेस घेतात किंवा बॉल अडवायलाही डाईव्ह मारतात. मात्र ताम्हाणेंचं टेक्निक वेगळंच होतं. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी सांगतात, ‘बॉल लेग साईड किंवा ऑफ साईडला कितीही बाहेर असला तरी ताम्हाणे बॉलच्या मागे पोहोचायचे इतके ते चपळ होते.’

बॉल हातभर फिरतोय, कधी गचकन स्विंग होतोय, तरी ताम्हाणेंना डाइव्ह मारायची गरज लागली नाही, एवढा शार्प माणूस. त्यांनी ड्रॉप केलेले कॅचेस लोकांच्या लक्षात राहिलेत, कारण त्यांची संख्या लय कमी आहे.

ताम्हाणेंच्या करिअरमधला सगळ्यात भारी विषय म्हणजे त्यांची आणि सुभाष गुप्तेंची जोडी

सुभाष गुप्तेंची बॉलिंग किती डेंजर होती हे आधीच सांगितलंय, त्या भुताटकी वाटणाऱ्या बॉलिंगला ताम्हाणे बिनचूक किपींग करायचे. याचं मेन कारण होतं की, हे दोघंही सुरुवातीच्या दिवसापासून शिवाजी पार्कवर एकत्र खेळलेले, त्यामुळं गुप्तेंची लकब, त्यांचा कुठला बॉल कसा फिरेल हे ताम्हाणेंना परफेक्ट माहिती असायचं. असंही सांगण्यात येतं की, बॉलरची ग्रीप बघून ताम्हाणे बॉल कुठल्या बाजूला वळेल याचा परफेक्ट अंदाज लावायचे आणि त्यामुळेच त्यांची किपींग इतकी चपळ होती. गुप्तेंच्या बाबतीत तर नुसता रनअप ओळखूनच बॉल गुगली येणार की लेगब्रेक हे ताम्हाणेंना समजायचं.

आता लॅपटॉप आणि कॅमेरे आलेत, तेव्हा ताम्हाणेंच्या डोक्यात डेटा फिट होता.

गाजलेला ड्रॉप…

गुप्तेंच्या बॉलिंगवर किपींग करणारा बादशहा म्हणून ताम्हाणेंची ओळख होती. या जोडीनं मिळून कित्येक विकेट्स काढल्या. मात्र एक विक्रम हुकला, वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये दहाच्या दहा विकेट्स घेण्याची संधी गुप्तेंना होती. लान्स गिब्सची दहावी विकेट मिळालीही असती, मात्र ताम्हाणेंकडून कॅच सुटला आणि विक्रम हुकला.

दुर्दैवानं ताम्हाणेंचं टेक्निक भारतातल्या किपर्सना आत्मसात करता आलं नाही, पण त्यांनी भारतीय क्रिकेटला ‘सचिन तेंडुलकर’ दिला.

झालं असं की, रिटायरमेन्टनंतर ताम्हाणे भारताच्या सिलेक्शन कमिटीत गेले. १९८९ च्या पाकिस्तान टूरसाठी सिलेक्शन सुरू होतं, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गाजत असलेला सचिन तेंडुलकर रेसमध्ये होता. त्याच्या गुणवत्तेवर कुणालाच शंका नव्हती, प्रश्न होता वयाचा. पाकिस्तानच्या खुंखार बॉलिंगपुढं हे १६ वर्षांचं पोरगं उभं तरी राहील का ? याला दुखापत झाली किंवा अपयश आलं, तर त्याचं करिअर संपून जाईल असे अनेक मुद्दे होते. त्यामुळं सिलेक्शन मिटिंगमध्ये बरीच खडाजंगी सुरू होती.

एक सिलेक्टर म्हणाला, ‘आपण याला संधी दिली आणि हा अपयशी ठरला तर त्यानंतर…’ त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ताम्हाणे म्हणाले, “Tendulkar never fails.”

या वाक्यामुळं सिलेक्शन झालं आणि शिवाजी पार्कच्या लाडक्या तेंडल्यानंही नाक फुटल्यावर उभं राहून ताम्हाणेंचा शब्द खरा केला. पुढं जाऊन या पोरानं क्रिकेटवर राज्य केलं.

ताम्हाणेंना कुठल्या जसं बॉल कुठल्या बाजूला वळणार हे ओळखता यायचं, तसंच कुठल्या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे हे पण ते पक्कं ओळखून असायचे. म्हणूनच चेष्टे चेष्टेत त्यांना भविष्य माहीत असल्याची चर्चा व्हायची…

रणजी फायनलच्या आदल्या दिवशी त्यांनी मुंबईचे कोच बलविंदर संधू आणि मकरंद वायंगणकर यांना सांगितलं की, उद्याच्या मॅचमध्ये ऍबे कुरुविलाला खेळवणार आहे. कुरुविला तेव्हा तुलनेनं नवा होता, त्याला थेट फायनलमध्ये उतरवणं धोक्याचं होतं. मात्र त्यानं पहिल्याच दिवशी ४ विकेट्स खोलत विषय एन्ड करुन टाकला. तो सचिन इतका यशस्वी ठरला नसला, तरी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव चांगलंच गाजलं.

ताम्हाणे यांच्या विषयी आणखी एक भारी गोष्ट सांगण्यात येते, त्यांच्या इंटरनॅशनल करिअरच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना डावलून बुधी कुंदेरान यांना संधी देण्यात आली. कुंदेरान यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यांच्याकडे विकेटकिपींग ग्लोव्ह्सही नव्हते. 

हे जेव्हा ताम्हाणेंना समजलं, त्यांनी स्वतःचे गोल्व्हस कुंदेरान यांना दिले.

मार्च २००२ मध्ये त्यांचं कॅन्सरमुळं निधन झालं. आज दुर्दैवानं ताम्हाणे फार लोकांच्या लक्षात नाहीत, पण सचिन तेंडुलकरसाठी हा माणूस भांडला नसता, तर भारतीय क्रिकेटचं काय झालं असतं, याचा विचार केला की त्यांचं महत्त्व लक्षात येतं. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.