आज आबा असते तर महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं ?

आज आर.आर. आबांचा वाढदिवस. जगासाठी आजची गोष्ट जयंती असली तरी तासगावकरांना आजचा दिवस देखील आबांचा वाढदिवसच वाटतो. आबांचा वाढदिवस १६ ऑगस्टचा. साधारण नेत्यांच्या वाढदिवसादिवशी वर्तमानपत्रांचे रकाने भरले जातात पण आबांच्या वाढदिवसादिवशी नेहमीच वर्तमानपत्रांना १५ ऑगस्टची सुट्टी असायची.

त्यामुळं आबांच्या वाढदिवसा दिवशी कधी त्यांच्यावर पानभर लेख आले नाहीत. बऱ्याचदा त्यांचा वाढदिवस १५ ऑगस्टलाच वर्तमानपत्र साजरा करून टाकायचे. 

२०१४ सालची इलेक्शन झाली आणि आबांना कॅन्सरचं निदान झालं. थोडक्यात वाटणारी बातमी पुढे सिरीयस झाली आणि काही दिवसातच थेट आबांच्या जाण्याची बातमी आली. आबांच अचानक जाणं अनेकजण पचवू शकले नाहीत, आबा असतील अशाच भावना अगदी देहसंस्कार झाल्यानंतर देखील लोकांची राहिली.. 

आजही सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाचा विषय निघाल्यानंतर चौकातला एखादा आज आबा पायजे होतं मग सांगितलं असतं अस म्हणून जातो. विषय जरतरचा आहे. हायपोथेटिकल आहे. स्वप्नवादात रमणारा आहे पण खरच आज आबा असते तर. काय असती राजकारणाची दिशा, कोणत्या गोष्टी बिघडल्या असत्या कोणत्या सुधारल्या असत्या. याचा अंदाज बांधणारा हा लेख. 

फक्त जर-तर या अंदाजावर लावलेला, शेवटी आज आबा नाहीत हे कितीही मान्य केलं तरी आबा असते तर आज काय असतं हे सांगण्याचा हा प्रयत्न. 

१) सुटेबल मॅन ॲण्ड सुटेबल पार्टी अस आबांच राष्ट्रवादीत पक्षात असण्याचं गणित होतं.

राष्ट्रवादी पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा, फोर्च्युनरवाल्यांचा, गुंठामंत्र्यांचा पक्ष म्हणून आरोप केला जातो. अशा वेळी राष्ट्रवादी पक्षात आबांच अस्तित्व हे पक्षाला नेहमी फायद्याचं ठरत होतं. 

२०१४ च्या निवडणूकांच्या प्रचारात मोदीचं वारं जोरात होतं, अशा वेळी किमान नैतिकता फक्त आबांकडे बघून लोकांना वाटायची. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणं ही आबांची जमेची बाजू होती. आबा असते तर निश्चितच आजच्यापेक्षाही अधिक जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळू शकल्या असत्या. 

२०१९ च्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीकडे फक्त आयात केलेले अमोल कोल्हे आणि नुकतेच पक्षात आलेले मटकरी होते. अशा वेळी राज्यभर शेतकऱ्यांच्या बाजूने वातावरण तापवण्याचं काम आबांच्या माध्यमातून राष्ट्रवादीस करत आलं असतं. पक्षाला नैतिकता मिळवून देण्याची जेव्हा सर्वात अधिक गरज भासत होती तेव्हाच आबा नव्हते, अशा काळात आबा असते तर सर्वसामान्य घरातला तरूण पक्षाला जोडून घेण्याचं काम आबांनी केलं असतं. 

२) २०१४ ते २०१९ च्या काळात अभ्यासू भाजपला अभ्यासू उत्तरांमध्ये अडकवण्याचं काम. 

आबा पेक्षाने वकिल होते. राजकारणातला खरा हूशार माणूस म्हणून आबांचा उल्लेख केला जात. भाषेची मर्यादा जपत आबा विधानसभेत समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणत. २०१४ नंतरच्या भाजप-सेना युतीच्या काळात भारतीय जनता पक्षाने ज्या योजना आणल्या त्याचा खरा ग्राऊंड रिपोर्ट आबांनी मांडला असता.

आपल्या शाब्दिक हल्यांनी फडणवीसांना अडचणीत आणण्याचं काम आबांनी निश्चितच सर्वात अधिक प्रगल्भतेने केलं असतं. 

३) महाविकास आघाडीची स्थापनेत पुढाकार व आबांची नैतिकता. 

आबांकडची सर्वात मोठ्ठी गोष्ट होती ती त्यांची नैतिकता. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्यापासून ती पटवून देण्यापर्यन्त आबां इतका सक्षम व्यक्ती पक्षात नसता. राजकारण करत असताना व्यक्तिगत विरोध न करणं ही आबांची वृत्ती होती. त्यामुळेच शिवसेनेपासून ते भाजप व कॉंग्रेसमधील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. 

याचाच आधार घेवून महाविकास आघाडी स्थापन करण्यात आबांची महत्वाची भूमिका राहिली असती. अजित दादांच बंड आबा थोपवू शकले नसते मात्र शरद पवारांची भूमिका नैतिक आहे व या नैतिक अधिष्ठानपायी राष्ट्रवादी सोबत रहायला हवे हे मात्र अधिक तीव्रतनेने पटवून देण्याची भूमिका आबांनीच बजावली असती. 

४) सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं वर्चस्व 

आबांच अस्तित्व फक्त राष्ट्रवादी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचं नव्हतं तर आबांमुळे सांगली जिल्ह्यास देखील राजकारणात महत्व होते. आर.आर. आबा, पतंगराव कदम, जयंत पाटील असे तीन कॅबिनेट व प्रतिक पाटील यांच्या रुपात एक केंद्रिय राज्यमंत्री असा दबदबा सांगली जिल्ह्याचा राहिला. आबा गेले, पाठोपाठ पतंगराव कदम देखील गेले. प्रतिक पाटील राजकीय संन्याशी झाले आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणास उतरती कळा लागली. 

आज आबा असते तर महाविकास आघाडीत निश्चितच ते गृहमंत्री असते. पून्हा दोन कॅबिनेट मिळून सांगली जिल्ह्याचं अस्तित्व निर्माण झालं असतं. आबांच्या जाण्याने राजकीय जिल्ह्यात राजकीय पोकळी निर्माण झाली. विरोधाचं राजकारण संपलं.

सक्षम विरोधी नेता समोर असल्यास लढण्यास मज्जा येते हे खासदार संजय काका पाटलांना देखील आबांच्या जाण्यानंतर समजले असेल. 

५) घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य माणूस 

राज्यातील आजची स्थिती घराणेशाहीची आहे. प्रत्येक पक्षाच्या घराण्यातूनच राजकारण सुरू झाले. दूसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीकडे राजकारण जात असताना राजकारणात करियर करु पाहणाऱ्या नव्या दमाच्या पिढीपुढे आबा एक आदर्श होते. प्रसंगी वारलेल्या वडिलांचे कपडे घालून शिकलेले आबा तरुण पिढीला आधार वाटत असतं.

युवक मग तो कोणत्याही पक्षात असो आबांच राजकारण पाहून मुलं धाडसाने राजकारणाची दिशा पकडत असत. मात्र सर्वसामान्य घरातला माणूस राजकारणात इतक्या उंचीवर जातो हे सांगणारे आबा शेवटचे नेते ठरले. आज आबा असते तर निश्चितच अशी नवी पिढी तयार करण्यासाठी ते कार्यरत असते. 

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार अशी जी लाईन होती ती लाईन आबांनी निश्चितच पुढे नेली असती. पण या सगळ्या गोष्टी जर-तरच्या झाल्या आज आबा नाहीत हेच सत्य आपणाला स्वीकारावे लागते.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Mohsin mulani says

    विनम्र अभिवादन…! 🙏

    Aaba💝

Leave A Reply

Your email address will not be published.