ज्या बँकेने आबासाहेबांना कारकुनाच्या नोकरीसाठी अपात्र ठरवलं, त्याचेच ते डायरेक्टर झाले

आबासाहेब गरवारे.

ज्यांचं नावाने पुण्यात गरवारे कॉलेज आणि मेट्रो स्टेशन आहे ते म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठे उद्योगपती. उद्योग क्षेत्रात मराठी मंडळी फारच कमी. त्यातच अजून कमी लोक ज्याकाळी या क्षेत्रात होते, त्या काळात मराठी उद्योजकांचं नेतृत्व केलं ते आबासाहेब गरवारे यांनी. मराठी माणसाला राजकारण जमतं, फडणीशी जमते, साहित्य जमतं पण व्यापार काही जमत नाही अशी पूर्वापार चालत आलेली समजुत खोटी पाडली ती आबासाहेब गरवारे यांनी.

आबासाहेब गरवारे यांना कोणताही व्यापार किंवा उद्योगाची घरगुती परंपरा लाभलेली नव्हती. खूप गरिबीतून त्यांनी कसंतरी भांडवल उभा केलं, त्यातही अपूर्ण शिक्षण होतच. मात्र व्यवसायासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये पुरेपूर होती ती म्हणजे ‘जिद्द’.

मात्र उद्योजक होण्याआधी बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं जे त्यांनी काही अशाप्रकारे पूर्ण केलं की सगळ्यांचीच बोट तोंडात गेली.

१९०३ मध्ये तासगाव इथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण झालं ते सांगलीला. शिक्षणाची भरपूर आवड असली आणि ते घेण्याची इच्छा असली तरी हे शक्य झाले नाही ते घरच्या गरिबीमुळे. धड माध्यमिक शिक्षण सुद्धा त्यांना पूर्ण करता आलं नाही. मात्र उद्योगासाठी पैसा हवा होता तसंच चांगली नोकरी करून घराला हातभार लावावा, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी राहातं गाव सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला.

१९२० मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच ते नोकरी शोधायला निघाले. अशात त्यावेळच्या इंपिरियल बँकेत म्हणजेच आताच्या स्टेट बँकेत कारकुनाची नोकरी मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केला होता.

पण इथे आडवं आलं ते त्याचं शिक्षण. अपुऱ्या शिक्षणामुळे बँकेच्या नोकरीत त्यांना प्रवेश मिळाला नाही. तेव्हाच आबासाहेबांनी ठरवलं की त्यांचं हे अपुरे राहिलेलं स्वप्न ते नक्कीच पूर्ण करणार. ज्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी मराठी उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली त्याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न देखील पूर्ण केलं.

बँकेत जेव्हा कारकुनासाठी त्यांचा अर्ज रद्द झाला तेव्हा त्यांनी सुरुवातीला रेल्वेच्या एका कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी धरली आणि नंतर सूर्यकांत देसाई या त्यांच्या मित्राच्या भागीदारीत व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यासाठी भांडवल एकत्र करत आणि आपली आयडिया लढवत टॅक्सी व्यवसाय सुरू केला.

हे करत असतानाच जुन्या मोटारी खरेदी करून त्या दुरुस्त करून विकण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्याकरिता डेक्कन मोटार एजन्सी नावाची फर्म सुरू केली. मात्र सेकंड हॅन्ड गाड्या विकत असताना एखादी गाडी चांगली लागली नाही, तर गिऱ्हाईक त्यांना खूप सुनावत. त्यामुळे त्यांनी अशा गाड्यांची दुरुस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

यासाठी स्वतःचं वर्कशॉप त्यांनी काढलं आणि एका यशस्वी व्यवसायासाठी योग्य शिक्षणाची गरज जेव्हा त्यांना जाणवली, तेव्हा त्यांनी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये जाऊन शिक्षण सुरू केलं. बँकिंग, हिशेब, कायदे असे सगळे कोर्स त्यांनी पूर्ण केले. व्यवसायाला शिक्षणाची जोड मिळाल्याने उद्योग भरभराटीला लागला.

उद्योगात नेहमी नवनवीन प्रयोग करण्याची सवय असल्याने लवकरच देश-विदेशातील ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित झाले. पैसा आला सोबतच अनुभव देखील. समाजातील त्यांची प्रतिष्ठा उंचावली आणि यातूनच त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याची वाट मोकळी झाली.

कमी शिक्षणामुळे ज्या बँकेत त्यांना नोकरीसाठी प्रवेश मिळाला नव्हता, त्याच स्टेट बँकेत कालांतराने मोठ्या पदावर त्यांचं नाव कोरलं गेलं. स्टेट बँकेच्या मध्यवर्ती बोर्डात डायरेक्टर आणि संचालक मंडळाचे उपाध्यक्ष आबासाहेब झाले.

तसं बघितलं तर आबासाहेबांचं ध्येय नोकरी हे कधीच नव्हतं. नोकरी करण्यामागे एकमात्र कारण असं होतं ते म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान दहा हजार रुपये जमा करावे. नंतर सांगलीला जावं आणि तिथं आपलं दुकान काढावं. पण मुंबईत राहिल्याने कुठे, कोणता व्यापार चालतो आणि त्याची उलाढाल कशी होते, याची चौकस बुद्धी त्यांना लाभली आणि मुंबईच्याच व्यापारी क्षेत्रात नशीब आजमावण्याचं त्यांनी ठरवलं.

मात्र ज्या व्यवसायासाठी त्यांनी नोकरी करण्याचं स्वप्न बघितलं त्याच व्यवसायातील त्यांच्या तुफान कामगिरीमुळे ते नोकरीचं स्वप्न नंतर मोठ्या स्तरावर जाऊन पूर्ण झालं. जिद्द आणि कामाप्रती प्रामाणिकता असेल तर छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातला मोठा स्वप्नही साकार होतच सिद्ध केलं ते आवाज साहेब गरवारे यांनी.

जिद्द आणि कामाप्रती प्रामाणिकता असेल तर छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं स्वप्नही साकार होतंच, हे सिद्ध केलं ते आबासाहेब गरवारे यांनी.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.