सर्फराजची स्टोरी एवढंच सांगते की, दुर्दैवानं आयपीएलनं रणजी ट्रॉफीचंच मार्केट खाल्लंय..
१०, ३२, १, १२*, ३६* मागच्या पाच आयपीएल मॅचेसमधले सर्फराज खानचे स्कोअर. आता तुम्हाला सर्फराज खान कोण हे पटकन आठवलं नसेल, तर थोडासा जाडसर प्लेअर. जो आयपीएलमध्ये सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळला, त्यानंतर पंजाब किंग्स आणि सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय.
विराट कोहली, ख्रिस गेल, एबीडी असली तगडी लाईनअप आरसीबीकडे असताना सर्फराजनं पाचव्या सहाव्या नंबरला येऊन मॅचेस मारुन दिल्या होत्या. एवढ्या स्टार स्टटेड टीममध्ये राहून सर्फराजनं नाव कमावलं होतं. त्याचे स्कुप शॉट आणि ताकद लाऊन मारलेले छगे चांगलेच लक्षात राहिले होते.
सध्या सर्फराज चर्चेत आलाय तो त्याच्या बॅटिंगमुळे आणि टीम इंडियामध्ये न झालेल्या सिलेक्शनमुळं.
लेखाच्या अगदी सुरुवातीला वाचलेले स्कोअर बघून तुम्हाला वाटलं असेल की, मागच्या पाच इनिंग्समध्ये मिळूनही ज्याचे १०० रन्स पूर्ण झालेले नाहीत, त्याला टीममध्ये कसं घेणार..?
याचं कारण सापडतं, मागच्या १३ रणजी ट्रॉफी इनिंग्समध्ये. जिथं सर्फराजचे स्कोअर आहेत…
१५३, १६५, ४८, ६३, २७५, ६, १७७, ७८, २५, २२६*, ३०१*, ३६, ७१*
टोटल बसते १६२४ रन्स!
त्यात सगळ्यात लेटेस्ट इनिंगमध्ये उत्तराखंड विरुद्ध त्यानं १५३ रन्स केले. ही मॅच मुंबईची रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनल. याच्याआधी १६५ मारलेले, त्यानंतर मध्ये आयपीएलचे तीन महिने गेले. टी२० मोड मधला शिफ्ट सांभाळून, तिथलं अपयश पचवून त्यानं पुन्हा कमबॅक केलंय तेही दणक्यात.
पण सातत्यानं एवढे रन्स करुनही, सर्फराजचं भारतीय टेस्ट संघात काय सिलेक्शन होईना. टेस्ट तर सोडा पण स्फोटक बॅटिंग करुनही त्याची वर्णी वनडे किंवा टी२० संघातही लागत नाहीये.
बरं हे असं होणारा सर्फराज काही एकमेव प्लेअर नाही, अशीही काही नाव आहेत जी रणजी क्रिकेटमध्ये कडक कामगिरी करतात, पण आयपीएलच्या रेट्यापुढं त्यांचं भारतीय संघात सिलेक्ट होणं राहूनच जातं. आयपीएल आज जगातली सगळ्यात भारी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते, फक्त भारतच नाही तर इतर टीम्सही आयपीएलमधल्या कामगिरीवरुन प्लेअर्सची चुणूक ओळखतात.
या गर्दीत मागे राहतं ते फर्स्ट क्लास क्रिकेट आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर रणजी ट्रॉफी.
थोडं सर्फराजबद्दल सांगतो,
सर्फराज मूळचा उत्तरप्रदेशचा पण मुंबईचा प्लेअर. लहानाचा मोठा कुठं झाला तर आझाद मैदानात. त्याचे वडील क्रिकेट कोच, त्यांचा कॅम्प लागायचा तेव्हा लहाना सर्फराज ग्राऊंडमध्येच झोपायचा. त्याला बॉल लागू नये म्हणून आजूबाजूनं किटबॅग ठेवलेल्या असायच्या, आपल्या आजूबाजूला सतत चालणारं क्रिकेट बघून, त्यानंही क्रिकेटची वाट धरली.
वडिलांनी त्याला खेळताना पाहिल्यावरच ठरवलं की याच्यात तो स्पार्क आहे.
सर्फराजचं नाव पहिल्यांदा बातम्यांमध्ये आलं हॅरिस शिल्ड ट्रॉफीमुळं. ज्या ट्रॉफीनं सचिन आणि विनोद कांबळीचंही नाव गाजवलं होतं, तिथं सर्फराजनं एका मॅचमध्ये ४३९ रन्स मारत धुव्वा केला होता. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्लेअर्सची नजर त्याच्यावर पडली. एजग्रुप क्रिकेट तो मुंबईकडूनच खेळला आणि त्याचा मुंबईच्या अंडर-१९ टीममधला परफॉर्मन्स पाहून. अंडर-१९ वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली.
मग मुंबई रणजी टीम, लिस्ट ए टीम, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट हे सगळं काही सर्फराजच्या कारकिर्दीत घडलं. वय चोरल्याचा आरोपावरुन त्याच्यावर कारवाई झाली, पण त्यात काहीच ठोस घावलं नाही. या सगळ्यात त्याला चान्सेस फार कमी मिळाले.
२०१५ मध्ये त्यानं उत्तर प्रदेशकडून खेळण्याचा निर्णय घेतला, खरंतर हा निर्णय सर्फराजचा कमी आणि त्याचे वडील आणि कोच असे दोन्ही असंणाऱ्या नौशाद खान यांचा जास्त होता. मात्र तिथं सर्फराजला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. त्यानं पुन्हा एकदा मुंबईकडून खेळण्याचं ठरवलं. यावेळी मात्र निर्णय पूर्णपणे सर्फराजचा होता.
या दरम्यान त्याला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र २०१६ मध्ये त्याला संपूर्ण सिझन बाहेर बसावं लागलं, यामागचं कारण म्हणजे त्याचा गंडलेला फिटनेस, सुटलेल्या पोटामुळं त्याला धावणं मुश्किल झालेलं. त्याचा आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं त्याला स्पष्ट सांगून बाहेर बसवलं.
आयपीएलमध्ये हातात असून गेलेली संधी आणि दुसऱ्या बाजूला कुलिंग पिरियडच्या नियमामुळं मुंबईच्या टीममध्ये न मिळणारी संधी, या सगळ्यात सर्फराजला वेळ मिळाला आणि त्यानं स्वतःवर काम केलं. जबरदस्त फिटनेस केला. कार्डिओपासून डायटपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईनं लक्ष दिलं.
त्याची बॅटिंग स्टाईल व्हाईट बॉल गेमला सुट करणारी होती, कारण उचलून मारण्यात किंवा हटके शॉट्स खेळण्यात सर्फराज भारी होता. त्याला हा व्हाईट बॉल प्लेअरचा शिक्का पुसायचा होता. त्यानं हे केलं, थांबून खेळणं जमवलं. स्लो स्टार्ट करून इनिंग्स बिल्ड करायला घेतल्या. शॉर्ट बॉल आला की अप्पर कट न मारता सोडून द्यायचं ठरवलं…
क्रिकेटमध्ये टॅलेंट, फॉर्म, फिटनेस आणि स्किल सोबतच आणखी एक महत्त्वाचा गुण असतो, तो म्हणजे ॲडजस्टमेंट, सर्फराजनं हे जमवलं. रणजी ट्रॉफीत त्याच्या बॅटमधून अक्षरश: खोऱ्यानं रन्स आले. सलग दोन इनिंग्समध्ये ३०१ आणि २२६ आणि तेही नॉटआऊट म्हणजे कळस होता.
चांगल्या चांगल्या बॉलिंग लाईनअपला तो ठोकतोय, कित्येक तास मैदानावर थांबून रन्स करतोय, बरं एखादी इनिंग ‘लागून गेली’ असं म्हणलं तरी पुढच्या इनिंगमध्ये परत रन्सची टांकसाळ असतेच. मागच्या १३ इनिंग्समध्ये मिळून केलेले १६२४ रन्स हीच गोष्ट सांगतात.
मात्र रणजी ट्रॉफीमध्ये एवढे रन्स मारुनही भरटीईटी संघासाठी सर्फराजचा विचार होत नाही.
१९३५ पासून सुरू झालेली रणजी ट्रॉफी, भारतीय क्रिकेटची जननी मानली जाते. आजवर कित्येक प्लेअर्स याच स्पर्धेतून पुढं आले. जसजसं आयपीएलचं प्राबल्य वाढत गेलं, तसा तिथली कामगिरी हाच खेळाडूंसाठी टीम इंडियाचा गेटपास ठरू लागला.
फक्त दोनच उदाहरणांचा विचार करायचा झाला, तर केदार जाधव आणि आजीनी रहाणे या मराठमोळ्या खेळाडूंना भारतीय संघाची दारं तेव्हाच उघडी झाली, जेव्हा त्यांनी रणजी ट्रॉफीत हजारपेक्षा जास्त रन्स मारले होते.
देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेचा सामना करत, बदलत्या पिचेसवर तगड्या बॉलिंगला सामोरं जात केलेल्या कामगिरीची दाखल घेतली जाईना हेच दुर्दैव म्हणावं लागेल. गेल्यावर्षी लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेमुळं रणजी ट्रॉफी खेळवली गेलीच नाही, आयपीएल तेवढी झाली. यंदाही आयपीएलसाठी रणजी ट्रॉफीचं दोन टप्प्यांमध्ये आयोजन झालं.
भारतीय क्रिकेट जिथून बहरलं, त्याच स्पर्धेकडे ती गाजवणाऱ्या प्लेअर्सकडे दुर्लक्ष होतंय… ही खेदाची गोष्टय एवढं खरं.
हे ही वाच भिडू:
- श्रेयवादापासून कायम लांब असला, तरी अजिंक्य रहाणे मिडलक्लास माणसांचा टिपिकल हिरोय
- आयुष्यात दोस्त का पाहिजे… हे दिनेश कार्तिकचा कमबॅक बघून समजतं
- महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास