ममता बॅनर्जीसारखा कायम धगधगणारा ज्वालामुखी वाजपेयींच्या समोर शांत झाला

 ममता बॅनर्जीचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या पंधराव्या वर्षी ती विदयार्थी चळवळीमधून  राजकारणात आली. कॉलेजमध्ये गेल्यावर छात्र परिषद युनियन नावाची काँग्रेसची विदयार्थी संघटना उभारली.

असं म्हणतात की एकदा जेष्ठ गांधीवादी नेते स्वातंत्र्यसेनानी आणि आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधीचे प्रखर विरोधक जयप्रकाश नारायण जेव्हा कलकत्ता विद्यापीठात व्याख्यानासाठी आले होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने त्यांची अॅम्बेसीडर कार अडवली होती. यामध्ये सगळ्यात पुढे असलेल्या ममता बॅनर्जीने त्यांच्या कारच्या बॉनेटवर नाच केला होता.

तिची तडफ बघून छोट्या वयातच महिला काँग्रेसची सरचिटणीस बनवण्यात आलं .

१९८४ साली तिला जाधवपूर मतदार संघातून खासदारकीच तिकीट मिळालं. जाधवपूर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोमनाथ चटर्जी येथून दोन वेळा खासदार होते. पण अवघ्या २९ वर्षाच्या ममता बॅनर्जीने त्यांना हरवलं. कमी वयात खासदार बनण्याचा विक्रम करणाऱ्या या मुलीची चर्चा पूर्ण देशभर झाली.

कायम खादी साडी साधे स्लीपर या वेशात असणाऱ्या ममता बॅनर्जीने लग्न देखील केले नाही. राजकारणात फायरब्रँन्ड नेता म्हणून ती प्रसिद्ध आहे. तिच्या चिडखोर पणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

१९९३ मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये ती मानव संसाधन, क्रीडा आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री होती. पण पंतप्रधानाशी झालेल्या काही मतभेदामुळे चिडून तिने डायरेक्ट मंत्रीपद सोडल. काही वर्षांनी पक्ष ही सोडला. स्वतःचा तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला.

एकदा तर तिने महिला विधेयकाला विरोध म्हणून गोंधळ घालणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदाराची पूर्ण लोकसभेत कॉलर धरली.

अशी ही विस्तवाप्रमाणे तडकभडक असणारी ही नेता. काँग्रेसबरोबर भाऊबंदकी काढून तिने स्वतःचा पक्ष काढला होता. १९९९मध्ये आयुष्यभर ज्या विचारसरणीचा विरोध केला त्या भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही दलाला पाठिंबा दिला. याचे एकमेव कारण म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी.

वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ती रेल्वेमंत्री होती. वाजपेयींचे एनडीए हे युतीच्या पाठींब्यावर चालणारे सरकार होते. अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्या आकांक्षा सांभाळत वाजपेयी सरकार चालवत होते. त्यांची सर्वसमावेशक आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची वृत्तीमुळे ते जनतेचेही लाडके होते.

एकदा काय झालं रेल्वेमंत्री असताना काही तरी कारणाने ममता बॅनर्जीचा सरकारशी वाद झाला. ती रागाच्याभरात दिल्ली सोडून तडक कलकत्त्याला आली. वाजपेयींच्या कोणत्याही प्रतिनिधीशी बोलण्यास तिने नकार दिला. सरकारसाठी आणीबाणीची वेळ आली होती. आता काय करणार?

६ जुलै २०००. कोलकात्याच्या हरीश चटर्जी मार्गाच्या अरुंद गल्ली मध्ये अचानक वाहनांचा ताफा आला. एक मोठी गाडी ममता बॅनर्जी यांच्या आईच्या छोट्याश्या घरापुढे येऊन थांबली. त्यात स्वतः प्रधानमंत्री होते.

गल्लीमधले सगळे रहिवाशी आश्चर्याने डोकावून पहात होते. वाजपेयी आलेत म्हटल्यावर ममता बॅनर्जी धावत त्यांच्या स्वागताला दाराशी आल्या. वाजपेयींच्या सोबत त्यांची मानलेली मुलगी नमिता कौर आणि नात निहारिका सुद्धा होती.

abj1

सगळ्यात पहिला तर वाजपेयींनी ममता बॅनर्जीच्या वृद्ध आईची गायत्रीदेवींची भेट घेतली. त्यांना प्रणाम केला. त्यांची विचारपूस केली. गायत्रीदेवीनी त्यांच्या नातीला मांडीवर बसवून मिठाई खाऊ घातली.

ममता बॅनर्जीना ठाऊक होते की वाजपेयींना बंगाली संदेश आवडतात. मिठाई खाताखाता वाजपेयी खट्याळपणे त्यांच्या आईला म्हणाले,

“आपकी बेटी बहुत गुस्सेवाली है. इसे बार बार मनाना पडता है.”

सगळेजण हसले. कोणतीही राजकीय चर्चा न करता वाजपेयी आले तसे निघून गेले. वाजपेयींच्या या आपलेपणावाल्या घरगुती भेटीमुळे ममता बॅनर्जी भारावून गेली होती. सगळा राग निवळून ती परत दिल्लीला हजर झाली.

ममता बॅनर्जीसारखा कायम धगधगणारा ज्वालामुखी वाजपेयींच्या समोर शांत झाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.