या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय

भारतामध्ये सध्या स्टार्टअपची लाट आलेली दिसतेय. मात्र खरं तर हे आहे की स्टार्टअप सुरु करणारे लोक आणि तरुण खूप पूर्वीपासून या कामाला लागलेत. ते उगं आता लोकांना समजतंय कारण शार्क टॅंक इंडिया हा शो ते दाखवतंय. पण कधी विचार केलाय का? या शोमध्ये येणारे सगळे लोक असे आहेत ज्यांनी स्टार्टअपमध्ये उतरण्याचं धाडस आधीच दाखवलंय. म्हणून तर इव्हेस्ट करण्याआधी जेव्हा जजेस त्यांना टर्नओव्हर विचारतात, तेव्हा ते सांगू शकतात. त्यानुसार जज इन्व्हेस्ट करतात आणि जे टर्नओव्हर नाही सांगू शकत त्यांचा खेळ तिथेच ओव्हर होतो.

मात्र शार्क टँक शोची आयडिया ज्या शोकडून आली आहे त्या अमेरिकेच्या शार्क टँकमध्ये आपल्या भारतातील एका स्टार्टअपने धुमाकूळ घातलाय. अमेरिकेतून ५ लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळवणारं असं भन्नाट स्टार्टअप ज्या भावड्याचं आहे त्याने चारच वर्षांपूर्वी याची सुरूवात केली होती आणि अवघ्या ४ लाख रुपयांपासून सुरु केलेल्या व्यवसायातून आता त्यांची उलाढाल ५ कोटींहून अधिक झाली आहे. 

एवढंच नाही तर या माध्यमातून ते अनेकांना रोजगारही देत ​​आहेत. या भावड्याचं नाव आहे ‘कृवील पटेल’ आणि त्यांचं स्टार्टअप आहे ‘अन्नधान्यांपासून चमचे आणि स्ट्रॉ बनवण्याचं’. 

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळावी यासाठी देशपातळीवर प्रयत्न केले जाताय. देशात अनेक ठिकाणी यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. अशात कृवील पटेल यांची ही खाण्यायोग्य चमच्यांची भन्नाट आयडिया हवा करत असून देशविदेशात त्याला मागणी आहे.   

कृवील हे गुजरातमधील वडोदरा इथले रहिवासी असून अवघे २७ वर्षांचे ते आहेत. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या कृवील यांना आधीच स्टार्टअप्स आणि स्वतःच्या व्यवसायात करायचा होता. कार आणि बाइक्सची आवड असल्याने शोरूम सुरू करावं असं त्याना वाटायचं. मात्र, आर्थिक अडचण होती म्हणून आपला निर्णय त्यांनी बदलला. 

एडिबल स्पूनची कल्पना कशी सुचली? 

कृवील एकदा रस्त्याने जात होते, तेव्हा त्यांना प्लास्टिकचा कचरा दिसला. तसं त्यांना अनेकदा हे दिसलेलं. ते बघून त्यांना नेहमी वाटायचं, सरकार प्लास्टिकमुक्त अभियानाला चालना देत आहे. सर्वत्र जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्यानंतरही ही स्थिती आहे. मग असं काही करता येईल का, जेणेकरून प्लास्टिकचा वापर कमी करण्यात मदत होईल आणि शिवाय आपली कमाई देखील होईल.

त्यांच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं. विविध ठिकाणांहून त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा एका ठिकाणाहून त्यांना कळलं की, प्लॅस्टिकऐवजी आपण अन्नधान्यांपासून चमचे आणि स्ट्रॉ बनवू शकतो. आपण हे करू शकतो का? आणि त्यासाठी किती भांडवल लागेल? असा सर्व विचार त्यांनी केला. जेव्हा समजलं की हे शक्य आहे तेव्हा पूर्ण प्लॅनिंग केली आणि त्यांच्या कुटुंबासोबत याबाबत चर्चा केली.

वडील या कल्पनेच्या विरोधात होते, पण आईने त्यांना पाठिंबा दिला. इतकंच नाही तर आईने हिम्मत दाखवत स्वतः काम करण्याची तयारी दाखवली आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी पाहिलं पाऊल उचललं.  २०१७ चं ते वर्ष होतं. केवळ ४ लाख रुपयांसहित त्यांनी काम सुरु केलं.

सुरुवातीचे दिवस कसे होते?

वडोदऱ्यात भाड्याची खोली आणि एका छोट्या मशीनसहित काम सुरु झालं. उत्पादन सुरू झालं मात्र ते विकण्यासाठी मार्केटिंगची गरज होती. तेव्हा त्यांनी सोशल मीडियाची मदत घेतली. शक्य होईल त्या सोशल मीडिया माध्यमातून त्यांनी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. तसंच या चमच्यांचा काय उपयोग होतो, याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्याचा पाठपुरावा केला. 

सोशल मीडियाने कमाल दाखवली आणि लवकरच कृवील यांना ऑर्डर मिळू लागल्या. गुजरातपासून सुरू झालेलं काम हळूहळू देशभरात पोहोचू लागलं. देशाच्या इतर भागातूनही ऑर्डर मिळू लागल्या.

मात्र ही बेसिक पायरी होती. त्यांनी आता थेट विक्रेत्यांशी संपर्क साधला. त्यांना माल पुरवण्यासाठी वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांशी टायअप केलं. जेव्हा बऱ्यापैकी पुरवठा साखळी तयार झाली तेव्हा त्यांना बाहेरच्या देशातूनही ऑर्डर मिळू लागल्या. मात्र यावेळी अडचण आली परत तीच. आर्थिक!

पण फरक असा होता की यावेळी परिस्थिती बदललेली होती. आता त्यांचं काम आणि उत्पन्न बघून कर्ज घेण्यास ते पात्र होते. तेव्हा ७० लाख रुपयांचं कर्ज त्यांनी उचललं. कर्ज उचललं आता गरज होती ती कामाला नाव देण्याची. कारण त्याशिवाय बाहेर व्यापार करणं शक्य नव्हतं. शिवाय देशातही बऱ्याच पसरलेल्या व्यवसायाला त्याची ओळख नको!

नाव ठरलं  ‘त्रिशूला इंडिया’

आज कृवील यांची उत्पादने यूके, यूएसए, जर्मनी, स्पेन, नॉर्वे, दुबई, कॅनडा, कुवेत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह ३२ देशांमध्ये पाठवली जातात. 

जगभरात धुमाकूळ घालणारे कृवील यांचे स्पून त्यांनी तयार कसे केले?

हे लय सोप्प हाय बॉस. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी आणि मका अशा वेगवेगळ्या धान्यांना एकत्र मिसळून घ्यायचं. चवीसाठी अद्रक, इलायची टाकू शकतात. मग त्याचं चांगलं कणीक मळून घ्यायचं. चपाती सारखं त्यांना लाटायचं आणि मग चमच्यांचा आकारात कापायचं. ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिट त्याला बेक करायचं आणि चमचे तयार!

कृवील सांगतात अशा चमच्याने काहीही खाल्लं आणि ते संपलं त्यानंतर चमचा देखील तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही ते चमचे खाल्ले नाही आणि डस्टबिनमध्ये टाकले तर मुंग्या आणि कीटकांना खायला उपयोगी ते पडतात. अशाप्रकारे हे उत्पादन पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. शिवाय त्यांच्या कंपनीत उत्पादनाचा शून्य कचरा निघतो कारण जे उरतं त्याच्या ते गोळ्या बनवतात आणि माशांसाठी तलाव आणि नद्यांमध्ये टाकतात. म्हणजेच नफा भरपूर आणि तोटा शून्य!

अशा या उत्पादनांची त्यांनी प्रयोगशाळेत चाचणी केलेली असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय पोषक आहेत. त्याचे पेटंटही कृवील यांना मिळाले आहे. या उत्पादनासाठी त्यांनी रीतसर प्रशिक्षणही घेतलं असून आज जवळपास  ७० लोकांना रोजगार ते देत आहेत.

कृवील पटेल यांच्या भन्नाट आयडियाचं अमेरिकेनेही कौतुक केलंय. त्यांच्या स्टार्टअपला अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट शार्क टँक शोमध्ये ५ लाख डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. या निधीचा वापर कंपनीच्या विस्तारासाठी ते करणार आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.