तत्वांसाठी स्वपक्षाविरोधात बंड करणारा नेता !

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी गेले.

आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत फक्त एका निवडणुकीत पराभूत  झालेले सोमनाथ चॅटर्जी तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली  नाही. याच तत्वांसाठी त्यांची आपल्याच पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली होती.

किस्सा आहे २००८ सालचा.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने अमेरिकेशी अणुकरार करायचा निर्णय घेतला होता. डाव्यांचा या अणुकराराला विरोध होता आणि याच मुद्यावर  डाव्या पक्षांनी सरकारचा पाठींबा काढला होता. सोमनाथ चॅटर्जी त्यावेळी लोकसभा अध्यक्ष होते.

सोमनाथ चॅटर्जी यांच्या पक्षाने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चॅटर्जीना लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. मात्र चॅटर्जी यांनी त्यासाठी ठामपणे नकार दिला.

लोकसभा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो. हे पद सर्वच राजकीय अभिनिवेशापेक्षावरचं असतं. अध्यक्षपदावरील व्यक्ती कुठल्याही पक्षाची नसते. त्या पदाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यावेळी चॅटर्जी यांनी घेतली होती.

सोमनाथ चॅटर्जी यांच्या याच निर्णयामुळे २००८ साली पक्षाच्या पॉलिट ब्युरोने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. ‘आपल्याला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला दिवस, आपल्या आयुष्यातील सर्वात दुखद दिवस असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी सोमनाथ दा यांनी दिली होती. त्यानंतर २००९ साली  त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

२५ जुलै १९२९ रोजी आसाममधील बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सोमनाथ चॅटर्जी यांच्या घरातील राजकीय  वातावरण संपूर्णतः त्यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधातलं होतं. त्यांचे वडील निर्मलचंद चॅटर्जी हे प्रख्यात वकील आणि अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते. हिंदू महासभेकडूनच ते खासदार देखील राहिले होते.

कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी आणि ब्रिटनमधील मिडल टेम्पल कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या चॅटर्जी यांनी काही काळ कोलकात्याच्या उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस केली. त्यानंतर ते १९६८ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सक्रीय झाले. १९७१ साली त्यांनी अपक्ष म्हणून पहिलांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. यावेळी त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिला होता.

आपल्या एकूण राजकीय कारकिर्दीत ते १० वेळा लोकसभेवर निवडून गेले त्यात फक्त १९८४ साली जादवपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्याकडून झालेला पराभव वगळता त्यांनी सर्वच निवडणुका जिंकल्या. १९८५ ते २००९ या काळात ते प.बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून सलग ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.