सगळ्या मुंबईत लागलेले शर्मिला टागोरचे पोस्टर एका रात्रीत उतरवावे लागले होते…

अभिनेत्री शर्मिला टागोर हिचा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर १९६४ सालच्या ‘कश्मीर की कली’ या चित्रपटापासून प्रवेश झाला. अतिशय देखणी आणि अप्रतिम अभिनय करणारी नायिका म्हणून हिंदी सिनेमात शर्मिलाचे नाव आजही घेतले जाते.

विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या देवी, अपराजिता, अरण्येर दिन रात्री, सीमा बध्द या बंगाली चित्रपटात भूमिका केल्या. हिंदीत देखील ‘आराधना’, ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’,‘अमर प्रेम’ या सिनेमातील शर्मिला आजही आठवली जाते.

हे सर्व व्यवस्थित चालू असताना साठच्या दशकात तिने बिकिनी परिधान करून एकच खळबळ उडवून दिली होती. या बिकिनी प्रकरणाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील मोठी खळबळ उडाली होती पण शिताफीने प्रकरण हाताळल्याने प्रश्न सुटला.

हा किस्सा खूप रंजक आहे.

साठच्या दशकाच्या मध्यावर एकदा शर्मिला आपल्या चित्रपटाच्या प्रीमियर साठी दिल्लीला गेली होती. तिथे एका पार्टीमध्ये तिची भेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी झाली.

कोवळ्या शर्मिलाला बघून टायगर पतौडी यांची अवस्था ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ अशी झाली! 

पहिल्या भेटीतच ते शर्मिला पतौडीच्या प्रेमात पडले. दिल्लीतील कसोटी सामना पाहायला शर्मिला गेली. त्यावेळी न्युझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. मार्च १९६५ मध्ये दिल्लीच्या या सामन्यात पतौडीने पहिल्या डावात ११३ धावा फटकावल्या. हा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला.

(प्रेक्षकात शर्मिला होती ना!) 

त्यानंतर शर्मिला मुंबईला निघून आली. टायगर पतौडी तिला रोज पुष्पगुच्छ आणि प्रेम पत्र पाठवत होते. शर्मिलाला आईसक्रीम आवडते म्हणून त्यांनी रेफ्रिजरेटरदेखील वाढदिवसाला भेट म्हणून पाठवला. पतौडी राजघराण्यातील राजपुत्र होते. त्यांचा राजबिंडा लूक, ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेतल्याने त्यांच्यात आलेली स्टायलीश देहबोली, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर, क्रिकेट मधील त्यांचा दबदबा, पंचविसाव्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये केलेलं देशाचं नेतृत्व शर्मिलावर प्रभाव पाडत होते.

अनेक महिने प्रेमाची याचना केल्यानंतर शर्मिलाच्या मनात देखील पतौडी यांच्या बाबत सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आणि तिने प्रेमाची कबुली दिली. पतौडी यांचे रॉयल राजघराणे याचा दबाव तिच्यावर होता. नवाब घराण्याचे सर्व खानदानी रितीरीवाज, ती अदब, तो ऑरा आपल्याला कॅरी करता येईल का याची तिला चिंता होती.

टायगर पतौडीच्या आईने आपल्या होणाऱ्या सुनेला भेटायचे ठरवले. तसे टायगरने शर्मिलाला कळवले. मुंबईला शर्मिलाच्या घरी पतौडी यांची आई तिला भेटायला येणार होती. हे ऐकताच शर्मिलाचे धाबे दणाणले.

याला एक स्पेशल कारण होतं. 

कारण पुढच्या आठवड्यातच १० मार्च १९६७ रोजी तिचा ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. आणि या सिनेमात तिने पहिल्यांदाच बिकिनी परिधान केली होती. बिकिनीच्या वेषातील तिचे पोस्टर्स सर्व मुंबईमध्ये लागले होते. होर्डिंगच्या स्वरूपातील हे पोस्टर्स रस्त्याच्या बाजूला प्रेक्षकांचे नजर खेचत होते. शर्मिलाच्या या ‘बोल्ड’ पोस्टर्सनी मुंबईत हवा केली होती.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही गोष्ट गरजेची होती. शक्ती सामंत यांच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. त्यांनी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एकही कसर सोडली नव्हती. व्यवसाय म्हणून हे सर्व जरी योग्य असले तरी, शर्मिलाला आता मात्र धडकी भरली होती.

कारण एअरपोर्टवरून तिच्या घरी येताना होणाऱ्या सासू बाई (पतौडीच्या आई) नक्कीच  रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोस्टर्सकडे पाहणार आणि खानदानी राजघराण्यातील सनातनी सासूबाई आपल्या भावी सुनेला नकार देणार या भावनेने शर्मिला टागोर प्रचंड घाबरून गेली. 

काय करावे? काही सुचत नव्हतं. शेवटी तिने एक आयडिया केली. शक्ती सामंत यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली आणि रात्रीतून एअरपोर्ट ते शर्मिलाचे घर या मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेले सर्व होर्डिंग उतरवले गेले.

सकाळपर्यंत मोठी टीम शर्मिलाचे ‘बिकिनी’ मधील पोस्टर्स खाली उतरवण्याच्या कामात जुंपली होती.

सकाळी जेव्हा शर्मिलाला सांगण्यात आले  की सर्व पोस्टर्स काढली गेली आहेत तेव्हा तिच्या जीवात जीव आला.

सकाळी सासूबाई मुंबईत एअरपोर्टवर उतरल्या. तिथून थेट शर्मिलाच्या घरी आल्या. देखणी शर्मिला त्यांना लगेच आवडली आणि त्यांनी तिथले तिथेच तिला होकार दिला. यथावकाश २७ डिसेंबर १९६८  रोजी शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचा शाही निकाह होऊन शर्मिला टागोरची आयशा बेगम बनली!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.