गंडलेल्या मॉडेलमधून यशस्वी कंपनी बनवण्याचं उदाहरण ठेवलं ते बिगबास्केटने
भारतात ई-ग्रोसरीची बाजारपेठ झपाट्याने वाढताना दिसतेय. मुकेश अंबानींच्या जिओ मार्ट, स्विगी सारख्या कंपन्यापासून ते नव्याने आलेल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, डन्झो सुद्धा भारतात ग्रोसरी डिलिव्हरी करतात. मात्र या सगळ्यांना मागे टाकलंय ते ‘बिगबास्केट’ने. टाटाच्या मालकीची ही सर्वात मोठी कंपनी असून देशातील जवळपास ३७ टक्के ग्रोसरी ते डिलिव्हर करतात, असं एका रिपोर्टमधून समोर आलंय.
बिगबास्केटने हा पल्ला गाठल्याचं रहस्य आहे ते त्यांची ‘बिग’ मार्केटिंग स्ट्रॅटेजी.
अगदी सकाळी उठल्यावर नाश्त्यासाठी लागणाऱ्या अंड्यासारख्या गोष्टीपासून ते बाथरूममध्ये लागणाऱ्या डिटर्जंटपर्यंत सगळं काही बिगबास्केट तुम्हाला घरपोच देतं. आणि याची सुरुवात झाली ती २०११ मध्ये. कंपनीचे संस्थापक हरी मेनन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून बिगबास्केटची स्थापना केली. मात्र खरं तर ही आयडिया काही तेव्हाची नव्हती. त्यांना १९९९ मध्ये ती सुचली होती. त्यानुसार त्यांनी ‘फॅबमार्ट डॉट कॉम’ हे प्लॅटफॉर्म देखील विकसित केलं होतं.
मात्र डॉट कॉम युग सुरु झालं असलं तरी भारत त्या काळात ऑनलाईन सिस्टीमसाठी तयार नव्हता. म्हणून त्यांचं हे प्लॅटफॉर्म तेव्हा गंडलं होतं. त्यांना ते बंद करावं लागलं होतं.
२०१० च्या सुमारास अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जेव्हा वर येऊ लागल्या तेव्हा हरी मेनन यांनीही आपलं गंडलेलं मॉडेल परत आणण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी जुन्या सहकाऱ्यांना एकत्र केलं आणि २०११ मध्ये बिगबास्केटची सुरुवात केली…
सुरुवात केली तरी सगळं सोपं नव्हतं. आधीच अपयश भेटलेलं मॉडेल होतं त्यात इतर लोकांच्या कमेंट्स. ग्रोसरी कुणी ऑनलाईन घेणार नाही, नाशवंत वस्तू असल्याने चांगल्या भेटतील का याचा अविश्वास, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तरीही अशांना न जुमानता हरी मेनन आणि त्यांचे सहकारी कामाला लागले होते. त्यांनी सुरुवातीला कस्टमर्सच्या ऑर्डरनुसार मालाची खरेदी सुरु केली. आलेल्या ऑर्डर्सपुरता माल ते मंडीमधून घ्यायचे आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे.
थोड्याच दिवसांत त्यांना जाणवलं की, इथेच ते गंडताय. कारण सकाळी साडेतीनला उठून बाजारात जाऊन माल पोहोचवला तरी त्यातून पुरेसा नफा मिळत नव्हता. पाणी कुठे मुरतंय हे शोधलं तेव्हा समजलं ‘कुलिंग स्टोरेजची कमतरता’. शिवाय अजून शोधलं तेव्हा योग्य ग्राहक संपर्क, डिलिव्हरी सिस्टीम, वेबसाईट डिजाईन अशा बऱ्याच गोष्टी आहे.
मग त्यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजि ग्रोथसाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये एका विदेशी कंपनीकडून आधी $३५ मिलियन, नंतर $१५ मिलियन आणि मग दुबईच्या कंपनीकडून दिडशे मिलियन डॉलरचं फंडिंग मिळवलं. आणि जेव्हा त्यांनी या सुविधा विकसित केल्या त्यानंतर ते झपाट्याने २०१६ पर्यंत भारतातील ८ मोठ्या शहरांत पोहोचले.
नंतर त्यांनी छोट्या शहरांकडे मोर्चा वळवला. आणि त्यासाठी वापरली परफेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी.
१. डिमांडिंग फेस फॉर ऍडव्हर्टाईज : त्यांनी सुरुवातीला शाहरुख खानला मैदानात उतरवलं. शाहरुखला आपलं ब्रँड अँबेसिडर बनवत त्यांनी जाहिरात केली. याने बिगबास्केटला या व्यक्तींच्या यूएसपीचा फायदा झाला.
२. डिलिव्हरी टीम प्रेझेन्टेशन : आधी त्यांचा ड्रॉयव्हरच डिलिव्हरी द्यायला घरापर्यंत जायचा. मात्र जेव्हा त्यांना जाणवलं की डिलिव्हरी बॉय आपल्या कंपनीला प्रेझेन्ट करतो तेव्हा त्यांनी स्वतंत्र व्यक्ती त्यासाठी ठेवला. या व्यक्तीने ग्राहकांना खूप रिस्पेक्टफुल वागणूक देणं गरजेचं ठेवलं. शिवाय त्यांच्यासाठी चांगला ड्रेस कोड बनवला.
तर ज्या व्हॅन्सने डिलिव्हरी होते त्यामध्ये जीपीएस बसवण्यात आलं. ज्याने लवकर डिलिव्हरी ट्रॅक करता येत असल्याने कमी वेळेत आणि अचूक ठिकाणी सामान पोहोचवणं शक्य झालं.
३. कंप्लेन टीम निर्मिती : ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी खास समस्या निवारण टीम स्थापन केली. यातील सगळे मेंबर्स फक्त ग्राहकांच्या समस्यांवर फोकस करतील हे ठरवलं. जास्तीत जास्त ३ रिंगमध्ये फोन उचलला जाणं गरजेचं केलं. एकंदरीत त्यांनी ग्राहकांचं महत्त्व वाढवलं. तर कंप्लेनमध्ये वर्गीकरण करत ऑफर देखील दिल्या. जसं की…
लेट डिलिव्हरीसाठी १०% डिस्काउंट, एखादी वस्तू डिलिव्हरीमधून मिस झाली तर त्यांच्या ओरिजिनल रिफंड सोबत अजून ५०% एक्सट्रा रिफंड, वगैरे.
४. सेल्स टीम अजेंडा : त्यांनी सेल्स टीमला ग्राहक टिकवून ठेवण्याचं टार्गेट दिलं. त्यानुसार ग्राहकांचं वर्गीकरण तीन श्रेणींमध्ये करण्यात आलं. सिल्वर, गोल्ड आणि डायमंड. पहिल्यांदा आलेला ग्राहक जातो सिल्वर श्रेणीत. त्या ग्राहकाला डायमंडपर्यंत नेण्याची सिस्टीम सेल्स टीमला तयार करण्यास सांगितलं.
५. शेतकरी संबंध : ग्रोसरी डिलिव्हरी करण्यासाठी आधी त्यांना शेतकऱ्यांकडून माल घ्यावा लागतो. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांशी खूप चांगले संबंध जोपासले आहे. शेतकरी स्वतः त्यांचं माल बिगबास्केटच्या वेअरहाऊसला आणून देतात आणि त्यांना जागीच पेमेंट केलं जातं. हक्काचे पैसे लगेच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास बिगबास्केटवर तयार झालाय.
या पाच मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या जोरावर आज बिगबास्केट भारतातील टॉपची ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी बनली आहे. तर २०१९ मध्ये बिगबास्केटमध्ये चीनच्या अली बाबा ग्रुपने आणि आणि अजून सीडीजे ग्रुपने इव्हेस्ट केल्याने कंपनी १ बिलियनपेक्षा मोठी कंपनी झाली आहे.
आज बंगळुरू इथे त्यांचं मुख्यालय असून, त्यांना जवळपास दररोज १,५०,००० पेक्षा जास्त ऑर्डर मिळतात. ग्रोसरीमधून जवळपास ३५% पेक्षा जास्त मार्जिन त्यांना मिळतं. तर फूड आणि व्हेजिटेबल्समधून १२% पेक्षा जास्त मार्जिन ते काढतात. तर वेगवेगळ्या ब्रँडशी कनेक्शन असल्याने त्यातूनही त्यांना नफा होतो.
२०१९ मध्ये ३३०० कोटी पेक्षा जास्त नफा त्यांना झाला. २०२० मध्ये ४४०० पेक्षा जास्त. तर जॅकपॉट लागला कोरोना काळाचा. यामुळे त्यांनी २०२४ चं टार्गेट २०२१ मध्ये पूर्ण केलं. बिगबास्केटचं मूल्यांकन मे २०२१ पर्यंत सुमारे $१.८५ अब्ज झालं होतं.
गंडलेल्या मॉडेलमधून यशस्वी कंपनी बनवण्याचं उदाहरण ठेवलं ते बिगबास्केटने. आणि हे शक्य झालं त्यांच्या मार्केट स्ट्रॅटेजीने!
हे ही वाच भिडू :
- झोमॅटोने १० मिनिटांत डिलिव्हरी स्कीम आणली अन् सोशल मीडियाने त्यांचा बाजार उठवला
- रुची सोयाची स्टोरी बघा आणि मग बाबा रामदेवपेक्षा भारी बिझनेसमॅन शोधून दाखवा
- लॉकडाऊनच्या मंदीत संधी साधणारी कंपनी म्हणजे डन्झो