वाईट संगतीला लागला आणि मुंबईत बॉम्बस्फोट केले, नाही तर तो देखील क्रिकेटचा सचिन असता…

१९९३ साली मुंबईत महाभयंकर बॉम्बस्फोट मालिकेचा खरा व्हिलन कोण याच उत्तर टायगर मेमन पाशी येऊन थांबतं. त्याने दाऊद इब्राहिम कडून पैसे घेतले आणि हे  घडवून आणले. तो  क्रूर डोक्याचा होता. बॉम्बस्फोट होण्या आधी तो दुबईला पळून गेला होता, तिथून त्याने पाकिस्तानात आसरा शोधला. त्यानंतर त्याचा कोणताही पत्ता नाही.

गेल्या काही वर्षांपूर्वी त्याच्या भावाला याकूब मेमनला भारत सरकारने फाशी दिली. मात्र अजूनही टायगर मेमन सापडलेला नाही.

असं म्हणतात की गैर मार्गाला लागण्या पूर्वी टायगर मेमन उत्तम क्रिकेट खेळायचा. वडिलांकडून आलेला वारसा त्याला पुढे टिकवता आला नाही हि बात अलाहिदा, पण त्याचे वडील अब्दुल रझ्झाक हे खेळाडू होते आणि टायगरहि त्यांच्याच मुशीतला होता.

आजचा किस्सा टायगरच्या क्रिकेट खेळण्याचा आणि संघाला विजय मिळवून देण्याचा.

टायगर मेमनचं मूळ नाव मुश्ताक. मुंबईत मुहंमद अली रोडवर हिंदू मुसलमान अशी संमिश्र वस्ती असलेल्या मांडवी पोस्ट ऑफिससमोरच्या कडिया बिल्डिंगमध्ये तो वाढला. मुश्ताकचे वडील खेळाडू असल्याने , ज्या ज्या लोकांबरोबर ते खेळले होते त्या सवंगड्यांच्या धर्माबद्दल आकस बाळगण्याचा तेव्हा प्रश्न नव्हता. अब्दुल रझ्झाक यांच्या घरात बायको ,मुलांसह विविध खेळांमध्ये विशेषतः क्रिकेटमध्ये मिळवलेल्या पदकांची तसेच करंडकांची रेलचेल असायची.

कुठल्यातरी साखळी सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू टायगर पतौडीबरोबर खेळण्याची संधी त्यांना मिळाली होती.  तेव्हापासून त्यांच्या आसपासचे लोक त्यांना टायगर म्हणू लागले. पुढे त्यांच्या दोन नंबरच्या मुलाचे मुश्ताकचे नाव टायगर पडले.

मुश्ताकसुद्धा वडीलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये प्रवीण होता. लहानपणापासूनच त्याच्या क्रिकेट कौशल्याची सगळे तारीफ करायचे. क्रिकेट खेळताना मुश्ताक आपल्या हिमतीबद्दल आणि निर्धाराबद्दल प्रसिद्ध होता. विशेषतः तो ज्या हिमतीने क्रिकेट खेळायचा त्याचा पुढे फार गाजावाजा झाला.

१९७२ साली शाळेकडून एक सामना खेळताना तो जे खेळला तेव्हापासून तो जास्तच लोकप्रिय झाला. पायधुणीच्या बेग महमंद शाळेत असताना आपला प्रतिस्पर्धी संघ असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम या शाळेविरुद्ध मुश्ताकचा संघ अडचणीत सापडला. अंजुमन-ए-इस्लाम या शाळेची इतकी दहशत होती कि दरवेळी त्यांचाच संघ पहिल्या नंबरच बक्षीस मिळवून जायचा. त्या शाळेला हरवणं हे मुश्ताकच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न होतं.

त्यांना हरवण्यासाठी मुश्ताकचे हात सळसळत होते पण घोळ असा झाला होता कि तो बारावा खेळाडू होता राखीव प्लेअर म्हणून.

अंजुमन-ए-इस्लामने अगोदर फलंदाजी करत निर्धारित षटकात १४२ धावा तडकावल्या. त्यांच्या या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना बेग महंमद शाळेचे उत्तम क्रिकेट खेळणारे आघाडीचे सहा खांदे फलंदाज अवघ्या ९१ धावांत तंबूत परतले होते.

ऐन वेळी बेग महंमद संघातला एक खेळाडू आजारी असल्याने मुश्ताकला संधी मिळाली. नंतरच्या क्रमांकावर आपल्याला बॅटिंगला पाठवावं अशी विनंती त्याने संघाच्या कर्णधाराला केली, मॅच जवळपास हरतच आलोय म्हणून त्याने मुश्ताकला बॅटिंगला पाठवलं.

मुश्ताक बॅटिंगला आला तेव्हा संघाला जिंकण्यासाठी ५२ धावांची गरज होती. दुसऱ्या बाजूने अंजुमन-ए-इस्लामचा वेगवान गोलंदाज हा तुफ्फान गोलंदाजी करत होता. पहिले पाच चेंडू डॉट खाल्ल्यानंतर शेवटच्या बॉलवर मुश्ताकने षटकार ठोकला. नंतर मात्र जो बॉलर समोर येईल त्याला झोडपून काढण्याचा  त्याने सपाटाच लावला.

हळूहळू त्यांच्या संघाचे खेळाडू बाद होत होते पण मुश्ताक एकहाती किल्ला लढवत होता. संघाला जिंकण्यासाठी सात धावांची गरज असताना नझीमचा एक चेंडू त्याच्या नाकावर लागला. मुश्ताक कोसळला. त्याला मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. पण हिमतीने तो नाकावर पट्टी बांधून परत मैदानात आला.

सामन्याचा शेवटचं षटक. पहिल्या चार चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. नझिमच्या पाचव्या चेंडूवर त्याने सणसणीत षटकार खेचला. एक चेंडू एक धाव अशी स्थिती असताना नझीमने एक चेंडू एकदम स्लो टाकला त्यावर मुश्ताकला धाव काढता आली नाही. सामना हरल्याच्या कल्पनेने तो नाराज झाला पण सहकाऱ्यांच्या विजयाच्या जल्लोषाने तो भानावर आला. शेवटचा चेंडू नझीमने वाईड टाकला होता.

मुश्ताकच्या बेग महंमद शाळेने पहिल्यांदाच अपराजित असलेल्या अंजुमन-ए-इस्लामला धूळ चारलेली होती. त्याच्या अप्रतिम खेळीने इतिहास घडवला होता,सगळीकडे त्याच्या नावाचा बोलबाला झाला होता. तेव्हापासून मुश्ताक खरा टायगर म्हणून ओळखला जाऊ लागला.

क्रिकेट गाजवता येईल असं टॅलेंट असणारा टायगर मेमन, मात्र पुढे वडील काम करत नसल्यामुळे घरची परिस्थिती बिघडली आणि तो अगदी लहान वयातच पैसे कमवायचा मागे लागला. एका बँकेत कारकून म्हणून नोकरी पकडली पण तिथून भांडून बाहेर पडला. पुढे अंडरवर्ल्डशी संबन्ध आला.

या सगळ्यात क्रिकेट मागं पडलं. शालेय क्रिकेटमध्ये त्याने ज्या अंजुमन इस्लामला धडा शिकवला होता पुढे काही वर्षांनी त्याच टीमला आपल्या बॅटिंगने फटकेबाजी करून विक्रम करणारे दोन खेळाडू भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ ठरले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.