शिवसेना-मनसेच्या आधी “घाटी विरूद्ध भय्या” या वादाची सुरवात अरुण गवळीने केली होती…

मुंबई ही सर्वसमावेशक मानली जाते. अनेक जाती, धर्म, संस्कृती या शहरात नांदतात. मुंबई काढून घेण्याचे प्रयत्न तेव्हा अफाट झाले पण मराठी माणसाने लढून तिला आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं.

पण मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड जसं फोफावल तितकंच ते भीषण होत गेलं. इथ माफियागिरी होती पण त्यातही नंतर भूमिपुत्र आणि उपरे हा वाद सुरू झाला. हुसैन झैदी आपल्या पुस्तकात याबाबत लिहितात.

आज घडीला महाराष्ट्र याच टॉपिकवर येऊन थबकलाय.

पण अंडरवर्ल्ड मध्ये भैय्याना पळवून लावा, मुंबई वाचवा अशी घोषणा शिवसेना-मनसेच्या आधी अरुण गवळीने दिली होती.

अंडरवर्ल्डचं हे अंग मात्र कायम दुर्लक्षित राहिलं.

मुंबईमध्ये पठाण टोळ्या मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्या टोळ्या मुसलमान गुंडांखेरीज इतर कोणालाही टोळीत घेत नसे. त्याचवेळी अरुण गवळीने या राड्यात उडी घेतली होती. जेव्हा अरुण गवळीने भायखळा भागात टोळी सक्रीय करायला सुरवात केली तेव्हा पहिल्यांदा त्याचा लफडा झाला तो म्हणजे उत्तर भारतीय टोळीशी.

उत्तर भारतीय लोकांना तेव्हाही भय्याचं म्हणत असे. मेन कारण म्हणजे गोदावरीच्या उत्तरेकडून आलेल्या कोणत्याही माणसासाठी भैय्या हा शब्द वापरला जात असे. या भैय्याना शिंगावर घेणारा अरुण गवळी हा पहिला स्थानिक मराठी माणूस होता.

स्वतंत्र भारतात नंतर उद्योगधंदे वाढीस लागले आणि मुंबईत बाहेरील लोकांची गर्दी वाढू लागली. खर तर आग्री, कोळी आणि मराठी माणसाची मुंबई पण बरेच अमराठी लोक इथ जमा झाले. पूढे मराठी लोकांना, इथल्या भूमिपुत्रांना जास्त संधी मिळाल्या पाहिजे या धोरणाचा अवलंब पुढे राजकीय पक्षांनी केला.

सुरवातीला मुस्लिम टोळ्यांमध्ये भय्या लोकांना टोळीत स्थान होतं.

उत्तर भारतीय भय्या, त्यातही बिहारी आणि नंतर उत्तर प्रदेशातून आलेले कानपुरी, जोनपुरी, रामपुरी आणि इलाहबादी टोळ्यांचे सदस्य होते. भायखळ्यात मदनपुरा आणि सांकली रस्ता या भागात मुस्लिम टोळ्यांच प्रस्थ होतं.

मराठी गुंडांमध्ये बीआरए म्हणजे बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी टोळीतील आणि उत्तर भारतीय भय्या यांच्यातील वाद प्रादेशिकतेवर आधारित नव्हता तर कोणाचं वर्चस्व किती यावर आधारित होता.

गवळी टोळीला पहिले आव्हान दिलं ते म्हणजे भायखळ्यातील मोहन सरमळकरच्या एस पुल टोळीने. पूढे या टोळीच. नाव भय्या टोळी पडलं.

सरमळकरने बीआरए टोळीला हलक्यात घेतलं होतं. बीआरए टोळीचा मुख्य अड्डा दगडी चाळीत तर साथीदारांचे अड्डे प्यून चाळ, लक्ष्मी चाळ आणि सिमेंट चाळीत होते. सर्मळकरचा मुख्य अड्डा हा एस पुलाजवळ होता. सरमळकरने एस पुल नाव बदलून भायखळा टोळी असं केलं.

हा सरमळकर स्वतः मराठी होता पण त्याच्या टोळीत भय्ये जास्तं होते. भायखळ्याचा मटका डॉन कुंदन दुबे आणि राज दुबे उत्तर भारतीय होते. विरारचा जयेंद्र सिंग उर्फ भाई ठाकूर यांच्याशी सरमळकरची जवळीक होती पण ते सगळे भय्ये होते.

याचा फायदा गवळीने घेतला आणि मराठी लोकांमध्ये त्याने सरमळकरला भय्या टोळी म्हणून चिडवायला सूरवात केली आणि भायखळा टोळी हे नाव स्वतःला ठेवून घेतलं. याचा फायदा असा झाला की एस पुल टोळीतील स्थानिक मराठी लोकं गवळीला येऊन मिळाली. सरमळकरला मोठा धक्का बसला आणि त्याने गवळी हा अहीर म्हणजे मध्य प्रदेशातील आहे असा प्रचार करायला सुरवात केली.

सरमळकर हा अट्टल गुंड होता, पांडे- दुबे असे गुंड त्याच्या पदरी होते.

गवळी साधा गिरणी कामगार आहे आणि त्याला गुन्हेगारीत काहीच माहिती नाही असा प्रचार त्याने केला. भायखळा तेव्हा नन्हे खान, वाहेब पहिलवान आणि जॉनी बंधू या टोळ्यांनी गांजलेला होता.

पण घाटी विरूद्ध भय्या हा वाद विकोपाला गेला तो म्हणजे कुंदन दुबेमुळे.

कुंदन दुबे हा पारसनाथ, दुबेचा चेला होता. सरमळकर टोळीत दोघांना महत्वाचं मानलं जायचं. कुंदनने प्रेम प्रकरणाच्या कारणावरून रमा नाईकच्या मोठ्या भावाला भोसकल आणि हा वाद पेटला. शशी रसम हा यातला मेन माणूस होता.

बीआरए टोळीने कुंदन दुबेला जन्मठेप स्वीकारायलाच लावली आणि बॉम्बे सेंट्रल पुलावर शशी रसम यालाही टपकवला.

मुंबईतले मटक्याचे सगळे अड्डे बीआरए टोळीला ताब्यात घ्यायचे होते पण तिथं सगळीकडे पारसनाथ पांडेचं मार्केट होतं. या गवळी टोळीने थेट त्याच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि अड्ड्यावरच पांडेचा गेम केला.

यामुळे एका झटक्यात सगळे अड्डे बिआरए टोळीचे झाले. पारसनाथ मेल्याने आणि कुंदन दुबे तुरुंगात असल्यानं सरमळकर टोळीने अंडरवर्ल्ड मधून गाशा गुंडाळला. टोळीचे बाकी सदस्य हरी शंकर मिश्रा, मोहन गुप्ता यांनी टोळीला कल्टी दिली.

सगळीकडे अरुण गवळीने आपली दहशत निर्माण केली.

पूढे घाटी विरूद्ध भय्या हा मुद्दा मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षांनी उचलून धरला पण या संघर्षाची खरी ठिणगी पेटवली होती ती अरुण गवळीनेच.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.